मुलांकडून रास्त अपेक्षा ठेवणं हेच बालसंगोपनाचं गमक आहे; पण दुर्दैवानं परिस्थिती अगदी गळ्याशी येईपर्यंत बर्याच पालकांच्या लक्षातच येत नाही की आपण मुलांकडून फारच अवास्तव अपेक्षा करत होतो. अशा पालकांनी एखाद्या दिवशी मुलांच्या नजरेतून स्वतःकडे पाहिलं पाहिजे. तेव्हाच कळेल की मुलांच्याही आई-वडिलांकडून काही अपेक्षा असतात ज्या अजिबातच दुर्लक्षित होता कामा नयेत.
“मुलं आमचं अजिबात ऐकत नाहीत, काही समजावून सांगण्याचा त्यांच्यावर परिणामच होत नाही, स्वतःचंच खरं करतात… ” बहुतांशी पालकांची आपल्या मुलांबाबत काहीशी अशीच तक्रार ऐकावयास मिळते. परंतु मुलांच्या सवयींप्रमाणे पालकांच्याही काही सवयी मुलांना खटकत असतात, याबाबत कुणी विचार करतं का? मुलांच्या मनातही आपल्या आई-वडिलांचं एक चित्र असतं. त्यांच्याही आपल्या पालकांकडून काही अपेक्षा असतात. पाहूया मुलं आपल्या आई-वडिलांकडून काय अपेक्षा ठेवतात.
आधुनिकतेचा हस्तक्षेप
आजकाल घरोघरी मोबाईल, इंटरनेट यांचा वापर खूपच वाढला आहे. अगदी दोन-तीन वर्षांच्या मुलांनाही खाताना, खेळताना, झोपतानाही मोबाईल लागतो. अर्थात त्यांना ही सवय लागण्यामागे त्यांचे पालकच असतात. पालकांचाही अधिकाधिक वेळ मोबाईलवर जात असल्यामुळे त्यांची रोजची दिनचर्या, प्रोफेशनल लाइफ आणि नातेसंबंध यांवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रात्री झोपतानाही या पालकांना मोबाईल उशाशी लागतो. लहान मुलांना चिऊ-काऊच्या गोष्टी सांगून झोपवणं तर दूरच राहिलं, पालक रात्री उशिरापर्यंत मोबाईलवरून चॅट करत बसलेले असतात. बरं मुलांनी मध्येच त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना एकतर ओरडा नाहीतर मार मिळतो. या पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो, तेच मोबाईल चॅटिंगसाठी भरपूर वेळ असतो. पालकांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळेच हल्ली पालक आणि बालक यांच्यातील नात्यात अंतर येऊ लागलं आहे. बालसंगोपनाचा विषय हाताळत असताना या गोष्टीचाही विचार करणं आवश्यक आहे.
स्वतः करा, मग सांगा
घरातील वातावरणाचा मुलांच्या विचारांवर खोलवर परिणाम होत असतो. आपण मुलांना एखादी गोष्ट शिकवतो, परंतु त्या गोष्टीवर स्वतःच अंमल करत नाही. उदाहरणार्थ - आपण मुलांना कधी खोटं बोलायचं नाही असं सांगतो. आणि एखादा नावडत्या व्यक्तीचा फोन आला की, मुलांना आई घरी नाही आहे, असे फोनवर सांगायला सांगतो. यामुळे काय होतं, तर खोटं बोलायचं नाही असं आई सांगते आणि कधीकधी तीच खोटं बोलायला लावते. म्हणजे कधीतरी आपणही खोटं बोलू शकतो, असा मुलांचा समज होतो. नंतर आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या मुलांना शिस्त लावायला जातो, परंतु ते नियम स्वतः पाळत नाही. आणि मुलं पालकांच्या अशाच छोट्या छोट्या गोष्टी लक्षपूर्वक लक्षात ठेवतात. मुलांसाठी त्यांचे पालक आदर्श असतात. ते आपल्या आई-वडिलांच्या बाबत अधिक सजग असतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्या आई-वडिलांना चांगलं म्हणावं, त्यांच्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा करावी, असं मुलांना वाटत असतं. त्यामुळे मुलांना आपल्या आई-वडिलांचा अभिमान वाटतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मुलांच्या बेशिस्त वागण्याने पालकांना दुसर्यांसमोर लाजिरवाणे वाटते तसेच मुलांनाही पालकांच्या छोट्या-छोट्या चुकांमुळे दुसर्यांच्या पुढ्यात लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. तेव्हा पालकांनी स्वतःच्या वागणुकीकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे.
लक्ष देणं महत्त्वाचं
बहुतेक सर्वच पालकांना ही गोष्ट माहीत असते, की स्वतःकडे लक्ष वेधून घेणं ही मुलाची गरज असते आणि मुळात पालक तेच करू शकत नाहीत. मुलांचा खोडसाळपणा कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देणं. कसलाही व्यत्यय मध्ये येऊ न देता संपूर्णपणे केवळ त्यांच्याकडेच लक्ष देणं महत्त्वाचं असतं. असं जर करता आलं नाही, तर मुलं त्याकरता काय वाट्टेल ते करू शकतात. कामाच्या गडबडीत असणार्या पालकांच्या डोक्यात बर्याच गोष्टी असतात, स्वयंपाक काय करावा? सतत वाजणारा मोबाईल फोन किंवा ऑफिसातल्या कामाची डेड लाइन… यावर पालक मनातल्या मनात काथ्याकूट करत असतानाच मुलं अचानक लुडबुड आणि गोंगाट करत हट्ट करायला लागतात. आपल्याला ती छळतात असं वाटत असतं, तेव्हा खरं तर ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या एक किंवा दोन मुलं असं छोटंसं कुटुंब असतं. त्यातही दोन्ही पालक ऑफिसला जाणारे असतील तर मुलांनी बोलायचं कोणाशी? शाळा, मित्र-मैत्रिणी, तेथे केलेली मजा असं बरंच काही मुलांना पालकांसोबत शेअर करायचं असतं. पालकांनी जर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर ही मुलं मस्ती करून, वेडवाकडं वागून त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. किंवा याउलट काही स्वभावाने शांत असणारी मुलं आणखी अबोल राहून पालकांना आपल्याकडे लक्ष द्यायला भाग पाडतात.
आपण आपल्या मुलांसोबत पुरेसा वेळ घालवू शकत नाही, अशी एक अपराधीपणाची टोचणी नोकरदार पालकांना लागून राहिलेली असते. मुळात दिवसा असे पालक मुलांच्या नजरेला फार काळ पडतच नाहीत. त्यातही खोडकर मुलांना कितीही वेळ दिला तरी तो कमीच वाटतो. त्यांना त्यांच्याशी आत्ताच्या आत्ता खेळायला कुणीतरी हवं असतं. म्हणूनच त्यांच्यासोबत एकत्रितपणे वेळ घालवणं याला काहीही पर्याय असू शकत नाही. घरी आपल्या पालकांसोबत बोलणारी, त्यांच्यासोबत खेळणारी मुलं शाळेतही अव्वल असतात. ज्यांच्या घरी असं वातावरण मुलांना मिळत नाही, ती मुलं आळशी व निष्काळजी बनतात, असे शाळेतील शिक्षक आपल्या अनुभवातून सांगतात.
शिक्षा नव्हे, प्रेम हवे
समाजात वावरताना पालक स्वतःचा आत्मसन्मान सांभाळतात, पण मुलांनाही आत्मसन्मान आहे हे विसरून जातात. मुलांना कधीही, कुठेही सगळ्यांदेखत ओरडतात. मुलांना हे अपमानास्पद वाटते. शिस्त लावण्यासाठी पालकांनी प्रचंड देखावा करण्याची मुळीच गरज नसते. शिस्त लावणं याचा अर्थ नियंत्रण ठेवणं किंवा शिक्षा करणं असा नसून तिच्याकडे एक सकारात्मक कृती म्हणून पालकांना पाहता आलं पाहिजे. धमकी देणं, ओरडणं, मारहाण करणं या कुस्तीमध्ये करावयाच्या गोष्टी बालसंगोपनात करण्याची काहीच गरज नसते. मुलांना शिस्त लावताना पालकांनी संयम ठेवणं अतिशय गरजेचं आहे. बरेचदा घरातील व्यक्ती वा ऑफिसमधील व्यक्तींच्या वर्तणुकीचा राग घरी मुलांवर निघतो. तुम्ही घरी येता त्यावेळेस तुमच्या मुडची मुलांना कल्पना नसते, त्यामुळे ते जर काही सांगायला वा विचारायला आले आणि तुम्ही त्यांच्यावर चिडलात तर तुमच्या अशा वागणुकीमुळे हळूहळू मुलं तुमच्यापासून दुरावू शकतात. सततच्या ओरडण्यामुळे मुलं अबोल होतात. त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो. मुलांना प्रेम हवं असतं आणि आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय, याची जाणीव हवी असते. आई-वडिलांचं मुलांवर प्रेम नसतं असं नाही, पण प्रेम, आपलेपणा असलं तरीही दाखवायची तेवढीच गरज असते. त्यामुळे मधूनमधून त्यांना जवळ घेऊन त्यांचे लाड करावेत. आपल्या मुलांना समजेल असा दृष्टिकोन बाळगून त्यांच्या वागण्याची तर्हा आपण नक्की बदलू शकतो.