महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात केले जाते, यापैकीच महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेश्रुष्टीत महिलाप्रधान सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. स्त्रीकेंद्री चित्रपटांना सिनेप्रेमींचं प्रेम सुद्धा मिळतंय. असाच एक नवा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षी आपल्या भेटीस येणार आहे.
आनारसा स्टुडिओज प्रस्तुत, योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि निर्मित "चंडिका" ह्या सिनेमाचं आज पोस्टर खास महिला दिनानिमित्त रिलीझ करण्यात आलंय. वन फोर थ्री (143) आणि आम्ही जरांगे सारखा दमदार आणि सर्वाधिक चर्चेत आलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालेत. पोस्टर वर असलेल्या महिलेच्या कपड्यांवर व अंगावर सर्वत्र रक्त आहे, मागे सध्याचं जग आपण पाहू शकतो पण विशेष म्हणजे या महिलेच्या उजव्या हातात शस्त्र आहे ज्याला आपण त्रिशूल म्हणतो. या दमदार पोस्टर वरूनच हा सिनेमा किती ताकदीचा असणार आहे ह्याचा अंदाज पटतो.

जशी आदिशक्ती पृथ्वीवर विविध रूपात येते कधी महालक्ष्मीच्या रूपाने, तर कधी तुळजाभवानीच्या रूपाने. दुष्ट दुर्जनांच्या नाशासाठी देवीने नाना रूपे धारण केली आणि जगाच्या उद्धाराची धुरा हाती घेतली. तसच "चंडिका" सुद्धा अत्याचार, द्वेष, असहिष्णुता अशा गोष्टीं वर मात देत जगाचा, महिलांचा उद्धार करणार आहे. सध्याच्या स्त्रिया सशक्त आणि सजग आहेत, पण कुठेतरी त्या देखील त्यांच्या शक्तींपासून अनभिज्ञ आहेत. जो पर्यंत त्यांच्या विरुद्ध अत्याचाराचा घडा भरत नाही तो पर्यंत त्यांना स्वतःची क्षमता आणि आणि शक्ती ह्यांची जाणीव होणारच नाही. आता नक्की चंडिका कोण? तिचा उद्देश काय? हे नवीन वर्षात महिला दिनी कळेलच.
आनारसा स्टुडिओज प्रस्तुत आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित "चंडिका" ह्या सिनेमाचं लेखन आणि संगीत सुरेश पंडित ह्यांचं आहे. तर गीत वैभव देशमुख ह्यांचं आहे. हा नवा मराठी सिनेमा जागतिक महिला दिवस २०२६ ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.