‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या कार्यक्रमातील नवनवीन हटके टास्क प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. पण, आता दीपिका कक्करने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून एक्झिट घेतली आहे. तिच्या एक्झिटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चार वर्षांनंतर दीपिका कक्करने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यामुळे तिला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. तसंच चाहत्यांना दीपिकाला पाहून खूप आनंद झाला. पण, दीपिकाचा टेलिव्हिजनवरील प्रवास आता संपला आहे. तिला खांद्याला जखम झाल्यामुळे ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून एक्झिट घ्यावी लागली आहे. होळीच्या स्पेशल भागात अभिनेत्रीने तिचा निर्णय जाहीर केला. ती म्हणाली, “आता ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा भाग होऊ शकत नाही.” ज्यामुळे इतर स्पर्धक आणि परीक्षक हैराण झाले.

होळी स्पेशल भागात सुरुवातीलाच दीपिका आर्म स्लिंग घालून आली. त्यामुळे फराह खानने तिला विचारलं की, सगळे होळीचे कपडे घालून आले आहेत आणि दीपिका तुला काय झालं? तेव्हा दीपिका कक्कर म्हणाली, “मी पुन्हा त्याच स्थितीमध्ये गेली आहे. आता खूप जास्त वाईट स्थिती झाली आहे. डाव्या खांद्याचा त्रास वाढत आहे. त्यामुळे पाठीतल्या वेदनादेखील वाढल्या आहेत.” हे ऐकून हैराण झालेल्या रणवीर बरारने विचारलं, “आता तू जेवण कसं बनवणार?” त्यावेळेस भावुक होतं दीपिका म्हणाली की, मी जेवण बनवू शकत नाही. त्यामुळेच अभिनेत्रीने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सोडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, दीपिका कक्कर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सोडणार असल्याची माहिती महिन्याभरापूर्वी उषा नाडकर्णी यांनी दिली होती. आता दीपिका कक्करच्या जागी ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे झळकणार असल्याचं म्हटलं आहे. त्याला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमासाठी विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.