ब्रेड रोल
साहित्य: 3-4 उकडलेले आणि कापलेले बटाटे, 3-4 हिरव्या मिरच्या किंवा शिमला मिरची बारीक चिरलेली, 2 किसलेले गाजर,अर्धी वाटी चिरलेला आणि वाफवलेला कोबी, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून धने पावडर, चिमूटभर हिंग, 6 ब्रेड स्लाइस, अर्धा टीस्पून जिरे,अर्धा टीस्पून आमचूर पावडर,अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, चिमूटभर हळद, पांढरे तीळ, 2 चमचे तूप, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर.
कृती : कढईत तूप गरम करा. हिंग, जिरे आणि बटाटे घालून हलके तपकिरी होईपर्यंत शिजवा. आता त्यात हिरवी मिरची किंवा सिमला मिरची, गाजर, कोबी, मीठ आणि सर्व मसाले टाका, शेवटी हिरवी कोथिंबीर घाला. प्रत्येक ब्रेड पाण्यात बुडवून पिळून घ्या. त्यात बटाट्याचे सारण भरून चांगले लाटून घ्या. तीळात घोळवून तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
टीप: पनीर, खिमा, चिकनचे तुकडे इत्यादी देखील सारणात वापरता येतील.
गोल्डन फिंगर्स
साहित्य : 4-5 ब्रेड स्लाइस, 3 उकडलेले बटाटे, अर्धा कप मैदा, आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लोअर, चवीनुसार मीठ,
4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा तीळ, तळण्यासाठी तेल, बटर
कृती : बटाटे सोलून किसून घ्या. त्यात कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. ब्रेडवर बटर लावून त्यावर बटाट्याच्या मिश्रणाचा थर लावा. वरून तीळ भुरभुरा. मैदा आणि पाण्याचे मिश्रण करून वरील ब्रेडचे तुकडे करून त्या द्रावणात बुडवून तेलात तळून घ्या. एका प्लेटमध्ये चिरलेली कोबी आणि कांदा ठेवा आणि त्यावर गोल्डन फिंगर्स ठेवा. टोमॅटो सॉस किंवा नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.