अभिनेत्री भाग्यश्रीबद्दल एक बातमी समोर आली आहे. भाग्यश्रीला खेळादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भाग्यश्रीचे रुग्णालयातील काही फोटो समोर आले आहेत.
अभिनेत्री भाग्यश्रीचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यात ती रुग्णालयातील बेडवर दिसत आहे. तिच्या कपाळावर गंभीर जखम दिसत आहे. पिकलबॉल खेळताना भाग्यश्रीचा अपघात झाला. त्यामुळे तिच्या कपाळावर जखम झाली आहे.

भाग्यश्रीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिला १३ टाके पडले आहेत. भाग्यश्रीला दुखापत झाल्याची ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून भाग्यश्रीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. भाग्यश्रीचे फोटो पाहून ती लवकर बरी व्हावी अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
भाग्यश्रीचे सेल्फी समोर आले आहेत, ज्यात तिच्या कपाळावरील जखम दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली दिसत आहे. दरम्यान, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मिळत आहे.
‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भाग्यश्रीने सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. यानंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसली, मग तिने हिमालय दासानीशी लग्न केलं आणि ती बराच काळ अभिनयापासून दूर राहिली. मात्र, आता ती परत सिनेविश्वात आली आहे. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. भाग्यश्रीला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. तिची दोन्ही मुलं आता सिनेविश्वात काम करत आहेत.