सर्व स्तरातील महिलांना आरोग्य व तंदुरुस्तीला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करणारी ‘पिंकाथॉन’ अर्थात् धावण्याची शर्यत लवकरच होणार आहे. या पिंकाथॉनचे निर्माते मिलिंद सोमण व इनव्हिन्सिबल वुमेन्स रनच्या संस्थापक अंकिता कोंवर तसेच ग्लेनमार्क व बँक ऑफ बडोदाच्या पाठिंब्याने यंदाची ही धाव होणार आहे.
५९ व्या वर्षी देखील फिटनेस व लूक्समुळे कायम चर्चेत राहणाऱ्या मिलिंद सोमण यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, “पिंकाथॉन २०१२ साली सुरू झाली. यंदाच्या ‘रन’ चे विशेष म्हणजे यात ५ हजार महिला भाग घेत आहेत. ३,५,१०,५० व १०० किलोमीटर्स असे यात धावण्याचे टप्पे आहेत. भाग घेणाऱ्या महिलांचा सहभाग वाढतो आहे. त्यांचा आकडा मागील खेपेपेक्षा दुप्पट झाला आहे. महिलांचे आरोग्य, सामर्थ्य आणि सशक्तीकरण यांना जोडणारी ही चळवळ आहे.”
“या ‘रन’ मध्ये २० ते ६० वयोगटातील महिला भाग घेत असून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. कपड्यांचे यात बंधन नसून अगदी साडी नेसून देखील महिला धावतात. साडीमध्ये धावण्याचा सराव करण्यासाठी स्पेशल क्लासेस घेतले जातात. गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांना मुलांची, घरकामाची जबाबदारी असतेच. त्यांना निरोगी व तंदुरुस्त राखण्यासाठी ही धाव आयोजित करणे हा आमचा उद्देश आहे,” असे इन्व्हिन्सिबल वुमेन्स रनच्या संस्थापक अंकिता कोंवर म्हणाल्या.
“ही निव्वळ धाव नसून महिला व समाजाचे सक्षमीकरण करणारी चळवळ आहे. आपण स्वतः यात धावत आहोत,” असे बँक ऑफ बडोदाच्या सस्टेनेबिलिटी, एथिक्स आणि ईसीजी विभागाच्या डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ. निकीता राऊत यांनी या प्रसंगी सांगितले. या निमित्ताने खास महिलांसाठी डिझाईन केलेल्या ‘तियारा’ या बँक ऑफ बडोदाच्या क्रेडीट कार्डचे अनावरण करण्यात आले.