Close

‘इन्साईड आऊट -२’ ने केली ३ अब्ज डॉलर्सची कमाई : सर्व ॲनिमेशन चित्रपटांचे विक्रम मोडले (Blockbuster ” Inside Out 2″ Crossed  Billion Dollar Mark: Breaks The Record Of All Animated Films)

२ जुलै २०२४ डिस्ने आणि पिक्सर यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या इन्साईड आऊट चित्रपटाचा पुढचा भाग इन्साईड आऊट - 2 हा ॲनिमेशनपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता तर या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे ॲनिमेटेड चित्रपटांनी याआधी केलेल्या विक्रमांचे पुनर्लेखन करण्याची वेळ आली आहे. कारण जगभरातील बॉक्स ऑफिसवर इन्साईड आऊट - 2 चित्रपटाचीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत या चित्रपटाने ३ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जगभरातून १ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणूनच सर्वात कमी कालावधीत १ अब्ज डॉलर क्लबमध्ये समाविष्ट होणारा इन्साईड आऊट - 2 हा एकमेव ऍनिमेटेड चित्रपट ठरला आहे.

इन्साईड आऊट - 2 या चित्रपटाने केलेल्या या कामगिरीमुळे याआधीच्या अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत निघाले आहेत. याआधी फ्रोझन - 2 या ॲनिमेशन चित्रपटाने २५ दिवसांत १ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. इन्साईड आऊट - 2 या चित्रपटाने भारतातही उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटाने भारतात केवळ १९ दिवसात १०१.४८ कोटींची (१२.७ दशलक्ष डॉलर्स) कमाई केली आहे. भारतातही सर्वात जलद गतीने १०० कोटी कमावणाऱ्या ॲनिमेशन चित्रपटांच्या यादीत इन्साईड आऊट - 2 या चित्रपटाने वरचा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, भारतात १०० कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील ११ पैकी ८ चित्रपट डिस्ने आणि पिक्सरचे आहेत. यातून या कंपन्यांचे ऍनिमेशन चित्रपट प्रकारातील मजबूत वर्चस्व स्पष्ट होते.

इन्साईड आऊट - 2 या चित्रपटातील पात्रांच्या भावनिक प्रवासाने जगभरातील प्रेक्षकांना आपलेसे केले. मानवी भावनांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे सादर करून आपल्या अंतर्मनातील जगात सुरू असलेल्या गुंतागुंतीचा खोलवर जाऊन अभ्यास करण्याची चित्रपटाची क्षमता यातून स्पष्ट होते. या चित्रपटाविषयीच्या समीक्षात्मक प्रशंसा आणि विक्रमी बॉक्स ऑफिस कमाईने इन्साईड आऊट - 2 चित्रपटाने स्वतःला खऱ्या अर्थाने ऍनिमेशन जगातील पॉवरहाऊस म्हणून सिद्ध केले आहे.

केल्सी मॅन यांनी दिग्दर्शित केलेला इन्साईड आऊट - 2 हा चित्रपट 14 जून 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. एमी पोहलर, माया हॉक, फिलीस स्मिथ, लुईस ब्लॅक, टोनी हेल आणि लिझा लापिरा यांनी या चित्रपटातील प्रेक्षकांच्या लाडक्या ऍनिमेटेड पात्रांना आवाज दिला आहे. मेग लेफोव यांनी लेखन केलेल्या या ऍनिमेटेड चित्रपटाने भारतातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये पिक्सरची जादू कायम ठेवली आहे.

Share this article