Close

बिग बॉस मराठी फेम किरण माने यांनी सोशल मीडियावर तुकाबोंचे विचार शेअर करुन विरोधकांवर जळजळीत कटाक्ष टाकला (Bigg Boss Marathi Fame Kiran Mane Share Tukaram Maharaj Thoughts )

यकी नसलेला उथळ, भंपक, अज्ञानी माणूस कितीही मोठ्या सत्तेच्या - अधिकाराच्या पदावर बसला तरी एक ना एक दिवस तो स्वत:चे गुण उधळायला सुरूवात करतो.. आणि मग चारचौघांत हसं करून घेतो !

वर्चस्ववादी व्यवस्थेत असे भरपूर उथळ लोक भरलेले असतात. उच्चपद सांभाळायला, त्या पदाची गरीमा राखायला संयम, विवेक, बुद्धीमत्ता या गोष्टी अंगी असाव्या लागतात, त्या त्यांच्याकडे नसतात !
अशांची लक्षणं सांगताना तुकोबाराया म्हणतात,

“गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें भेटी केली तेणें ।।
सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ।।
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावूनि टाकी थुंकोनि ।।
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ।।”

....गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी लावून त्याला सजवला तरी ते नंतर उकिरड्यावर जाऊन लोळून तिथली राख अंगाला लावून घेणारच.
...प्रत्येकाच्या अंगी जे ‘सहज गुण’ असतात ते कधीही बदलत नाहीत.
...माकडाच्या गळ्यात मौल्यवान मणी घातला, तरी माकड तो मणी चावून थुंकून टाकतं.
शेवटी तुका म्हणे, “मुर्खाला कितीही हिताचं सांगा.. ते त्याला आवडत नाही. अडाणी आठमुठ्यासारखा तो आपल्याच बिनडोक मतांचा हेका धरून रहातो.”

पटलं का? पटायलाच पाहिजे वो ! आपण आजकाल आसपास अशी लै गाढवं बघतोय, ज्यांनी कटकारस्थानं करून उच्चपदं मिळवलीत. स्वत:च स्वत:ची जाहिरातबाजी करून स्वत:च्याच अंगाला प्रसिद्धीची-यशाची ‘चंदनाची उटी’ लावलीय... पण शेवटी स्वभावानुसार ते निर्बुद्ध बोलबच्चनगिरीच्या उकीरड्यावर लोळतानाच दिसतात ! मग कुणीही येऊन त्यांना टपली मारून जातं. जोकर होतो त्यांचा जोकर. पण याऊलट काहीजण पदावर असो वा नसो, त्यांचा वाघासारखा रूबाब असतो... कारण प्रचंड कष्टानं मिळवलेली विनयशील विद्या त्यांच्या अंगी असते. चेहऱ्यावर ज्ञानाचं तेज असतं. पाठीचा ताठ कणा आणि सत्यवचनी बाणा त्याला आणखी उंचीवर नेऊन ठेवतो. उथळ असलेला उच्चपदस्थ त्याच्यासमोर किरकोळ, छाटछुट वाटू लागतो. म्हणूनच इतिहासाच्या नजरेत लाखोंचे सैन्य बाळगून महाशक्तीमान असलेला औरंगजेब, मूठभर मावळे साथीला असलेल्या छ. शिवरायांसमोर कस्पटासमान आहे.

भावांनो, तुकोबाराया समजून घेतला की लै गोष्टी सोप्या होतात. तुकोबाराया आपल्याला वैचारिक डोळसपणा देतो... अंधभक्तीपास्नं लांब ठेवतो.. आपल्या हितासाठीच त्यानं हा शब्दरूपी खजिना ठेवलाय.. आपल्या आज्ज्यापणज्यांनी जपत - जपत तो आपल्यापर्यन्त पोचवलाय... आपण त्याकडं दुर्लक्ष केलं तर आपल्यासारखे करंटे आपणच.

Share this article