प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही सलमान खान या रिॲलिटी शोचा होस्ट आहे. यंदाची थीम ‘टाइम का तांडव’ आहे. हा शो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ या थीमवर आधारित असेल. बिग बॉस १८ चे घरही या थीमनुसार डिझाईन करण्यात आले आहे. या घरात लेण्या, किल्ले, शिल्पे, मातीची भांडी अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
या वर्षी बिग बॉसच्या घरात छुपे प्रवेशद्वार, छुपे दरवाजे, कॅमेरे आणि काही अशी ठिकाणं आहेत जी कदाचित सहज दिसणार नाहीत. गार्डनमध्ये प्रवेश करताच एक मोठा खांब दिसतो. तिथून एक रस्ता बिग बॉसच्या घरात जातो. बाथरुमची थीम तुर्की हमामपासून प्रेरित आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा ट्रोजन हॉर्स आहे, तिथे बसण्यासाठी जागा आहे. सोशल मीडियावर बिग बॉसच्या घराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लिव्हिंग रूम खूप सुंदर आहे. इथे एका कोपऱ्यात बसायला जागा आहे आणि मध्यभागी एक मोठा डायनिंग टेबल आहे. स्वयंपाकघर एका गुहेसारखे डिझाइन केलेले आहे, तर बेडरूमचा लूक किल्ल्यासारखा आहे. या घरात तुरुंगदेखील आहे, जे स्वयंपाकघर आणि बेडरूमच्या मधे आहे. हे लक्झरी घर बनवण्यासाठी २०० कामगारांनी ४५ दिवस मेहनत घेतली आहे, असं आर्ट डायरेक्टर ओमंग कुमारने सांगितलं.
पाहा बिग बॉसच्या घराची झलक
‘बिग बॉस १८’ हा शो नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी भरपूर नाट्य, ट्विस्ट्स, आणि सरप्राइजेस घेऊन येणार आहे. बिग बॉस १८ चे ६ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता ग्रँड प्रीमियर होईल. हा शो नेहमीप्रमाणे कलर्स टीव्ही वाहिनीवर प्रसारित होईल, तर डिजिटल प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर देखील उपलब्ध असेल. जिओ सिनेमा वर प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे लाइव्ह एपिसोड्स आणि मागील एपिसोड्स पाहता येतील, ज्यामुळे शोचं अपडेट ठेवणं प्रेक्षकांसाठी सोपं होईल.
यंदाच्या ‘टाइम का तांडव’ या थीममुळे शोमध्ये प्रचंड नाट्य निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. “इस बार घर में भूचाल आएगा, क्यूंकी बिग बॉस में टाइम का तांडव छाएगा!” अशी शोची टॅगलाइन आहे. घराच्या इंटिरियरमध्ये या थीमचा प्रभाव दिसेल, आणि याच थीमनुसार स्पर्धकांसमोर वेळेच्या आधारे अनेक आव्हाने असतील. यामुळे प्रेक्षकांसाठी हा शो अधिक रोमांचक ठरेल.
‘बिग बॉस १८’ च्या अधिकृत स्पर्धकांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु माध्यमांमध्ये काही नावं चर्चेत आहेत. यामध्ये लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा समावेश आहे. निया शर्मा, आकृती नेगी, दिग्विजय राठी, हर्ष बेनीवाल, जशवंत बोपन्ना, समीरा रेड्डी, करण वीर मेहरा, चाहत पांडे, अविनाश मिश्रा, आणि शेहजादा धामी अशी काही नावं संभाव्य स्पर्धक म्हणून पुढे येत आहेत.
यंदाच्या पर्वात निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे, हा सीझन पूर्वीपेक्षा अधिक नाट्यमय, अनपेक्षित ट्विस्ट्सने भरलेला असेल. “टाइम का तांडव” या थीममुळे घरातील आव्हाने अधिक रोमांचक ठरतील. विविध स्पर्धकांच्या प्रवेशामुळे आणि नव्या आव्हानांमुळे यंदाचा सिझनमधील नाट्य अविस्मरणीय ठरणार आहे.