आपलं कामजीवन निरोगी असले पाहिजे. तर त्यातून आनंद, समाधान उपभोगता येते. परंतु काही स्त्री-पुरुषांच्या मनात कामसंबंधांविषयी अकारण भीती असते. त्याच्याने कामजीवनाची घडी विस्कटते. भीती, शंका हे कामजीवनातील शत्रू ठरतात. या शत्रूंवर मात कशी कराल?…
काही लोकांच्या मनात शरीरसंबंधांविषयी अनामिक अशी भीती दडलेली असते. ही भीती एकतर आधीपासून असते किंवा मित्र-मैत्रिणींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या अनाहूत सल्ल्यांमुळे निर्माण होते. त्यातून मग मनात भलत्या शंका-कुशंका येऊ लागतात. त्या विनाकारण इतक्या वाढत जातात की, वैवाहिक जीवन धोक्यात येते. म्हणजे सेक्सबद्दल मनात भीती निर्माण झाली की, तो नकोसा वाटतो. ज्या जोडीदाराला नकोसा वाटतो, त्याचा दुसरा जोडीदार मग नाराज होतो नि वैवाहिक संबंधदेखील बिघडतात. असा बिघाड निर्माण होऊ नये म्हणून शरीरसंबंधाविषयीची भीती दूर कशी करता येईल, ते पाहूया.
पुरुषांची भीती
संतुष्ट न करण्याची भीती
शरीरसुख घेण्याच्या कल्पनेनं पुरुषांच्या मनात आणि शरीरात आनंदाच्या लहरी उठत असतात. पण काहींना उगाचच अशी भीती वाटते की, मी पत्नीला पुरेपूर सुख देऊ शकेन की नाही? ती असंतुष्ट तर राहणार नाही… ही भीती निर्माण होण्यामागे काही शारीरिक तसेच मानसिक समस्या असतात. त्यावर मात करण्यासाठी चांगल्या लैंगिक समस्या तज्ज्ञांचा सल्ला त्यांनी घेतला पाहिजे.
लिंग लहान असल्याची भीती
आपल्या लिंगाचा आकार लहान असल्याची भीती काहींना असते. ह्या आकारावरून त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो. अन् मग सेक्स करू की नको, असे त्यांना वाटू लागते. लिंग आखूड असेल तर आपण पत्नीला संतुष्ट करू शकणार नाही, ही भीती अनाठायी आहे. कारण स्त्रीच्या योनीतील केवळ पुढचा लहानसा भाग अति संवेदनशील असतो. त्याला लिंगाचे घर्षण झाले की स्त्री उत्तेजित होते. संतुष्ट होऊ शकते. संपूर्ण योनीत मोठ्या आकाराचे लिंग फिट बसले पाहिजे किंवा त्याच्याने योनीभर घर्षण व्हायला पाहिजे, असे काही नसते. तेव्हा लिंगाचा आकार हा महत्त्वाचा नाहीच.
स्त्रीची कामेच्छा तिप्पट?
पुरुषांपेक्षा स्त्रीची कामेच्छा तिप्पट जास्त असते, मग आपण तिला संपूर्ण संभोगसुख देऊ शकू की नाही, अशी भीती काही कमकुवत मनाच्या पुरुषांमध्ये असते. आपण जर संभोगसुखात कमी पडलो तर आपली पत्नी परपुरुषाशी संबंध जोडेल, असाही संशय त्यांच्या मनात पुढे निर्माण होतो. समस्त पुरुष मंडळींनी लक्षात ठेवावे की, स्त्रीची कामेच्छा जास्त असते, असा काही निसर्ग नियम नाही. तेव्हा मनातील भ्रम दूर करा. संभोग या शब्दाचा अर्थ समान भोग असाही आहे. म्हणजेच संभोगात स्त्री व पुरुष, दोघांनाही समसमान सुख मिळते. ते समसमान देण्या-घेण्यासाठी असल्या संशयाला मनात थारा देऊ नका.
शीघ्रपतनाची भीती
काही पुरुषांमध्ये शीघ्रपतनाची समस्या असते. मला ते होणार तर नाही,या भीतीपोटी ती लवकर निर्माण होऊ शकते. या नकारात्मक विचारांनी पुरुषांच्या कामजीवनावर प्रभाव पडतो. स्तंभनकाल हा अधिक असला म्हणजेच संभोगात दोघांना चांगले सुख मिळते, हा कित्येक पुरुषांचा भ्रम आहे. आपल्या जोडीदारास कामानंद देण्यासाठी कोणी काही वेळ, मुदत ठरवलेली नाही. तेव्हा शीघ्रपतनाची भीती मनातून काढून टाका नि किती वेळ लागतोय, याचा विचार करण्यापेक्षा तो क्षण एन्जॉय करा नि पत्नीला संतुष्ट करा.
नपुंसकत्वाची भीती
आपल्या समाजात नपुंसकता हा मोठा शाप समजला जातो. कधी कधी ऑफिस कामाच्या दडपणाने किंवा धकाधकीच्या जीवनशैलीने लिंगात उत्तेजना येत नाही. थकलेले शरीर आणि तणावग्रस्त मन यामुळे कामेच्छा होत नाही. याचा अर्थ आपल्याला नपुंसकत्व आले की काय, अशी भीती काही पुरुषांच्या मनात निर्माण होते. एका अहवालानुसार, नपुंसकतेच्या 90 टक्के केसेसमध्ये ही कारणे मानसिक असल्याचे आढळून आले आहे. केवळ 10 टक्के केसेसमध्ये शरीरक्षमतेची कमतरता आढळून आली आहे. मात्र या भीतीपोटी पुरुषांच्या मनात कामसुखाबाबत नावड निर्माण होते नि वैवाहिक संबंधात बिघाड निर्माण होतो. परंतु नपुंसकत्वाची शंका जरी आली तरी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कारण हा दोष आता वैद्यकीय औषधोपचाराने तसेच मनोचिकित्सेने सहज घालविता येतो. मात्र भोंदू वैदूंच्या नादी न लागता चांगल्या लैंगिक समस्या व मनोचिकित्सकाकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या.
स्त्रियांची भीती
पुरुषांना सेक्ससंबंधात कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते, ते आपण पाहिलं. परंतु स्त्रियादेखील ह्याला अपवाद नाहीत. स्त्रियांनादेखील अकारण वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असते.
फिगरची भीती
माझं शरीर सुडौल, आकर्षक आहे की नाही? माझी फिगर सेक्सी आहे की नाही, अशी भीती कित्येक स्त्रियांमध्ये आढळून येते. विशेषतः आपले उरोज घट्ट आहेत की नाही, याबाबत त्या मनातल्या मनात प्रश्न विचारत राहतात. पूर्ण कपडे घातले असताना आपले शरीरसौष्ठव लपून राहते, परंतु आपलं पितळ उघडं पडलं तर… असे त्यांना वाटत राहते. खरं म्हणजे प्रत्येक पतीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की, सुडौल उरोज आणि नितंब, सिंह कटी, सपाट पोट, केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या, रेखीव पोटर्या अशी परिपूर्ण फिगर एकवटलेली स्त्री अतिशय दुर्मीळ असते. आपल्यापैकी प्रत्येकीमध्ये काही ना काही उणीव असतेच. आपल्या पतीचे आपल्यावर आपल्या शरीरावर प्रेम आहे. ते प्रेम आपल्याला आकर्षित करतं. म्हणूनच तो शरीरसुखात रममाण होतो. अशी पक्की खूणगाठ बांधून नकारात्मक विचार झटकून शरीरसुख द्या आणि घ्या.
अॅरेंज मॅरेजची भीती
आपल्याकडे अॅरेंज मॅरेजचं प्रमाण अद्यापही जास्तच आहे. अशा ठरवलेल्या लग्नांमधून एकमेकांना नीट समजून घेता येत नाही, अशी भीती कित्येक मुली बोलून दाखवतात. पण ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे. जुन्या काळातील पतीपत्नी लग्नानंतर एकमेकांना उत्तमपैकी समजून घेत होते. सुखाचा संसार करत होते. त्यांच्या संसारात आणि शरीरसुखातही कधी बाधा आलेली नाही. तेव्हा ही भीती अनाठायी आहे. लग्नानंतर अनोळखी पुरुषाबाबत थोडाफार संकोच वाटणारच. पण त्याची भीती न बाळगता, आपली मनःस्थिती नवर्याकडे उघड करावी. म्हणजे संबंध सुलभ होतात.
पहिल्या संभोगाची भीती
ही भीती मात्र मुलींच्या मनामध्ये खर्या अर्थाने असू शकते. ती योग्यच आहे. एकतर पहिल्या मीलनाच्या वेळी कसं होईल, जमेल की नाही या दडपणापोटी योनीसंकोच होतो. अन् महत्त्वाचं म्हणजे त्या नाजूक जागेत पहिल्यांदाच लिंगाचा प्रवेश होणार असतो. त्यामुळे योनीप्रवेशानंतर वेदना होतात. कधी रक्तदेखील येते. पण याची भीती आधीपासून मनात बाळगू नये. ती जर बाळगली नाही, तर या वेदना कमी होतील. प्रत्यक्ष संभोगाआधी तुमच्या जोडीदाराने व्यवस्थित प्रणय केला (ज्याला फोरप्ले म्हणतात) मुलीनेदेखील मनापासून प्रतिसाद दिला तर योनीमार्गात नैसर्गिक स्त्राव उत्पन्न होऊन या वेदना सुखद वाटतील. संभोग करतेवेळी घिसाडघाई करू नये.
पाळी दरम्यान सेक्सची भीती
मासिक पाळी दरम्यान कित्येक महिलांना कंबर, ओटीपोटात खूप वेदना होतात. पाय दुखतात. महिन्याच्या या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. तेव्हा यावेळी कामसुख घेण्याची अथवा देण्याची तिची मानसिक व शारीरिक तयारी नसते. तरीही काही पुरुषांना अशा वेळी ते सुख हवं असतं. तेव्हा पत्नीच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे. पुरुषांनी समजूतदारपणा दाखवून स्त्रीच्या मासिक पाळीत कामसंबंध टाळले पाहिजेत. थोडा संयम राखणे आवश्यक आहे. शास्त्रीयदृष्ट्या विचार करता, मासिक पाळी दरम्यान संबंध गैर नाहीत. ज्यांना झेपतं, त्या स्त्रिया समागमाचा आनंद घेतात.