जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाईपण भारी देवा पुन्हा सिनेमागृहांत रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट, आतंरराष्ट्रीय महिला दिना निमित्त म्हणजेच ७ मार्च पासून आपल्या सख्यांना भेटायला येत आहे.
२०२३ मध्ये रिलीज होताच या चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाईपण भारी देवा चं एकूण कलेक्शन हे तब्बल ७६.५ कोटींचं होतं, तर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनानंतर यानं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेतच त्यात अजून एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-44-450x800.png)
'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटर्समध्ये चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसतात आहेत.
आणि यातील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आज प्रदर्शित होत असलेल्या ‘छावा‘ या चित्रपटा बरोबर ‘बाईपण भारी देवा‘ चा ट्रेलर दिसणार आहे. आणि म्हणूनच आज निर्मात्यांनी आपल्या सोशल मिडियावर चित्रपट पुनः रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-45-640x800.png)
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, "बाईपण भारी देवा' हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी आमच्या संपूर्ण टीमवर केलेला प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूपच स्पेशल आहे. जिओ स्टुडिओजच्या सहयोगाने आता पुनः तो उत्सव सिनेमागृहांत अनुभवता येणार आहे. महिला दिनाच्या निमित्त पुन्हा प्रेक्षक आवर्जुन सिनेमागृहांत आपल्या सख्यांना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिलाय ते नवीन प्रेक्षक ही मनोरंजनाच्या या उत्सवात सामिल होतील अशी मला खात्री आहे".
ट्रेलर लिंक –https://youtu.be/ZxXd3CHswv8?si=ykV9GpWgdz-mi-H0
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले तसेच ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित, रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब चौधरी, आणि सुकन्या कुलकर्णी मोने अभिनीत, साई - पियूष द्वारे संगीतबद्ध केलेले संगीत, वैशाली नाईक द्वारे लिखित आणि केदार शिंदे दिग्दर्शित "बाईपण भारी देवा" ७ मार्च २०२५ पासून चित्रपटगृहात पुनःप्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.