Close

अश्विनी महांगडे शेअर केला बाबांचा किस्सा, म्हणाली फोटोसाठीची नुसती झुंबड आणि… ( Ashvini Mahangade Share Her Fathers Memory)

माझ्यासोबत इव्हेंट साठी बऱ्याचदा नाना यायचे. एका कार्यक्रमाला गेलो आणि तिथे आलेल्या महिलांनी फोटो फोटो करत धरपकड सुरू केली. कोणी एकीकडे ओढते तर कोणी दुसरीकडे. बरं अशा कार्यक्रमामध्ये महिला असतील तर पुरुष आत शिरत नाहीत. मला समजेना या गोंधळात माझी मदत कोणीच का करेना. नाना मध्ये शिरले आणि मला बाजूला घेतले. नंतर मात्र ग्रुप करून सगळ्यांना फोटो देवून मी गाडीत बसले. डोकं दुखायला लागलं, चिडचिड झालेली, दमलेले.
नानांनी मला शांत होवू दिले आणि मग माझ्याशी बोलायला सुरुवात केली.


मला म्हणाले ताई, तुझा कार्यक्रम असेल तर आजूबाजूच्या महिलांना साधारण 10 दिवस आधी समजते की आपल्याकडे अश्विनी महांगडे येणार आहे. असं समज की तुझे फ्लेक्स पाहून एका महिलेला समजले की तू येणार आहेस तर ती 10 दिवस आधीच मनात स्वप्नं पहायला लागते की मी कार्यक्रमाला जाणार. मग शेजारच्या बाईला सांगत असेल की तू येणार आहेस. मग त्यांची चर्चा होत असेल की साडी कोणती नेसायची, लवकर गेलो तरच पुढे खुर्ची मिळेल त्यामुळे लवकर जायचे. कारण तिला तुला भेटायचे असते #कलाकार आहेस म्हणून. जसं जसा तो दिवस जवळ येत असेल ती महिला मनात ठरवत असेल की 1 फोटो तर घेणारच मी.


शेवटी कार्यक्रमाचा दिवस उजाडत असेल. कार्यक्रम संध्याकाळी असतो, कार्यक्रम संपवून घरी जायला, जेवण बनवायला उशीर झाला तर नवरा, मुलं, सासू सासरे उपाशी. मग ती जण्याआधी भाजीची सगळी तयारी करून ठेवत असेल किंवा भाजी, भात करून घरी आल्यावर भाकरी करू मग होईल पटकन असा विचार करून, घरातले सगळे आवरून, स्वतः छान तयार होवून, तू पोहोचण्या आधी किमान 2 तास लवकर जावून जागा पकडून बसत असेल.


फक्त तुला ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि एका फोटोसाठी.
हा एवढा 10 दिवसांचा प्रवास तिने आनंदाने केला, स्वप्नं पाहिले.
आपण कलाकार म्हणून किमान तिचे ते स्वप्नं पूर्ण नाही का करू शकत??
बापरे..... एवढा विचार मी कधीच केला नाही. पण नानांनी मला एका सुंदर गोष्टीतून सत्य समजून सांगितले.
त्यानंतर जेवढे कार्यक्रम झाले, लग्नासाठी कुठे गेले तरी मी तिथे आलेल्या महिलांना त्यांना हवा तेवढा वेळ दिला आणि फोटो सुद्धा.


नाना म्हणायचे तुझ्यासाठी तो 500 वा फोटो असेल तर त्या माणसासाठी #पहिला आणि #अंतिम.
शिवाय घरी जावून ती महिला पुढचे किती तरी दिवस त्याच आनंदात राहील.
नानांनी खूप शिकवले त्यातली ही एक गोष्ट. Love you #नाना...

प्रेक्षकांचे प्रेम कशात आहे हे समजले की सगळे सोप्पे होते..
पण ती गोष्ट सोप्पी करून सांगणारा #बापमाणूस सोबत हवा.... 

Share this article