बरेचदा मेकअप करताना काही महत्त्वाच्या गोष्टी, मेकअप रूल्स ध्यानात घेतले जात नाहीत. हे टाळण्यासाठी, तसंच आपण केलेला मेकअप शोभून दिसावा यासाठी, या काही टिप्स-
रोजचं कॉलेज-ऑफिसमध्ये जाणं असो किंवा सण-समारंभ-पार्टी... हल्ली मेकअप करणं अगदी कॉमन झालं आहे. बर्याच जणींच्या बाबतीत, काही नाही तर, केवळ काजळ आणि लिपस्टिक, असा मिनिमल मेकअप तर अगदीच मस्ट असतो. कारण हा मेकअप तिचं सौंदर्य अधिक आकर्षक करतो. असं असलं तरी, बर्याच जणींना त्यांनी केलेला मेकअप शोभून दिसत नाही. मेकअप शोभून दिसत नाही, असं म्हटलं तर अगदीच विरोधाभास ठरेल. पण असं होतं, कारण हा मेकअप करताना काही महत्त्वाच्या गोष्टी, मेकअप रूल्स ध्यानात घेतले जात नाहीत. हे टाळण्यासाठी, आपण केलेला मेकअप शोभून दिसावा यासाठी, या काही टिप्स-
बेस मेकअप
बेस मेकअप मध्ये कलर करेक्टर, फाउंडेशन, कंसिलर, कॉम्पॅक्ट आणि प्रायमर या पाच सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो.
- सर्वप्रथम कलर करेक्टर चेहर्यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेचा टोन एकसमान दिसेल.
- आता फाउंडेशन लावून, ते चेहर्यावर व्यवस्थित पसरून एकजीव होईल याची काळजी घ्या.
- डोळ्यांच्या खाली, चेहर्यावरील डागांवर आणि जिथे गरज असेल तिथे कंसिलर लावा.
- कॉम्पॅक्टने बेस मेकअपला फिनिशिंग टच द्या.
- डोळ्यांभोवती गडद काळी वर्तुळं असतील तर कंसिलर जास्त लावा.
- कलर करेक्टर वापरायचा नसेल, तर जिथे गरज असेल तिथे कंसिलर लावूनही एकसमान स्कीन टोन मिळवता येईल.
- टी झोनवर प्रायमर लावा. यामुळे तेलकट त्वचेचा समतोल साधला जाईल आणि फाउंडेशनही अधिक काळ टिकेल.
- फाउंडेशनची निवड करताना लक्षात ठेवा की, तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा एक छटा ते गडद असेल.
- फाउंडेशनची रंगछटा तपासण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी ते तुमच्या जॉ-लाइनवर लावून पाहा.
- याव्यतिरिक्त तुम्ही फाउंडेशनच्या तीन शेड एकत्र तुमच्या गालांवर लावून पाहू शकता. जी शेड तुमच्या त्वचा रंगात व्यवस्थित एकजीव होईल, तिचीच निवड करा.
- तेलकट त्वचेसाठी मॅट आणि सामान्य व कोरड्या त्वचेसाठी क्रिमी किंवा मॉइश्चरायझिंग फाउंडेशनची निवड करा.
- तुम्ही फाउंडेशनच्या दोन वेगवेगळ्या शेड्सच्या मदतीने तुमच्या त्वचा रंगाशी सुसंगत शेड तयार करू शकता.
- फाउंडेशन नेहमी चेहर्याच्या मध्य भागापासून सुरू करून बाहेरच्या दिशेने पसरवत लावा. यामुळे तुम्हाला परफेक्ट परिणाम मिळेल.
- गळा, कान आणि मानेवरही फाउंडेशन लावायला विसरू नका.
- फाउंडेशन नेहमी खिडकीजवळ किंवा नैसर्गिक उजेडात उभं राहूनच लावा. यामुळे बाहेर पडल्यावर तुमचा मेकअप कसा दिसेल, याचा तुम्हाला अंदाज येईल.
लिपस्टिक
लिपस्टिक निवडण्यासाठी अर्थातच शेड कार्डचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र शेड कार्डवरील लिपस्टिक्सच्या शेड्स आणि प्रत्यक्षात त्या लिपस्टिकचा रंग यांमध्ये बरेचदा तफावत असते. अशा वेळी लिपस्टिक टेस्टरचा वापर करून निवड करणं योग्य ठरतं.
- लिपस्टिकची निवड करताना लक्षात घ्या की, दिवसा तुम्ही लिपस्टिकची जी शेड लावता, ती तुम्हाला रात्रीही सूट करेल, हे जरुरी नाही.
- दिवसा मॅट फिनिश आणि रात्रीच्या वेळी ग्लॉस फिनिश असलेली लिपस्टिक उत्तम दिसते. दिवसा सौम्य रंग आणि रात्री गडद रंग अधिक आकर्षक दिसतात.
- ओठांचा मेकअप सुरू करण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप पूर्ण करून घ्या. त्यानंतर पेट्रोलियम जेली लावून ओठांवरील सुकलेली त्वचा काढून टाका. त्यानंतर थोडा लिपबाम लावा.
- आता ओठांना परफेक्ट बेस देण्यासाठी त्यावर फाउंडेशन लावा.
- त्यानंतर ओठांवर लिप लायनर लावा. ओठांचा आकार लक्षात घेऊन लिप लायनर लावायला हवं. ओठ मोठे असतील, तर लिप लायनर ओठांच्या मूळ आकाराच्या आतल्या बाजूला लावा. तसंच ओठ लहान-पातळ असतील, तर लिप लायनर ओठांच्या मूळ आकाराच्या बाहेरच्या बाजूने लावा.
- लिप लायनर लावल्यानंतर लिपस्टिक लावा. लिप लायनर आणि लिपस्टिकच्या रंगछटेत जास्त फरक नसेल याची काळजी घ्या. एक शेड सौम्य किंवा गडद असल्यास हरकत नाही.
- लिपस्टिक लावल्यावर ती हळूहळू ब्लेंड करा. लिपस्टिकचा पहिला कोट लावल्यानंतर ओठांमध्ये टिश्यू पेपर धरून हळुवार दाब द्या आणि त्यानंतर लिपस्टिकचा दुसरा कोट लावून फायनल टच द्या.
- ग्लॉसी लूक हवा असल्यास लिपस्टिक लावल्यानंतर लिप ग्लॉस लावा.
- तुमच्या ओठांचा आकार ध्यानात घेऊन लिपस्टिकच्या शेडची निवड करा. ओठ जाड असतील, तर गडद रंगाची लिपस्टिक लावा. कारण सौम्य रंगाची लिपस्टिक लावल्यास ओठ अधिकच जाडसर दिसतात, तर गडद रंगाच्या लिपस्टिकमुळे ओठ बारीक दिसतात.
- तुमचा त्वचा रंग गोरा असेल, तर सौम्य रंगछटेची लिपस्टिक आणि तुम्ही गहुवर्णीय किंवा कृष्णवर्णीय असाल तर गडद रंगाची लिपस्टिक लावा, जसं की- प्लम किंवा डार्क ब्राउन इत्यादी.
आयशॅडो व आयलायनर
- तुमच्या बुबुळांचा रंग गडद तपकिरी असेल, तर ब्रॉन्झ, कॉपर किंवा ब्राउन रंगाच्या आयशॅडोची निवड करा. ग्लॅमरस लूकसाठी हिरव्या रंगाचा आयशॅडो निवडता येईल.
- बुबुळांचा रंग काळा असल्यास, तुम्हाला कोणत्याही रंगाचा आयशॅडो निवडता येईल. ब्राउन, सॉफ्ट गोल्ड किंवा ग्रे आयशॅडो तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य अधिकच खुलवेल.
- बुबुळांचा रंग निळा असल्यास, टरकॉइज, सिल्व्हर, फुशिया अशा गडद रंगाचा आयशॅडो लावा.
- डोळे गोल असल्यास, डोळ्यांच्या कोनातून बाहेर निघत मेकअप करा. यामुळे डोळे मोठे भासतात.
- डोळे जवळ-जवळ असतील किंवा थोडा वेगळा लूक हवा असेल, तर पापण्यांच्या आउटर एजच्या जरा वरून आयशॅडो किंवा आय कलर लावा आणि आतल्या कोपर्यात हायलाइट करा.
- आयशॅडो किंवा आय कलर पापण्यांच्या जरा वर, बाहेर किंवा डोळ्यांच्या खाली लावून डोळे मोठे भासवता येतात.
- डोळे खोल गेले असतील, तर आयलिडवर कानाजवळ थोडा आयशॅडो लावा आणि उर्वरित डोळ्यांवर कोणताही मेकअप करू नका.
- इव्हनिंग पार्टीसाठी जाताना डोळ्यांना स्मोकी लूक द्या. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लूक मिळेल.
- आयशॅडोच्या विविध रंगांचा वापर करत असाल, तर ते रंग व्यवस्थित ब्लेंड करा. यामुळे दोन रंगांच्या मध्ये हार्श लाइन दिसणार नाही.
- आयलायनर लावताना आयलिड कधीही खेचून धरू नका. यामुळे लायनरचा शेप खराब होतो.
- सण-समारंभ, पार्टीसाठी तयार होत असाल, तर गोल्डन, ब्रॉन्झ किंवा सिल्व्हर रंगाचं आयलायनर लावा.
ब्लशर
- ऑफिसमधील पार्टीसाठी मेकअप करताना, ब्लशरचा वापर जरूर करा. त्यामुळे तुम्हाला ड्रेसी आणि पॉलिश्ड लूक मिळेल.
- गाल आकर्षक दिसावेत असं वाटत असेल, तर चिक अॅपल्सना पिंक किंवा अॅप्रिकॉट रंगाचा ब्लशर लावून हायलाइट करा.
मस्कारा
मस्कार्याची निवड करताना परफेक्ट ब्रशची निवड करणं गरजेचं आहे. हे ब्रश दोन प्रकारचे असतात. एक फुल व्हॉल्युम इफेक्ट देतो आणि दुसरा हाय डेफिनेशन लॅशेस. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यातील योग्य ब्रशची निवड करू शकता.
- मस्कारा खरेदी करण्यापूर्वी तो सुकलेला तर नाही ना, याची खात्री करून घ्या.
- मस्कारा खरेदी करताना किंवा लावताना ब्रश वारंवार आत-बाहेर करू नका. यामुळे बॉटलमध्ये हवा भरते आणि मस्कारा लवकर खराब होण्याची शक्यता असते.
- दररोजच्या वापरासाठी वॉटरप्रूफ मस्कारा घेऊ नका.
- पापण्यांचे केस (आयलॅशेस) दाट असतील, तर क्लिअर किंवा ट्रान्स्परंट मस्कार्याचीच निवड करा.
- कॉन्टॅक्ट लेन्सेस लावायच्या असतील, तर त्या मस्कारा किंवा एकंदरच डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यापूर्वी लावा.
- मस्कारा नेहमीच पापण्यांच्या केसाच्या मुळापासून टोकापर्यंत, याप्रमाणे लावा. यामुळे केस लांब भासतात. मस्काराचे दोन-तीन कोट लावा.
- ब्रशमध्ये जास्त प्रमाणात मस्कारा आला असेल, तर तो टिश्यू पेपरने पुसून कमी करा.
- मस्कारा लावताना, तो डोळ्यांच्या आजूबाजूला लागला, तर तो सुकल्यानंतर पुसा. यामुळे मस्कारा पसरणार नाही आणि तुमचा मेकअपही खराब होणार नाही.
- वरच्या आयलॅशेससाठी वरच्या बाजूस स्ट्रोक देऊन आणि खालच्या आयलॅशेससाठी खालच्या बाजूस स्ट्रोक देऊन मस्कारा लावा. यामुळे आयलॅशेसना आकर्षक आकार मिळेल.
- मस्कारा काढून टाकण्यासाठी अल्कोहोल-फ्री क्लिंजरचा वापर करा.
- मस्कारा दाट झाला की, तो पातळ करण्यासाठी पाणी किंवा अॅसिटोनचा वापर करा.
- डोळ्यांची अॅलर्जी असेल किंवा डोळ्यांना सूज असेल, तर मस्कारा लावू नका.
- तुमचे डोळे अतिशय लहान असतील, तर काळा आयलायनर आणि मस्कारा लावू नका. त्यामुळे डोळे अधिकच लहान दिसतात. अशा डोळ्यांसाठी निळा रंग परफेक्ट आहे.
- डोळ्यांभोवती काळी वर्तुळं असल्यास, खालच्या आयलॅशेसवर मस्कारा लावू नका.
- तुमचा रंग अतिशय गोरा असल्यास, काळ्याऐवजी गडद तपकिरी रंगाचा मस्कारा लावा. यामुळे तुम्हाला सॉफ्ट लूक मिळेल.
सौंदर्यवर्धक मुळा (Easy Makeover Through Radish)