आंबा हे फळ भारतातच नव्हे, तर जगभरातही इतर फळांपेक्षा आवडतं फळ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अनेक धार्मिक विधींमध्ये आंब्याचा मोहोर, पानं इत्यादी पवित्र, तसंच आवश्यक मानली जातात
‘आंबा पिकतो रस गळतो…
कोकणचा राजा झिम्मा खेळतो…”
असं एक बालगीत आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. आणि ते खरंही आहे म्हणा! कारण आंबा हे अमृतफळ आहे. कोकण प्रदेशाला आंब्याने समृद्ध केलं आहे. ग्रीष्मात घरोघरी आमरसाचा बेत असतो. आंब्याला भारताच्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. आंबा हे भारतासोबतच पाकिस्तानचंही ‘राष्ट्रीय झाड’ आहे, तर फिलिपाइन्सचं ‘राष्ट्रचिन्ह’ आहे. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, रायवळ इत्यादी जाती आहेत.
कच्च्या आंब्याला ‘कैरी’ असं म्हणतात, कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो, तर पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूला सूर्याचं ऊन लागेल, त्या बाजूचा लाल रंग, तर जी बाजू सावलीत येते तिथला पिवळसर रंग होतो.
औषधी गुणधर्म
आंब्याला संस्कृतमध्ये ‘आम्र’ तर तामिळ भाषेत ‘मानके’ किंवा ‘मानगास’, तर इंग्रजीत ‘मँगो’ असं म्हणतात. आंब्याच्या गरामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम व जस्त यांचं प्रमाण अधिक असतं. आंब्याबरोबरच आतली कोयसुद्धा औषधी गुणधर्म असलेली आहे. अतिसार, जुलाब यावर आंब्याच्या कोयीतील बियांचं चूर्ण मधातून घेतल्याने आराम पडतो. आंबा हा सारक, मूत्रल व फुफ्फुस किंवा गर्भाशयातून होणार्या रक्तस्रावावर उपयुक्त आहे. आंब्याची साल स्तंभक, म्हणजेच आकुंचन पावणारी व शक्तीवर्धक असल्यामुळे ती जनावरांना खायला घालतात.
आवडतं फळ
पिकलेला आंबा थंड, बल वाढवणारा आहे. उन्हाळ्यात दुपारच्या समयी कैरीचं पन्हं प्राशन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. कैरीचा गर, गूळ यापासून पन्हं करतात. हे पन्हं तहान भागवणारं, दाहनाशक आहे. उन्हाळ्यात नुसतं पाणी पिऊन तहान
न भागल्यास कैरीचं पन्हं घ्यावं. आंबा हे असं रसाळ फळ आहे, ज्याच्या रसात दूध मिसळून खाण्यास अनोखी मज्जा असते.
आंब्याचा आकार, रंग, गंध, गराचा दाटपणा इत्यादी गुण त्याच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळे असतात. आंबा हे फळ भारतातच नव्हे, तर जगभरातही इतर फळांपेक्षा आवडतं फळ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अनेक धार्मिक विधींमध्ये आंब्याचा मोहोर, पानं इत्यादी पवित्र, तसंच आवश्यक मानली जातात.