२० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जीची बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आयशा कपूर आता मोठी झाली आहे. तिने तिच्या आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आयशाने लग्न केलं आहे, तिच्या लग्नातील काही फोटो समोर आले आहेत.
आयशाने दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये शीख परंपरेनुसार तिचा बॉयफ्रेंड ॲडम ओबेरॉयशी लग्न केलं. लग्नात गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ३० वर्षांची आयशा खूपच सुंदर दिसत होती. तिने सोशल मीडियावर शुभेच्छांच्या स्टोरीज रिपोस्ट केल्या आहेत. यामध्ये तिच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे.

संजय लीला भन्साळी यांचा ‘ब्लॅक’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. आयशा कपूरने राणीच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या रणबीर कपूरने आयशाला या सिनेमासाठी प्रशिक्षण दिलं होतं. आयशाचं या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी खूप कौतुक झालं होतं.


लग्नापूर्वी आयशाने तिच्या गर्ल गँगबरोबर बॅचलोरेट पार्टीही केली होती. केरळमधील कोवलम बीचवरील पार्टीचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आयशा सध्या इंटिग्रेटिव्ह न्यूट्रिशन हेल्थ कोच म्हणून काम करते. आयशाचा जन्म ऑरोविले, तामिळनाडू येथे झाला. ती लक्झरी ब्रँड हायडिझाईनचे संस्थापक दिलीप कपूर यांची मुलगी आहे.
‘ब्लॅक’ चित्रपटातून यशस्वी पदार्पण केल्यानंतर आयशाने २००९ मध्ये आलेल्या ‘सिकंदर’ चित्रपटात बालकलाकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. ती शेखर कपूरच्या ‘पानी’मध्ये सुशांत सिंह राजपूतबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होती, पण हा चित्रपट बनला नाही. २०२२ मध्ये तिने ‘हरी का ओम’ मधून पुनरागमन करण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर तिने याबद्दल कोणतीच अपडेट दिलेली नाही.