आंबोशीचे लोणचे
साहित्यः 1 वाटी आंबोशी, 1 वाटी गूळ, 2 चमचे लाल मोहरी, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 2 चमचे तेल, मोहरी, हिंग, हळद, 4 लाल मिरच्या.
कृतीः प्रथम आंबोशी गरम पाण्यात घालून ठेवावी. ती मऊ झाल्यावर 2 चमचे तेलाची फोडणी करावी व त्यात लाल मिरच्या आणि आंबोशी घालावी. ती शिजल्यावर त्यात गूळ, मीठ, तिखट घालून पातेले गॅसवरून खाली उतरावे. मोहरीत पाणी घालून बारीक वाटावी. वरील मिश्रणात हे मोहरीचे वाटण घालावे. खाण्यास आंबट-गोड असे छान लागते.
कैरीचा टक्कू
साहित्यः कैर्या, तिखट, मीठ, जिरेपूड, साखर.
कृतीः कैर्या किसून वरील सर्व जिन्नस चवीप्रमाणे मिसळून लगेचच खाण्यास द्यावे. हे जास्त टिकत नाही.
खार कैरी
साहित्यः 25 कैर्या, 1 किलो मीठ, कैर्या बुडतील इतके पाणी.
कृतीः कैर्या धुऊन, पुसून, डेख काढून त्यांत मीठ घालावे व ह्या कैर्या बुडतील इतके पाणी घालावे. चिनी मातीच्या बरणीत घट्ट झाकण लावून थंड ठिकाणी ठेवावे. वर्षभर ही कैरी ताजीच राहते. आपणास हवी तेव्हा कैरी काढून उपयोगात आणू शकतो.