ऋतुमानानुसार हवामानात तसेच वातावरणात होणार्या बदलाचा सर्वाधिक परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. सध्या थंडीचा मोसम सुरू आहे. या दिवसात त्वचा रूक्ष व निस्तेज होते. परंतु, योग्य पद्धतीने तिची निगा राखल्यास ती सुंदर व आरोग्यदायीही ठेवता येते.
पूर्वी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांमध्ये पहाटे थंडीनं कुडकुडायला होत असे. परंतु सध्या निसर्गाचं चक्रच अनियमित झालं आहे. बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, उष्णता, थंडी, वारा तसेच वय या सगळ्या बदलांचा सगळ्यात वाईट परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचा ही संपूर्ण चेहर्यालाच नव्हे, तर संपूर्ण शरीराला झाकणारी संरक्षक भिंत आहे.
सौंदर्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण पायाभूत पायरी असतानाही बहुतांशी भारतीय महिला त्वचेची नियमित काळजी घेणं, त्वचेची आर्द्रता राखून ठेवणं, याकडे दुर्लक्ष करतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी, रूक्ष दिसू लागली की बाजारातून कोल्ड क्रीम आणून वापरतात. परंतु जाहिरातींना भुलून चेहर्यास क्रीम लावणं म्हणजे त्वचेची काळजी घेणं नाही. खरंतर निरोगी व सुंदर त्वचेसाठी वर्षभर तिची काळजी घ्यायला हवी, पण हिवाळ्यात ती अधिक घ्यावी लागते. थंडीच्या दिवसात महागडी सौंदर्य उत्पादनं वापरण्यापेक्षा काही सोप्या गोष्टी करूनही त्वचेची काळजी घेता येते.
भरपूर पाणी प्या
त्वचा निरोगी राहण्यासाठी तसेच त्वचेतील आर्द्रतेसाठी पाणी हा आवश्यक घटक आहे. परंतु हिवाळ्याच्या दिवसात फारशी तहान लागत नाही. अनायसे पाणी कमी प्यायलं जातं. त्यामुळे घाम येण्याचं प्रमाणही कमी होतं. याचा परिणाम म्हणजे त्वचा रूक्ष होते. तसेच त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी पडणे, खाज सुटणे असे त्रासही होऊ लागतात. म्हणून अधिकाधिक पाणी प्यावं. त्वचा सतत मॉइश्चराइज करणं ही त्वचेची देखभाल करण्याची नियमित प्रक्रिया आहे. यामुळे तिचा ग्लो कायम राहतो व त्वचा आरोग्यदायी राहते.
साबणाचा वापर
आंघोळ करताना शक्यतो साबणाचा वापर टाळा. ग्लिसरीन सोप किंवा मॉइश्चरायजिंग बॉडीवॉशचा वापर करा. किंवा सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. थंडीच्या दिवसात खोबरेल तेल, अरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे.तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलंही तेल थोड्या प्रमाणात घालावं. म्हणजे त्वचेचं आपोआप मॉइश्चरायजिंग होतं.
मॉइश्चरायजर्स
घरच्या घरी मॉइश्चराइजर करायचं झाल्यास लिंबूरस, गुलाबपाणी आणि ग्लिसरीन सम प्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावा. यामुळे त्वचा दिवसभर मऊ राहते.
लोशन्सच्या स्वरूपातली मॉइश्चरायजर्स अतिशय हलकी असतात. तर क्रीम स्वरूपातली मॉइश्चरायजर जास्त घट्ट, स्ट्राँग असतात. त्यामुळे अधिक कोरड्या त्वचेसाठी लोशनपेक्षा क्रीमचा पर्याय चांगला आहे. परंतु बाजारातील कोणतंही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेचा पोत कसा आहे हे आपल्याला माहीत असायला हवं. ते माहीत नसल्यास त्वचा तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच क्रीम्सचा वापर करा.
एकच मॉइश्चरायजर वर्षभर वापरणं हे पूर्णत: चुकीचं ठरतं. हिवाळ्यात ऑइंटमेंट बेस्ड मॉइश्चराइजर वापरणं हा उत्तम पर्याय असतो. तसंच चेहर्याला लावायचे मॉइश्चराइजर वेगळे असतात आणि अंगाला, हाता-पायांना लावण्यासाठी वेगळ्या प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतं. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा तजेलदार दिसते.
लीप बाम
चेहरा कसाही असला तरी नाजूक गुलाबी ओठांनी त्याचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. परंतु ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडून त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यासाठी अधिक प्रमाणात पाणी प्या आणि झोपतांना ब्रँडेड लिप बामचा वापर करा. ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय, घरचं ताजं लोणी किंवा साजूक तूप लावून ठेवण्याचाही फायदा होतो. लक्षात ठेवा, ओठांना वारंवार जीभ लावू नका.
पायात मोजे आणि पादत्राणे
थंडीमुळे तळपायांना, विशेषतः टाचांना भेगा पडणे, भेगांमधून रक्त येणे यासारख्या तक्रारीही उद्भवतात. अशा वेळी तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे उपयोगी ठरते. हे नाही जमलं तर बाजारात फूट क्रीमही उपलब्ध असते.
आहार
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने हिवाळा हा ऋतू अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं आयुर्वेदात सांगितलं आहे. म्हणूनच या काळात त्वचेच्या काळजीसोबतच संतुलित आहार घ्यावा. आहारात अ, इ1, इ2 जीवनसत्त्वं असलेल्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश करावा. डेअरी उत्पादनं, धान्य उत्पादनं, अंडी, मांस आणि हिरव्या पालेभाज्या खा.
त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात भरपूर द्रवपदार्थही असू द्यात. त्यातून आपोआपच नैसर्गिक पद्धतीनं आपण आपल्या त्वचेचं संरक्षण करू शकतो.