Close

आजही त्या वळणावर… (Ajahi Thya Valanaver)


आनंदाश्रमातले हे दिवस पुन्हा जुन्या आठवणी समोर आणतील, असं अपेक्षितच नव्हतं. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची स्टडी टूर एखाद्या गावातील संस्थेचं काम पाहण्यासाठी न्यावी, हा माझाच आग्रह होता. कदाचित तुझी भेट न ठरवता घडण्यासाठी नियतीनेच काहीतरी घडवलं असावं. लहान मुलांच्या शिक्षणासाठी भरीव काम करणारी…
विविध पुरस्कारप्राप्त अशी तुझी शाळा. अशा शाळेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आलो तेव्हा खरंच तू निवडलेला मार्ग
मला कधीतरी इथे घेऊन येईल असं वाटलं नव्हतं. कोणाला तरी हसू वाटण्याचा… कोणाला तरी आनंद वेचायला शिकवण्याचा तुझा मार्ग तुला वेगळ्या वाटेवर घेऊन गेला.
आपलं कॉलेजचं शेवटचं वर्ष. एमएसडब्ल्यूचा अभ्यास जवळजवळ संपत आला होता. चार वर्षांची आपली ओळख लग्नात परावर्तित व्हावी, असं मनापासून मला वाटत होतं. मी विषय काढला की, तू मात्र एकही शब्द बोलायची नाहीस. तुझ्यासोबतचं तेव्हाचं आखीव-रेखीव नातं जगताना तू मात्र सारे बंध मोकळे करायचं ठरवलंस. आपण जे अभ्यासलं त्याचा खराखुरा अर्थ, आनंद तुला घ्यायचा होता. तू जेव्हा पूर्ण वेळ समाजसेवा करण्याचं ठरवलंस, तेव्हा माझी ‘ना’ नव्हतीच.
पण आपल्या चौकटीतील रेखीवता संपवून तुला वेगळ्या वाटेवर चालायचं होतं. हसू विसरलेल्यांना जगायला शिकवायचं, तुझं स्वप्न पूर्ण करायचं होतं… जी वेदना मला कधी पूर्णत्वाने नाही समजून घेता आली.
नातं तुटण्यापेक्षा ते हळूहळू मिटणं जास्त चांगलं असतं. काही गोष्टी भांडून संपतात, काही चर्चेनंतर… पण काही वेळा असं काहीच करावंस वाटत नाही. तसंच काहीसं आपल्याबाबतीत झालं. प्रत्येकालाच आयुष्यात अ‍ॅडजस्टमेंट करावी लागते.
पण ही अ‍ॅडजस्टमेंट स्वतःला पूर्ण बदलवणारी नसावी इतकीच माझी मागणी होती. स्वतःचं अस्तित्व संपवून फार काळ दुसर्‍याला हवं तसं बनता येत नाही. कारण असं नातं फार काळ टिकणारं नसतं.
तू माझा निरोप घेणं अशक्य होतं म्हणून मीच तो घेतला.
पण आता लक्षात येतंय, डोळ्यात स्वप्न घेऊन केवळ चौकटीतलं हसू चेहर्‍यावर बाळगत आपलं आयुष्य संपून गेलंय.
नातं निर्माण होण्याआधी एकमेकांच्या स्वप्नावर भाळलेलो आपण… जे नातं इतक्या हळुवारपणे उलगडलं तितक्याच हळुवारपणे आज मिटल्या अवस्थेत आहे. या नात्याला पूर्णविराम मिळाला आहे का, याचं उत्तर माझ्याकडे नाही.. पण ते आजही एका वळणावर जिथं सोडून दिलं आहे तिथंच आहे, मिळालेल्या आकार उकाराच्या शोधात…

  • तुझाच,
    समर

Share this article