चित्रसृष्टीतील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन्स या निर्मितीसंस्थेमध्ये आघाडीचे उद्योगपती अदर पूनावाला यांनी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सीरिन प्रॉडक्शन आणि करणच्या धर्मा प्रोडक्शन्स यांच्यात तसा करार झाला. या गुंतवणुकीनंतर धर्मा प्रॉडक्शन्स व धर्माटिक इंटरटेनमेन्ट आणि सीरिन प्रॉडक्शन यांची प्रत्येकी ५० टक्के भागीदारी असेल.
धर्माच्या कलात्मक निर्मितीची बाजू करण जोहर कार्यकारी अध्यक्ष या नात्याने तर कंपनीची व्युहात्मक दिशा व व्यवसायाची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता सांभाळतील. “करण जोहर हे माझे चांगले मित्र असून त्यांच्या मोठ्या निर्मिती संस्थेची भागीदारी करताना मला आनंद होत आहे,” असे अदर पूनावाला यांनी सांगितले.
तर करण जोहरने सांगितले की, “दूरदृष्टी असणारे अदर पूनावाला हे माझे चांगले मित्र असून त्यांच्याशी केलेल्या या भागीदारीतून आमची वाटचाल अधिक चांगली होईल.”
धर्मा प्रॉडक्शनची स्थापना करणचे पिताजी यश जोहर यांनी केली असून अमिताभ-शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘दोस्ताना’ हा पहिला चित्रपट त्यांनी काढला होता. नंतर कुछ कुछ होता है, कभी अलविदा ना कहना, स्टुडन्ट ऑफ द इयर, ब्रह्मास्त्र अशा काही चित्रपटांची निर्मिती करत सदर कंपनीने मालिकांची निर्मिती केली आहे.