Close

‘स्त्री २’ मधील ‘आज की रात’ गाणं प्रदर्शित (Actress Tamannaah Bhatia First Song From The Movie ‘Stree-2’ Released)

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक 'स्त्री 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. पोस्टर, टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे पहिले गाणेही रिलीज झाले आहे. 'आज की रात' असे या गाण्याचे नाव असून तमन्ना भाटिया हा डान्स करताना दिसणार आहे. याआधी नोरा फतेही २०१८ मध्ये आलेल्या 'स्त्री' चित्रपटात 'कमरिया' गाण्यावर डान्स करताना दिसली होती.

मूळ चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार 'स्त्री 2' मध्येही पुन्हा भूमिका करताना दिसणार आहेत. यामध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश आहे. स्त्री २च्या ट्रेलरमध्ये चंदेल गावातली गोष्ट दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा गावातल्या लोकांमध्ये स्त्री परत आल्याची दहशत पाहायला मिळत आहे. खरंतर स्त्री परत आल्यामुळे लोकांमध्ये, प्रचंड भीती आहे. ट्रेलरमध्ये, श्रद्धा पुन्हा एकदा स्त्रीच्या भूमिकेत दिसत असून चंदेल गावातल्या लोकांची ती रक्षा करताना दिसत आहे.

‘स्त्री’ मध्ये एका महिलेची आत्मा चंदेल गावातील पुरुषांचा सूड घेते, असे दाखवण्यात आले होते. त्यानंतर तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करून तिला शांत केलं जातं. आता स्त्रीच्या सीक्वेलमध्ये एक पुरुष आत्मा दाखवण्यात आला आहे. तो गावातल्या मुलींना संपवण्याचा प्रयत्न करतो, असं दाखवलंय. अखेर गावकरी एका गाव गुंडाची आणि त्याच्या गँगची मदत घेताना दिसतात. या ट्रेलरमधील संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. थोडक्यात चित्रपट कॉमेडी थ्रिलर असल्याचे दिसत आहे.

१५ ऑगस्ट २०२४ रोजी चार मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये स्त्री 2 ला टक्कर देण्यासाठी जॉन अब्राहमचा वेदा आणि अक्षय कुमारचा खेल खेल में या चित्रपटाचा समावेश असणार आहे. मात्र, स्त्री 2 च्या ट्रेलरवरून स्त्री 2 पाहण्यात दुप्पट मजा येणार असल्याचे यामधून स्पष्ट होत आहे.

Share this article