पुस्तकी ज्ञान घेऊन नोकरी करणे म्हणजेच करिअर असते. याला अपवाद ठरतोय सिडकोत राहणारा मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतलेला अक्षय आठरे. नोकरी न करता व्यवसाय करण्याची इच्छा ठेवली. परंतु सोशल मीडीयावर सहजरित्या अपलोड केलेले व्हिडीओने त्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहचवले. अक्षयच्या इंस्टाग्रामवर ७ लाख ६३ हजार फालोअर्स असून पूर्णवेळ करिअर म्हणून तो काम करतोय. एवढेच नाही तर युवकांसाठी आयडॉल सुद्धा ठरतोय. त्याने माझ्या भाऊराया, साज तुझा, फितूर, जीव नादावला अश्या अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणा-या अक्षय आठरे याचे शालेय शिक्षण बळीराम पाटील विद्यालयात झाले. वडिल कंपनीत कामगार तर आई गृहिणी आहे. अशा कुटूंबात राहून त्याने एमआयटी महाविद्यालयातून मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना लाईक अॅपवर सहजरित्या मनोरंजनात्मक व्हिडीओ अपलोड केले. यात त्याच्या व्हिडीओला लाईक मिळत गेले. कधी गाण्यावर तर कधी डायलॉगवर लिप्सिंग करत केलेल्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळत गेला. काही काळातच टिकटॉकची क्रेझ वाढत चालली होती. यावर अक्षयने अकांऊंट उघडले अन् त्यावरही अॅक्टिंगचे व्हिडीओ टाकत. यावरही लोकांची पसंत वाढत गेली. यावेळी अक्षयने सोशल मीडिया हाच करिअरचा मार्ग निवडला.
इंजिनिअरींच्या शेवटच्या वर्षांत असताना सोशल मीडीयातून मिळालेल्या पैशातून अक्षयने चांगला आयफोन घेतला. परंतू बाहेरचे लोक टोमणे मारायचे. त्यामुळे वडिलांनासुध्दा मुलाने शिक्षण करून नोकरी करावी असे वाटायचे. मात्र आईकडून सोशल मीडीयासाठी सपोर्ट मिळत गेला. एकदा वडिलांसोबत बाहेर गेल्यानंतर लोक अक्षयसोबत फोटो काढायचे. वडील बाहेर गेल्यानंतर तुम्ही अक्षयचे वडील ना..असे म्हणायचे. त्यामुळे वडिलांनासुध्दा अक्षय काहीतरी चांगले करतोय हे पटले अन् त्यांचाही सपोर्ट मिळाला.
अक्षयने सखी आणि सखा या नावाने सलूनसुध्दा उभारले. १० विविध प्रकारच्या अल्बमध्ये अॅक्टिंग केली आहे. कंटेट क्रिएटर, युटयूबर, अॅक्टर अशाप्रकारची ओळख निर्माण केली. कोणतेही क्लासेस न करता युवकांचा आयडॉल ठरत आहे. त्याचे रोमांटिक व्हिडीओ, क्यूट कपल थिंक्स व्हिडीओ आणि लिपसिंग व्हिडीओ लोकांची पसंती ठरत आहे. आज अक्षयने याच पैशावर स्वत:ची कार आणि व्यवसाय सुरू केला. आज अक्षयला विविध मालिका आणि चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा होत आहे. येणाऱ्या काळात या क्षेत्रात काम करणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर काम करताना हजार रुपयांची कमाई होत असताना ती लाखांवर गेली आहे. एवढेच नाहीतर विविध विषयांवर असलेले व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहेत हीच यशाची खरी पावती मिळत आहे.
युवकांना संबोधत अभिनेता अक्षय सांगतो, "युवकांनी शिक्षण करावे. नोकरी, व्यवसाय करून सोशल मीडीयाकडे वळले पाहिजेत. आपल्या हातात पैसे कमविण्याचे दोन -तीन मार्ग असावेत. पूर्णवेळ सोशल मिडीयाला करिअर म्हणून पाहू नये."