भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने पॅरिस ओलिम्पिकच्या भालाफेकीत रौप्यपदकाची कमाई केली. त्याने हंगामातील सर्वोत्तम फेक करताना 89.45 मीटरचं अंतर गाठलं. पण ते सुवर्णपदकासाठी पुरेसं ठरलं नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच तब्बल 92.97 मीटरची ऑलिम्पिक विक्रमी फेक केली आणि सुवर्णपदक पटकावलं. ऑलिम्पिकमधील नीरजचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये काही बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच अभिषेकच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. नीरजने रौप्यपदक मिळवताच अभिषेकच्या एका कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
या व्हिडीओमध्ये नीरज पदक जिंकल्यानंतर प्रेक्षकांजवळ येतो. तिथे स्टँडमध्ये उभा असलेला अभिषेक त्याला मिठी मारतो. त्यानंतर तो त्याच्या कानात काहीतरी बोलतो आणि पुन्हा त्याची पाठ थोपवतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी अभिषेकचं कौतुक केलं आहे. ‘अभिषेक बच्चन वेल डन’, असं एकाने लिहिलं. तर ‘अभिषेकने योग्य प्रकारे नीरजला प्रोत्साहित केलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
Nice gesture by Abhishek Bachchan and you make the nation proud. Well done!
— Sanjana Ganesan 🇮🇳 (@iSanjanaGanesan) August 9, 2024
Congratulations @Neeraj_chopra1 on winning the Silver 🥈 medal for India. 🇮🇳#NeerajChopra #JavelinThrow#OlympicGames #Paris2024 pic.twitter.com/YdPO9wc1yg
“देशासाठी पदक जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकलो याचा निश्चितच मला आनंद आहे, पण एकंदर कामगिरीबाबत मी समाधानी नाही. मी आणखी दूर फेक करू शकतो. मात्र गेल्या काही काळापासून मला दुखापतीचा सामना करावा लागत असल्याचे त्याचा परिणाम माझ्या कामगिरीवर झाला”, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली होती. गेल्या काही काळात उजव्या खांद्याचे स्नायू, तसंच मांडीला जोडणारे स्नायू ताणले गेल्याचा नीरजच्या तंदुरुस्तीवर परिणाम झाला. ऑलिम्पिकपूर्वी त्याला फक्त दोन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आला. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यानही प्रत्येक फेक करताना स्नायू ताणले जाणार नाहीत यासाठी काळजी घ्यावी लागत होती, असं नीरजने सांगितलं.