बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. आमिर त्याच्या सिनेमांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या आमिर त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. नुकताच आमिरने त्याचा ६०वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आमिरने त्याच्या नवीन गर्लफ्रेंडबाबत मोठा खुलासा केला. ते ऐकून सर्वजण चकीत झाले. आमिरने हा खुलासा केल्यानंतर त्याची पूर्वपत्नी किरण रावने पहिली पोस्ट जी केली आहे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
किरण रावने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आमिर खानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये आमिरसोबत त्याचा लेक देखील दिसत आहे. दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. किरणने हा फोटो आमिरच्या वाढदिवशी शेअर केला होता. याच दिवशी आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा देखील केला होता. हे फोटो शेअर करत किरणने, ‘आमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या VVIP व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिठी… हास्यासाठी आणि नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल धन्यवाद… आमचे तुझ्यावर अजूनही प्रचंड प्रेम आहे’ या आशयाची पोस्ट केली होती.
आमिरने ६०वा वाढदिवस साजरा करताना गौरी नावाच्या एका महिलेला डेट करत असल्याचे सांगितले. ती मूळची बंगळूरुची आहे. आमिरने सांगितले की, तो 18 महिन्यांपासून गौरीला डेट करत आहे. याबद्दल सांगताना आमिरने पापाराझींची खिल्लीही उडवली आणि म्हणाला, “हे बघा, मी तुम्हाला काही कळू दिले नाही.”
आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत तर दुसरे लग्न किरण रावसोबत केले आहे. मात्र, आमिरने दोघांपासून घटस्फोट घेतला. आता आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. आमिर आणि गौरी दोघेही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. आता दोघेही लग्न करू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.