बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख यांचे कुटुंबीय करत आहेत. अनेक लोक आणि राजकीय नेते देशमुख कुटुंबाची भेट घेत आहेत. याचदरम्यान आता बॉलीवूड अभिनेता आमिर खानने देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आहे.
अभिनेता आमिर खानने पुण्यात संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली. आमिरने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. आमिरचा देशमुख कुटुंबाबरोबरचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होती.
व्हिडीओत आमिर विराज व धनंजय यांच्याशी संवाद साधताना दिसतो. नंतर तो विराजला मिठी मारतो आणि धीर देतो. आमिरचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यातत संतापाची लाट उसळली. या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसला. हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत. या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.

संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रातदेखील याचा उल्लेख आहे. “6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग इथले असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती. तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली”, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आलं आहे.