लहान प्रमाणात उद्योग सुरू करून खूप मोठे यश मिळविणारे उद्योजक जगभरात आढळतात. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चिकाटीने केलेले परिश्रम यामुळे त्यांना यश मिळते. मुंबईच्या विलेपार्ले या सुसंस्कृत उपनगरातून लहान दुकान सुरू करून आज मोठा उद्योजक बनलेल्या उमद्या तरुणाची ही यशोगाथा.
शाळकरी वयातच काहीतरी मोठा उद्योग करण्याचे स्वप्न मंदार देशपांडे यांनी पाहिलं होतं. त्यानुसार घरोघरी अत्यंत गरजेचे उत्पादन म्हणजे गव्हाचे पीठ दळून ते दारोदारी पोहचविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. ही गोष्ट १९९७ सालची. फोनवरून ऑर्डर घ्यायची, अन् गहू, भाकरी, बेसनाचे पीठ त्यांचा सायकलस्वार पोहचते करायचा.
आज होम डिलीव्हरी, डिजिटल बुकींग हे तंत्रज्ञान लोकांच्या अंगवळणी पडलं आहे. ग्राहकाची व पुरवठादाराची ती गरज झाली आहे. पण याची सुरुवात २४ वर्षांपूर्वी करणारा मंदार देशपांडे हा खरा द्रष्टा उद्योजक म्हणता येईल. रोजच्या जेवणातील अत्यावश्यक असलेली ही गव्हाची कणिक अर्थात् सार्वत्रिक भाषेतील आटा घरोघरी पोहचवत देशपांडे यांचा टेस्ट ऑफ लाईफ हा ब्रॅन्ड आज इतका विस्तारला आहे की, ११०० प्रिमियम आऊटलेटस् अर्थात् प्रथितयश विकानांतून त्यांचा अखंड पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये डी मार्ट, सहकारी भंडार, अपना बाजार, रिलायन्स मार्ट अशा बड्या संस्था आहेत. सायकलवरून होम डिलिव्हरी देऊन सुरुवात केलेली टेस्ट ऑफ लाईफची पीठे आता कंपनीच्या ॲप्मधून ऑर्डर्स घेऊन वितरीत केली जात आहेत. बदलत्या काळानुसार डिजिटल क्रांतीची कास त्यांनी धरली आहे. ई-कॉमर्स ही संकल्पना सुरू होण्याआधी मंदारनी ती अंगिकारली होती.
आपल्या या विस्ताराबाबत मंदारनी सांगितले," ही काळाची गरज आहे. सुरुवातीला आम्ही गव्हाची कणिक विकत असू. त्यामध्ये इतर पीठे आणली. आता १० प्रकारचा आटा घरोघरी जात आहे. तर गृहिणींचे श्रम वाचविण्यासाठी आम्ही रेडीमिक्स प्रकार जसे - थोलीपिठ, टोमॅटो ऑम्लेट, डोसा असे प्रकार काढले. जे लोकप्रिय झालेत. हे तयार मिक्स आता २० प्रकारचे आहेत. मुंबईमध्ये आमच्या ब्रॅन्डचे नाव प्रस्थापित झाले, याचा मला अभिमान आहे."
आपल्या दर्जेदार, स्वादिष्ट, रुचकर उत्पादनांनी हा गृहिणीच्या स्वयंपाकघरात शिरलेला उद्योजक ठरला आहे. ही कल्पना मंदार यांना कशी सुचली? याचे उत्तर देताना ते म्हणाले, "मी व्यावसायिक कुटुंबातील नाही. हा माझा कौटुंबिक व्यवसाय नाही. शाळेत असल्यापासून काहीतरी करण्याचे स्वप्न मी पाहिलं. आणि हमखास यश मिळेल, असा विश्वास बाळगत घरोघरी आवश्यक अशा या खाद्यविषयक उत्पादनास हात घातला. त्यासाठी बरेच संशोधन केले. अन् सतत विकसीत होत असलेला, मागणी असलेला हा स्वयंपाकघरास उपयुक्त असलेल्या पदार्थांचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा दर्जा टिकवण्यासाठी आम्ही दाणेदार गव्हाचं पीक होतं, त्या विभागातून अर्थात् मध्य प्रदेशातील सिहोर गावच्या शेतातून गहू घेतो."
मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी मंदारनी महापे, नवी मुंबई येथे महालक्ष्मी ग्रेन प्रोसेसिंग हा अद्ययावत् यंत्रसामुग्रीचा कारखाना उभारला आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो. ही उक्ती सार्थ करणारी त्यांची सहचारिणी - सौ. मीनल देशपांडे आहे. त्या विक्री विभागाची धुरा सांभाळतात. आपली उत्पादने घरोघरी, प्रत्येक किराणा दुकानात पोहचेल, याची त्या जातीने काळजी घेतात. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या अधिपत्याखाली निव्वळ महिलांची मोठी फौज उभारली आहे.