आपला देश तरुण आहे. त्यातील तरुणाई ही मोठी शक्ती आहे. इतकी की, पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी म्हणतात, “आजचे तरुण हे केवळ उद्याचे नियंत्रक नसून सशक्त, चैतन्यशील व सर्वसमावेशक भारताचे शिल्पकार आहेत.”

असे असले तरी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या बऱ्याच युवकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे. मानसिक ताणतणाव, एकलेपणा, निद्रानाश, नैराश्य आणि व्यसनाधीनता यांनी त्यांना ग्रासले आहे. त्यातून मानसिक संतुलन बिघडणे व आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या गोष्टींची जाणीव ठेवून ‘एमपॉवरिंग माईंडस’ ही संस्था जागरुकता निर्माण करते आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट यांचा घटक असलेली ही संस्था युवकांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरुकता व उपाययोजना करण्याबाबत पुढाकार घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘द एमपॉवरिंग माईंडस समिट २०२५’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला यांच्यासह देशविदेशातील मनोरुग्ण चिकित्सक, संशोधक, अभ्यासक यांनी युवकांच्या मानसिक आरोग्याबाबत उपाययोजना करण्याचे आग्रही प्रतिपादन केले.


या शिखर परिषदेत ‘अनव्हेलिंग द सायलेन्ट स्ट्रगल’ या संशोधन अहवालाचे अनावरण करण्यात आले. देशातील ३४ कॉलेजातील २ हजार विद्यार्थ्यांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. देशातील लोकसंख्येमध्ये १५ वर्षाखालील युवकांचा एक चतुर्थांश हिस्सा आहे. तसेच ४७ ट्क्के युवकांना झोप न येण्याची समस्या आहे. अधीरता व चंचलता यांचे प्रमाण अधिक आहे. एकलेपणा, ताणतणाव यांचेही प्रमाण अधिक आहे. इत्यादी निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी सदर शिखर परिषदेत विविध परिसंवाद झाले. त्यामध्ये डॉ. ब्लेझ ॲक्वायर, नेहल सिक्वेरा, डॉ. अजित भिडे, डॉ. शिखर शेषाद्री, डॉ. इंदू शहानी, पत्रकार बरखा दत्त आदी मान्यवरांनी भाग घेतला.