श्रीक्षेत्र माहूरची रेणुका माता
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता होय. श्रीपरशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13 शतकात देवगिरीच्या यादव कालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरच्या गडावर रेणूका देवी बरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसूया मंदिर, कालिका माता मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. माहूर गडापासून जवळच रामगड हा किल्ला असून काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. माहूर ते नांदेड जिल्ह्यात आहे.