Close

सुसह्य नात्यासाठी -एक संधी (A Chance For A Lasting Relationship)

नाती अत्यंत नाजूक असतात. क्षणात तुटतात पण जोडायला आयुष्य लागतं. ही जोडलेली नाती टिकवणं फार आव्हानात्मक असतं. एक छोटीशी बाब नातं तोडण्यासाठी पुरेशी असते. अशावेळी तुटत आलेल्या नात्याला नवजीवन देण्यासाठी त्याला एक संधी द्या.

नात्यात दुरावा आला असेल आणि तुम्ही ते नाते तोडण्याचा विचार करत असाल तर त्याआधी आपल्या भूतकाळावर एक नजर टाका. अशी कोणती गोष्ट घडली ज्यामुळे तुम्ही इतकी टोकाची भूमिका घेत आहात? याचा विचार करा. मतभेद असल्यास ते दूर करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना याआधी गृहीत धरत असाल तर ती चूक सुधारा. झालेल्या चुकांचा आढावा घेऊन त्या सुधारल्या तर तिढा सुटायला मदत होईल.

जेव्हा तुम्ही तुमच्या नात्याला अजून एक संधी देता तेव्हा सगळ्याचा सारासार विचार करा. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला. आपल्या साथीदाराच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घ्या. ह्या सगळ्याबरोबरच एकमेकांचा आदर करणे ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे

भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती करू नका. त्याचबरोबर झालेल्या चुका सारख्या उगाळून आपल्या साथीदाराला कमीपणा देऊ नका. त्यापेक्षा एकमेकांसोबत असल्याचा विश्‍वास द्या. आपल्या जोडीदाराला त्याच्या चुकांची जाणीव चांगल्या शब्दात करून द्या. तुमच्यात झालेल्या बदलाची जाणीव तुमच्या जोडीदारास होऊ द्या. त्याने पुन्हा एकदा तुमच्या नात्याला योग्य दिशा मिळेल.

तुमच्या जोडीदारात नक्की बदल झाला की नाही ते पाहा. बदल होण्यासाठी थोडा वेळ द्या. काही काळानंतर पण बदल जाणवत नसल्यास तसे त्याच्या लक्षात आणून द्या.

पश्‍चात्तापाची खरी जाणीव झालेल्या चुकांबद्दल खरा पश्‍चात्ताप जोडीदाराला होत असेल तर त्याला अजून एक संधी द्या. तुमच्या जोडीदारात झालेल्या बदलांची, समजूतदारपणाची जाणीव तुम्हाला झाली. आणि अजून तुम्हाला तुमच्या प्रेमाची जाणीव होत असेल, एकत्र आयुष्य घालवण्याची इच्छा असेल तर अशा वेळी नक्कीच तुमच्या नात्याला एक संधी द्या.
खरोखरच चांगला माणूस तुमच्या निर्माण झालेल्या तणावाचे, दुराव्याचे कारण महत्त्वाचे आहे. जोडीदाराकडून तुमचा मानसिक किंवा शारीरिक छळ होत असल्यास संधी देणे उचित ठरणार नाही. पण तुम्हाला खात्री आहे की तुमचा जोडीदार एक चांगला माणूस आहे. त्याला एखादी संधी दिल्यास तो आपली चूक सुधारेल. तर नक्की एक संधी द्या. झालेली चूक सुधारण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्याला तुमच्या साथीची गरज असू शकते.
जोडीदारात समजूतदारपणा जाणवू लागल्यास समजूतदारपणाच्या अभावी अगदी लहानशा गोष्टीवरून देखील खटके उडतात. अशावेळी नात्यातला गोडवा कमी होऊ लागतो. परंतु झालेल्या चुकांमुळे जोडीदाराच्या विचारात परिपक्वता आली असेल. स्वतःच्या वागणुकीची त्याला लाज वाटत असेल तर अशा वेळी नात्याला एक संधी जरूर द्यावी.
एकमेकांबद्दल प्रेम असल्यास स्वतःचे मन जाणून घ्या. जर तुम्हाला अजूनही एकमेकांबद्दल प्रेम वाटत असल्यास नात्याला एक संधी द्या. परंतु तसे वाटत नसल्यास एकमेकांसोबत राहणे कठीण होईल.
नवी सुरुवात एखाद्या माणसाचा राग आला की त्याचा चेहरा पण पाहावासा वाटत नाही. मनामध्ये त्याच्याबद्दल वाईट विचार घर करतात. अशावेळी जर तुम्ही ते विसरू शकत नसाल तर नात्याला परत संधी देऊ नका. सगळं विसरून नवीन सुरुवात करण्याची दोघांची देखील इच्छा असल्यास नात्याला संधी देऊन ते पुनर्जिवीत करा.

Share this article