Close

मस्त, झकास, अफाट (Masta, Zakas, Afat)

डॉ. सुमन नवलकर

अनुराग टी.व्ही. कलाकार आहे, हे समजल्यावर तिने कसलंही किंतू-परंतु न काढता त्याच्या स्थळाला घसघशीत होकार देऊन टाकला. अनुरागलाही त्याच्या टी.व्ही.च्या अशाश्‍वत दुनियेत, स्थैर्य असणारी, नोकरी करणारी बायको हवी होती.

सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या पदावर काम करणाऱ्या अपूर्वाला नऊ ते पाच नोकरी करणारा नवरा नको होता. दोघांनी ठरल्या वेळी बाहेर पडायचं, ठरल्या वेळी घरी परत यायचं. ‘सो बोअरिंग’ असं तिचं मत. “मला असं साधं सरळ जगणारा नवरा नकोय,” तिनं आई-बाबांनाही कधीचंच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे ‘लठ्ठ पगार’ आणि ‘सडपातळ शरीरयष्टी’ अशा दोन परस्परविरोधी विशेषणांनी समृद्ध झालेल्या तिच्या ‘उपवर स्टेटस’मधून ‘चि.सौ.का.’ होण्यामधे अनेक अडथळे येत होेते.

साहजिकच अनुराग हा टी.व्ही. कलाकार आहे हे समजल्यावर तिने कसलेही किंतू-परंतु न काढता त्याच्या स्थळाला घसघशीत होकार देऊन टाकला. अनुरागलाही त्याच्या टी.व्ही. च्या अशाश्‍वत दुनियेत, स्थैर्य असणारी, नोकरी करणारी बायको हवी होती. त्याच्या ‘सकाळी आठ ते रात्री आठ’ कामाच्या वेळा सांभाळणारी, घरी आल्या-आल्या ‘किती उशीर’ म्हणून फैलावर न घेणारी आणि मधेच त्याला काम मिळणं बंद झालं, तर जिच्या पगारात संसार चालू शकेल अशी.

अपूर्वाला टी.व्ही. पाहायला वेळच नसतो. सोमवार ते शुक्रवार ऑफिस. नऊ ते पाच ऑफिसची लिखित वेळ असली तरी घरी पोहोचायला कितीही उशीर. मग राहिले ते फक्त शनिवार-रविवार. त्या दोन दिवशी मालिका नसतातच. त्यामुळे अपूर्वाने अनुरागला कुठल्याही टी.व्ही. मालिकेत कधीही पाहिलेलं नाही. पाहिलं ते प्रत्यक्षातच आणि टी. व्ही. वरच्या कलाकाराने असावं तसा देखणाच असल्याने तो तिला पसंतही पडला. मुख्य म्हणजे ‘जिम’ नावाच्या व्यायामशाळेत जाऊन कमावलेली शरीरयष्टी असल्यामुळे त्याच्यात आलेला थोडासा भारदस्तपणाही तिला रुचला.

मग काय, ठरलं शुभमंगल. पण ठरल्यानंतर व्हायच्या आधीच्या काळात मध्येच केव्हातरी अनुरागने तिला स्वतःचा अभिनय पाहायची गळ घातली. “सरगम वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री साडेआठ वाजता.” तरीही तिने टाळलं असतं. पण “ सांग हं मला, मी कसा अभिनय करतो ते,” अशी पुस्ती पुढे जोडल्यामुळे एका सोमवारी ऑफिसमधून जरा वेळेवर आल्यावर आपल्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, यू-ट्यूब, ब्लॉग अशा महत्त्वाच्या गोष्टींना फाटा देऊन तिने बरोब्बर आठ-पंचवीसला टी. व्ही. लावला. आई-बाबांना पण जावयाला टी.व्ही. वर पाहायची उत्सुकता होतीच. पण त्यांच्या नेहमीच्या सिरियल्स सोडून जमत नव्हतं. आज अपूर्वानं जमवलं म्हटल्यावर त्यांनीही जमवलंच मग.

‘सरगम’ वाहिनी किती नंबरवर लागते ते शोधून ती वाहिनी अपूर्वाने लावेपर्यंत बरोबर साडेआठ वाजलेच. ‘जय जय शिवशंकर’ वाहिनीवर मालिकेचं नाव आलं. शंकर-पार्वतीचा फोटो आला आणि शास्त्रीय संगीतावर आधारित असं मालिकेचं शीर्षक गीत वाजू लागलं.

“बाई गं! अशा पौराणिक मालिकेमध्ये काम करतोय की काय हा?” अपूर्वा चिवचिवली. “कोणाचं काम करतोय?” आईनं विचारलं. “काय माहीत? आता कळेलच. आजच्या एपिसोड मध्ये असला पाहिजे. नाहीतर रोज-रोज कोण बघत बसणार, याचा प्रवेश येईपर्यंत?”

“अगं, पण म्हणालाय ना तो, अभिनय कसा वाटला ते सांग म्हणून.” बाबांनी आठवण केली.

“द्यायचं सांगून, छान वाटला म्हणून,” अपूर्वाने झटक्यात बाबांची काळजी मिटवून टाकली.

“बाकी हे आपले देव पाहायला मजा येते नाही? हा शंकरच बघ. डोक्यावर बुचडा, शिवाय मोकळ्या जटा आहेतच. गळ्यात, दंडावर, मनगटांत रुद्राक्षांच्या माळा, डोक्यावर चंद्र, कमरेला वाघाची कातडी, गळ्याभोवती नाग आणि हा गळ्याला निळा डाग कसला गं आई?”

“अगं, नीलकंठ म्हणतात ना शंकराला. विष प्यायल्यामुळे कंठ निळा झालाय त्याचा. म्हणून हा निळा रंग दाखवलाय.”

“हा त्रिशूळ बघ केवढा मोठा. जड असेल नाही? किती वेळ हे शंकरालाच दाखवतायत. बाकीची पात्रं पण दाखवा म्हणावं. त्या अनुरागचं काम दाखवा थोडं. एकदा थोडं पाहून छान होतं सांगितलं की सुटले एकदाची.”

“किती बडबडतेयस. शांतपणे पाहा निदान एक तरी एपिसोड. तुझ्या बडबडीत तो शंकर काय बोलतोय ते ऐकूही येत नाहीये.” आई म्हणाली.

“म्हणजे काय आई? तू आता ही मालिका पण पाहायला घेणार की काय? मग तुझी याच वेळेत असणारी दुसरी मालिका चुकेल ना ग?”

“अगं, सगळ्या मालिका दुपारी पुन्हा दाखवतात ना? एक रात्री पाहायची, एक दुपारी पाहायची. सोप्पं काम.” जाहिरातींचा पहिला ‘ब्रेक’ लागला तोपर्यंत काही अनुरागचा प्रवेश झालेला दिसला नाही. फोन करून विचारण्यातही अर्थ नव्हता. आठ ते आठ अशी चित्रीकरणाची वेळ असली, तरी नंतरही बराच वेळ चित्रीकरण चालू असतं त्याचं आणि त्या वेळी

फोन ‘सायलेंट’वर तरी असतो किंवा ‘स्वीच्ड ऑफ’ तरी. “हे बघ अपूर्वा, एखादा एपिसोड पूर्णपणे बघितलास तर काही बिघडणार नाहीये. नवरा होणार आहे ना तो तुझा? मग अख्ख्या एपिसोडमधे कुठे नाहीच दिसला तर...” निशाबाईंना ते वाक्य पूर्ण करायला मिळालंच नाही. कारण मध्येच आनंदराव-अपूर्वाचे बाबा म्हणाले, “सुरू झालं गं.”

पण पुन्हा आपलं शंकर एके शंकर. म्हणजे पार्वती असो, नंदी असो, आणखी कुठली-कुठली पात्रं असोत, टी.व्ही. च्या पडद्यावरचा अर्धा भाग सतत शंकराने व्यापलेलाच होता.

“हा असंख्य भक्तांपैकी एक किंवा कुठला तरी ऋषिमुनी अशी कुठलीतरी चिमुकली भूमिका तर करत नाहीये ना? बघ बाई अप्पू, तुला नऊ ते पाच नोकरी करणारा नकोय, काही वेगळं करणारा हवायच्या नादात कुठल्यातरी ‘एक्स्ट्रा’शी लग्न करून बसशील हो.”

दुसर्‍या जाहिरातींच्या ब्रेकपर्यंतही अनुराग दिसला नाही, तेव्हा अपूर्वा म्हणाली,“आई, बघ तू तुझी नेहमीची मालिका. त्या अनुरागच्या मागे लागून आपली मालिका बघायची सोडू नकोस.” तेवढ्यात तो जाहिरातींचा छोटा ब्रेक संपला आणि लगेचच शंकरराव पडद्यावर आले. “ए बघा गं, सुरू झालं.” आनंदरावांनी स्वतःही डोळे फाडून बघायला सुरुवात केली. त्या दोघीही बडबडता-बडबडता टी.व्ही. कडेही लक्ष देऊन होत्या. तेवढ्यात बाबा ओरडले,“अगं, बघा-बघा, हाच अनुराग वाटतोय मला. नक्की हाच आहे.” टी.व्ही. वर तर फक्त शंकरच दिसत होता.

“ह्या बाबांना काय वेड...” वाक्य मनातल्या मनातही अर्धवटच सोडलं अपूर्वाने. तिचा ‘आ’वासलेलाच राहिला. तिचाही आणि निशाबाईंचाही.

हळूहळू त्या जटा-बुचड्याच्या आत असलेले अनुरागचे रेशमी केस, त्याच्या त्या उघड्याबंब बांधेसूदपणात जिममध्ये कमावलेली शरीरयष्टी, त्याच्या ‘नीलकंठा’च्या जरा वरचा हनुवटीचा खड्डा, पाणीदार डोळे, सरळ नाक... नक्की अनुरागच आहे हा. म्हणजे अनुराग शंकराची- खुद्द शंकराचीच भूमिका करतोय?

“नशीब काढलं हो पोरीनं!” निशाबाईंचे डोळे पाणावले. त्या बालपणापासून शंकराच्या भक्त. आता एकुलत्या एक, लाडक्या लेकीचा नवरा खुद्द शंकराचा अवतार म्हणजे... आता मंडळातल्या बायकांनाही अभिमानाने सांगता येईल की, ‘जय जय शिवशंकर’मधला शंकर आमचा जावई हो.”

ब्रेकनंतरचा उरला-सुरला एपिसोड मग सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने पाहिला. अपूर्वा फक्त अभिनयच पाहत होती. तिला अभिनयावरच टिप्पणी करायची होती फक्त. तेवढं सांगून झालं की तिचं काम संपलं. पण ‘एवढा सगळा जटासंभार, रुदाक्षसंभार, बुचडा, नाग, त्रिशूळ, डमरू यांच्या वजनासकटही अभिनय कसा करू शकतो?’ एवढं एक कौतुक मात्र तिला राहून राहून वाटत राहिलं.

दहानंतर तिने त्याला फोन केला, तेव्हाही तो त्याच्या घरी पोहोचलेला नव्हता. प्रवासातच होता. “बोल, पाहिलीस का मालिका?” त्याने फोनवर तिचं नाव पाहून सरळच विचारलं.

“हो... म्हणजे... तू खुद्द शंकर... शंकराची भूमिका केलीयस की काय?” तिने दबकत दबकतच विचारलं.

“मग तुला काय वाटलं? मी नंदीचं काम करतोय? तसं असतं तर सांगितलंच नसतं तुला पाहायला.”

-यथावकाश दोघांचं लग्न झालं. स्वागत-समारंभ रात्री खूप उशिरानेच ठेवला होता. टी.व्ही. वरचे कलाकार त्याच वेळी येऊ शकणार होते. मुहूर्ताला हजर राहून खुद्द अनुरागही चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी जाऊन स्वागत समारंभाच्या जरा आधी आला. टी. व्ही. वरच्या रोजच्या एपिसोडला भक्त त्याची वाट पाहतात, म्हटल्यावर त्याला जायलाच पाहिजे ना? तसं त्याने दोन-तीन एपिसोडचं चित्रीकरण आगाऊ केलं होतं. पण त्याहून अधिक तो करू शकला नव्हता. बाकी कलाकारांचं वेळापत्रक पण जुळावं लागतं ना?

हनीमून वगैरे विसरून अपूर्वाचा सरळ संसारच सुरू झाला. सकाळी तिच्या आधी अनुराग घर सोडायचा. आठची चित्रीकरणाची वेळ असली, तरी अंगावरचे कपडे उतरवून व्याघ्रांबर नेसून, साज चढवून, गळ्याला निळा रंग लावून, पायांत वाळे घालून, हातात डमरूवाला त्रिशूळ पकडून ‘मेकअप रूम’च्या बाहेर यायला अनुरागला बरोब्बर दोन तास लागायचे. मग रात्री पुन्हा तो सरंजाम उतरवून, आपले कपडे चढवून पुन्हा मेकअप रूम बाहेर पडायला आणखी दोन नाही उतरवायला जरा कमी तरी दीड तास लागायचाच.

मध्यरात्रीनंतर कधीतरी झोपेतच अपूर्वाला त्याची खुडबुड, जेवणाच्या भांड्यांची खणखण ऐकू यायची. मग झोपेतून जरासे डोळे किलकिले करून ती पाहायची की गणपतीचं वाहन तर नाही ना? खुद्द पिताच आहेत ना गणपतीचे? आणि पुन्हा निद्राधीन व्हायची. तिची आणि अनुरागची खरीखुरी भेट व्हायची ती शनिवार-रविवारीच. त्यातला शनिवार अनुरागचा पूर्णपणे निद्रादेवीच्या पांघरुणातच जायचा. म्हणजे रविवारची भेटच खरी म्हणायची.

तरी अशा व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अनुराग-अपूर्वाने एका पुत्र रत्नाला जन्म दिलाच. शंकराचा पुत्र म्हणून त्याला गणपतीचंच नाव ‘अमेय’ ठेवलं. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दोघं अमेयचं संगोपन करत राहिली. मोठ्या भक्तिभावाने अमेय रोज रात्री साडेआठ वाजता ‘जय जय शिवशंकर’ पाहायला बसायचा. आपल्याला दर रविवारी भेटणारे बाबा ह्याच शंकराचे अवतार आहेत, हे बराच मोठा होईपर्यंत ठाऊकच नव्हतं त्याला. तो उठायच्या आधी अनुराग जायचा, तो झोपल्यानंतर यायचा.

मधे-मधे निशाबाई लेकीला विचारत,“काय अप्पू, कसा चाललाय तुमचा आगळा-वेगळा संसार?”

“मस्त.” अप्पू म्हणायची. व्हॉट्सअ‍ॅपमुळे तिला दोन अक्षरी शब्दांत उत्तरं द्यायची सवय झालीय. नशीब की चित्रलिपीत बोलत नाहीये अजून.

मधल्या काळात अनुरागला नवी ‘ऑफर’ आलीय ‘हर हर महादेव’ मालिकेची. त्यांच्या चित्रीकरणाच्या वेळा रात्री आठ ते सकाळी आठ आहेत. थोडा उशीर त्यांना चालणार आहे. पैसा अचाट देणार आहेत, म्हटल्यावर अनुरागने

‘हो’ म्हणून टाकलंच. शिवाय मेकअपचा भरपूर वेळ वाचेल. एकदा का ‘गेटअप’ चढवला की रात्रंदिवस चित्रीकरण करून सरळ शनिवारी सकाळीच घरी यायचं. नाहीतरी आपण फक्त झोपायपुरताच तर घरी असतो, ते सरळ शनिवारी सकाळीच घरी येऊ. पण हेच तर कमावायचे दिवस आहेत. नवी गाडी घेतलीय. नवा फ्लॅट घेतलाय. आता अमेयला ‘इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये पाठवायचंय. शिवाय आपलं काम म्हणजे ‘फेसबूक’ वरच्या ‘पोस्ट’ सारखं. एकदा गेलं की पुन्हा मिळणं कठीण. तेव्हा जोपर्यंत मिळतंय, तोपर्यंत वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचे. म्हणजे जोपर्यंत आपल्या डोक्यावरची गंगा वाहतेय, तोपर्यंत ही गंगा वाहती राहणार आहे.

पण ‘जय जय शिवशंकर’ मधला ‘शंकर’ आणि ‘हर हर महादेव’ मधला ‘महादेव’ यांच्या ‘गेटअप’मधे जमीन अस्मानाचं अंतर. दोघांमधलं साम्य फक्त एवढंच, की अंग आणि चेहरा तोच अनुरागचा, बाकी शंकराचे वाळे जाडजूड तर महादेवाचे बारीकसे. शंकराचे कपाळ-दंड-मनगटांवरचे भस्माचे पट्टे अगदी आखीव-रेखीव, तर महादेवाचे भस्माचे पट्टे जाडजूड. शंकराच्या डोक्यावरचा बुचडा छोटा आणि मोकळ्या जटा दाट, तर महादेवाचा बुचडा प्रचंड मोठा आणि जटा विरळ. शंकराचं व्याघ्रांबर ‘मिनी’, तर महादेवाचं व्याघ्रांबर ‘मिडी.’ शंकराच्या दंडातले, मनगटांतले, गळ्यातले रुद्राक्ष टपोरे आणि डोक्यावरचा बुचडा पूर्णपणे रुद्राक्षांनी वेढलेला. तर महादेवाचे रुद्राक्ष एका खांद्यावरून दुसर्‍या बाजूला कमरेकडे जानव्यासारखे पोहोचलेले. अगदी दोघांचे ‘नीलकंठ’ पण वेगवेगळ्या आकाराचे. निळ्या रंगाच्या छटाही वेगळ्या.

दोघांचे ‘गेटअप’ चढवून-उतरवून अनुराग हैराण झाला. डोक्यावर रात्रंदिवस जडजड पेलून मान दुखायला लागली. वेगवेगळी चापाची कुंडलं घालून कानाच्या पाळ्यांची वाट लागली. भस्माचे पट्टे धुऊन- रंगवून, धुऊन रंगवून कपाळ-दंड-मनगटं सोलवटली. शिवाय गाल गुळगुळीत असल्याशिवाय मेकअप बसत नाही. त्यामुळे रोज दाढी करणं आलंच. त्याने गालही सोलवटायच्या बेताला आले. पण लोकांना शंकर आणि महादेव इतके भावले-पावले होते, की दोन्ही वाहिन्यावाले स्पर्धेत उतरून रोजच्या रोज मानधनाची रक्कम वाढवत होते. शंकर-महादेवाच्या फेर्‍यात अडकलेला अनुराग शंकर महादेवनच्या ‘ब्रेथलेस’ गाण्यासारखा रात्रंदिवस चित्रीकरणात गुंग होऊन गेला होता. हातात डमरूधारी त्रिशूल पकडून पकडून हात आणि खांदा इतके प्रचंड दुखायला लागले होते, की उजवा हात त्रिशूळ पकडायच्या त्याच एका कोनात स्थिर झाला होता. दुसर्‍या कोणत्याही कोनात हलेनासा झाला होता. कधी-कधी तर अनुरागला आपण शंकराच्या भूमिकेत आहोत की महादेवाच्या, हे प्रयासाने लक्षात ठेवावं लागत होतं. कारण दोन्ही वाहिन्यांनी आपापल्या नायकाच्या बोलण्याच्या, हालचालींच्या, मेकअपच्या, आभूषणांच्या, आवाजाच्या सर्वच बाबतीत इतका वेगवेगळेपणा जपला होता, की ही कसरत करताना अनुरागचा जीव मेटाकुटीला येत होता. गळ्याभोवतीच्या नागांची वेटोळीही वेगवेगळी होती. पण दोन्ही इतकी जड होती, की आपल्याला स्पाँडीलायटीस झाल्यासारखंच अनुरागला वाटायला लागलं होतं.

आता अनुराग ‘शनिवारी सकाळी ते सोमवारी पहाटे’ इतकाच वेळ घरात असायचा. शनिवारी सकाळी मेकअपनिशीच यायचा. सरळ आंघोळीलाच घुसायचा. आंघोळीहून आल्यावर जो पांघरुणात घुसायचा,तो मुश्किलीने जेवायला उठायचा. मधे मधे निशाबाई अपूर्वाला विचारायच्या, तिच्या आगळ्या-वेगळ्या संसाराबद्दल. कधी ‘मस्त’च्या जोडीला ‘छान’,‘अप्रतिम’, ‘सुंदर’, ‘झकास’, ‘अफाट’असे वेगवेगळे अल्पाक्षरी अभिप्राय निशाबाईना ऐकायला मिळत.

- इथे अमेयची तब्येत खूप सुधारत होती. झालं असं होतं की ‘जय जय शिवशंकर’ पाहताना जेवायला बसायची त्याला सवय. नऊ वाजेपर्यंत, मालिका संपेपर्यंत त्याचं जेवून व्हायचं. पण आता नऊ ते साडेनऊ तो ‘हर हर महादेव’ही पाहायला लागला होता. ताट समोर असायचंच. अपूर्वा वाढत राहायची आणि तो जेवत राहायचा. छान बाळसं घेतलं होतं त्याने. पूर्वी शनिवारी-रविवारी तो बाबांबरोबर संध्याकाळी फिरायला जायचा. आता बाबांना जग ‘शंकर’ आणि ‘महादेव’ अशा दोन दोन भूमिकांसाठी ओळखायला लागलं होतं. त्यामुळे पायी फिरणं अशक्य झालं होतं. अनुरागने ‘जिम’पण आता घरातच केलं होतं. वेळात वेळ काढून तो घरातच ‘वर्कआऊट’ करायचा. अमेयचं फिरणं बंद झालं होतं, त्यामुळे मित्रांबरोबर काय खेळणं व्हायचं तेवढंच. “एवढ्या लहान वयात पोटपण सुटायला लागलंय की रे तुझं.” अपूर्वा म्हणायची. पण ‘भूक लागलीय’ म्हणणार्‍या मुलाला तिचं मातृहृदय उपाशी तरी कसं ठेवणार?

हल्ली अनुराग अपूर्वाचं नावही विसरत चाललाय ‘उमा’, ‘पार्वती’ अशा नावांनीच तिला हाका मारायला लागलाय. स्वतः अखंड उघडाबंब आणि उमा-पार्वतीनाही तुटपुंज्या वस्त्रांमध्ये पाहायची सवय झाल्याने परवा अपूर्वाला विचारत होता, “उमा, उष्म वायूप्रवाहांनी तुला त्रस्त नाही का केलं? साधीशी वस्त्रं परिधान करत जा.” परवा निशाबाई-आनंदराव आले होते. त्यांना सोडायला स्टेशनपर्यंत गेला. वाटेत म्हणाला,“हे माते, हे तात, भोजनाचा आस्वाद घेऊन गमन करता, तर मन अधिक आनंदीत झालं असतं.” अमेयला म्हणतो,“पुत्रा, विद्यार्जन यथायोग्य केल्यास तुझं भावी जीवन समृद्ध होईल. तुझा ज्ञानार्जनाचा समय वृद्धिंगत करायला हवास तू.”

“याचं काही खरं दिसत नाही.” निशाबाई आनंदरावांना म्हणाल्या.

“नसायला काय झालंय? चांगला दोन-दोन मालिकांमधून खोर्‍याने कमावतोय. साक्षात गंगा डोक्यावरून वाहतेय. आणि पठ्ठा हात धुऊन घेतोय तिच्यात. दोन्ही मालिका आणखी किती वर्षं चालतील. तोपर्यंत टाटा-बिर्लांच्या पंक्तीत जाऊन बसेल. अगदी अपूर्वाने नोकरी सोडली तरी फरक पडणार नाही.”

अर्थात अपूर्वा नोकरी सोडणार नव्हतीच. पण दोन्ही वाहिन्या आपापला टी.आर.पी. कमी होऊ नये यासाठी शंकर आणि महादेव यांच्या भूमिकांमधला जो वेगवेगळेपणा जपत होत्या, त्यात अनुराग पूर्णपणे भरडला जात होता. डोक्यावरच्या चंद्राच्या कलांबरोबर शंकर आणि महादेवमधला कलाकार कलेकलेने विकसित होत होता. कित्येकांना तर अनुरागचं मूळ रूप आठवेनासंच झालं होतं. आणि मग तो ‘मणी-कांचन-योग’ अनुराग-अमेयच्या आयुष्यात आला. हर हर महादेव मालिकेमधला गणेश जन्माचा काल जवळ यायला लागला आणि मालिकावाल्यांनी गणपतीच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुरू केल्या. मग एका सुमुहूर्तावर अनुराग अपूर्वाला म्हणाला, “गणपतीच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुरू आहेत. तुला तुझ्या कार्यालयात जायचं नाही का आज? अमेयला घेऊन ये मग चित्रीकरणाच्या स्थानी. शरीरयष्टी आणि वय दोन्ही दृष्ट्या अमेय अगदी अनुरूप आहे या भूमिकेसाठी. त्याची नियुक्ती होण्याची दाट संभावना आहे.”

लवकरच अमेय ‘गजानन’ झाला. कान आणि सोंड सावरत बोलायला शिकला. या सोंड आणि कानांबरोबर त्याच्या मानधनातही वाढ झाली आणि त्याच्या भाषेच्या समृद्धीतही.

आता बापाने विचारावं, “काय पुत्रा, चित्रीकरणाला नेण्यासाठीचं वाहन समयात आगमन करतंय ना?” मग मुलानं म्हणावं,“होय तात, पुन्हा स्वगृहीही समयात आगमन होतंय माझं. मातेला त्रस्त होण्याची तीळमात्र आवश्यकता नाही. शिवाय मातामही आणि पितामहही आहेतच ना मातेला कार्यात सहकार्य देण्यासाठी.”

अमेयच्या शाळेतून फोन यायला लागले. “तुमचा मुलगा आम्हा शिक्षकांबरोबर जे इंग्रजीत बोलतो, ते ठीक आहे. पण तो शिपायांबरोबर जे मराठी बोलतो ते त्यांना कळेनासं झालंय. त्याचं मराठी कोणालाही कळेनासं झालंय.”

“अमेय, जरा आई-आजी-आजोबांबरोबर, मित्रांबरोबर साध्या मराठीत बोलायची सवय ठेव बाळा”, अनुरागने जरा साध्या मराठीत प्रयत्नपूर्वक बोलून अमेयला समजावलं. पण हल्ली अमयेला साधी मराठी समजेनाशीच होत चाललीय. म्हणाला. “तात, आपलं निवेदन माझ्या बुद्धीच्या, आकलनशक्तीच्या बाह्यकक्षेत आहे. क्षमस्व.”

आता लवकरच मालिकेतला गणपती मोठा होईल. मग दुसर्‍या कोणा मोठ्या तुंदिल मुलाला ती भूमिका देण्यात येईल. पण तोपर्यंत दुसर्‍या अनेक वाहिन्या ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘बाप्पा मोरया ये’,‘पार्वतीनंदन गजानना’ अशा मालिका काढतायेत. अमेयला अनेक वाहिन्यांमधून निमंत्रणं येतायत. परवा अमेय सांगत होता,“माते, माझ्या मातेच्या भूमिकेसाठी त्यांना रूपवती स्त्री हवी आहे. माझी माता शोभेल अशा वयाची स्त्री. माते, तू या भूमिकेसाठी उचित आहेस. उद्या माझ्या समवेत ‘ऑडिशन’साठी येशील का?(‘ऑडिशन’ शब्दासाठी अमेयला उचित समयी प्रतिशब्द मिळाला नाही.)” अनुरागने हे ऐकलं. म्हणाला,“क्षमस्व पुत्रा, तू मातेस त्या भूमिकेसाठी पाचारण न करणेच उचित. त्या भूमिकेसाठी वस्त्रांची योजना अत्यंत अल्प असल्यामुळे, मातेला शीतल वायूचा, शीतल हवेचा त्रास होऊन ती अनारोग्याचा बळी होण्याची संभावना वाटते. तिच्या कोमल शरीरयष्टीला ते सहन होणे अशक्य वाटते.”

मग सासूकडे पाहून त्याने विचारलं,“काय मातोश्री, आपलं या संदर्भात काही कथन?”

आत्तापर्यंत मुलीच्या अल्पाक्षरी उत्तरांना सरावलेल्या निशाबाई फक्त एवढंच म्हणाल्या, “यथोचित.”

Share this article