Close

डॉटर इन लॉ (Short Story: Daughter In Law)

  • छाया जोशी
    अचानक शलाकाचा फोटो, पत्रिका, बायोडेटा असलेलं पाकीट त्यांना मिळालं. शलाका फोटोत खूपच छान दिसत होती. फोटो पाहता पाहता त्यांची नजर हातातल्या पत्रिकेकडे गेली. त्यांच्यातला ज्योतिषी जागा झाला. पत्रिका पाहायची नाही, असं म्हणत त्यांचे डोळे पत्रिकेवरून फिरू लागले. ‘अरे बापरे दशमातला शनि, मूळ नक्षत्र…’ म्हणजे सासूला वाईट! आता… आता काय?
    सरलाताई आज एकदम खूश होत्या. आज रवी आणि शलाकाचं लग्न अगदी जोरदार पार पडलं. हौसेमौजेला कुठे काही कमी पडलं नव्हतं. गाडीतून नव्या जोडीला घेऊन बंगल्याच्या आवारात शिरल्या आणि त्यांना एकदम हुश्श झालं. चला लग्न एकदम उत्तम पार पडलं, मुख्य म्हणजे निर्विघ्न पार पडलं.
    निर्विघ्न? हो! लग्न ठरल्यापासून जरा भितीच होती. कारण त्यांना कळत असणारं भविष्य! रवीच्या लग्नात काही तरी विघ्न येणार, असं त्यांना सारखं वाटत होतं. त्यामुळे रवीला सांगून येणार्‍या मुलींच्या पत्रिका त्या अगदी बारकाईने पाहत होत्या. परिणामी, अनेक चांगल्या मुलींना नकार दिले जायचे. शामराव, रवी तसंच अवीसुद्धा त्यांच्या या चिकित्सकपणाला कंटाळले होते. त्यात शलाकाच स्थळ सांगून आलं. फोटो, बायोडेटावरून मुलगी उत्तम दिसत होती. सर्वांना पसंत आहे, असं वाटत होतं. रवी म्हणालासुद्धा, “आई, मुलगी खरंच चांगली दिसतेय. तेव्हा तू आता काही खोडा घालू नकोस.” सगळ्यांची मतं लक्षात घेता, त्यांना पत्रिका काही पाहावीशी वाटेना.
    मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी खरंच दिसायला देखणी होती. नावाप्रमाणे ‘शलाका’ होती. घरची माणसंही उत्तम होती. नाटेकरांना एक मुलगा, एक मुलगी असं छोटं कुटुंब होतं. बोलण्या-चालण्यावरून सर्व मंडळी अतिशय सालस दिसत होती. सर्वांचा मानस बघून मुलीकडच्या लोकांना होकार दिला. सर्व गोष्टी भराभर घडत गेल्या. खरेद्या सुरू झाल्या. कार्यालय बुक झालं. साखरपुडा झाला. मध्यंतरात मुहूर्त नसल्याने सहा महिन्यानंतरचा मुहूर्त काढला. रवी आणि शलाका खूश होते. त्यांना सहा महिन्यांचा कोर्ट पिरियड मिळाला. सरलाताईंची मात्र कामाची गडबड उडाली. दोन्ही मुलगे असल्याने हाताशी तसं कोणीच नाही. नातेवाईक परगावी असल्याने आयत्या वेळेलाच येणार.

  • दुपारी सगळे कामावर गेल्यावर त्यांनी कपाटं आवरायला घेतली. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये अचानक शलाकाचा फोटो, पत्रिका, बायोडेटा असलेलं पाकीट मिळालं. त्यांनी ते सहज उघडून पाहिलं. शलाका फोटोत खूपच छान दिसत होती. फोटो पाहता पाहता त्यांची नजर सहज हातातल्या पत्रिकेकडे गेली. त्यांच्यातला ज्योतिषी जागा झाला. पत्रिका पाहायची नाही, असं म्हणत त्यांचे डोळे पत्रिकेवरून फिरू लागले. ‘अरे बापरे दशमातला शनि, मूळ नक्षत्र…’ म्हणजे सासूला वाईट! आता… आता काय? त्यांनी पटकन पत्रिकेची घडी घातली. पाकिटात घालून ड्रॉवरच्या खालच्या बाजूला कागदाखाली सरकवून टाकली.
    पण डोक्यातले विचार थांबेनात, म्हणजे आपला मृत्यू संभवतो. घरात लक्ष लागेना. त्या उत्साहाने लग्नाच्या तयारीत भाग घेईनाशा झाल्या. शामरावांनी खोदून खोदून एक-दोनदा विचारलंही. पण त्या काही बोलेनात. जाऊ दे, रवी आणि शलाका खूष आहेत, तर आपण सगळ्यांच्या आनंदात मिठाचा खडा कशाला टाकायचा? सर्व गोष्टी मनातल्या मनात दाबून टाकल्या; पण त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
    एकदा दुपारी एकदम छातीत दुखू लागलं. अंगाला घाम फुटला. बरं रविवार असल्याने सर्व घरी होते. ताबडतोब डॉक्टरला बोलावलं. हॉस्पिटलला अ‍ॅडमिट केलं. माईल्ड अ‍ॅटॅक होता. वेळेवर उपचार झाले. डॉक्टरांनी बेडरेस्ट घ्यायला सांगून घरी पाठवलं. गेल्या आठ दिवसात त्यांच्या लक्षात आलं की, शलाकाने घराची आघाडी तर उत्तम सांभाळलीच; पण सरलाताईंचीही छान शुश्रुषा केली. हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ येऊन बसायची. येताना एखादा पथ्याचा पदार्थ करून आणायची आणि मुख्य म्हणजे, या काळात यथेच्छ गप्पा व्हायच्या. त्यामुळे त्या दोघी एवढ्या जवळ आल्या, त्या कधीही न तुटण्यासारख्या. त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा होत. एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण झाली आणि सरलाताईंनी मनातलं किल्मिष दूर सारलं आणि मोठ्या हिंमतीनं, जिद्दीनं उत्साहाने कामाला लागल्या.
    दुखण्याला मागे सारलं. खरेद्या सुरू झाल्या. लग्नाच्या, दोघींच्या साड्या, देण्याघेण्याच्या साड्या, वस्तू यांची खरेदी सुरू झाली. त्यांचा उत्साह पाहून एक-दोनदा रवीने, शामरावांनी त्यांना रागेही भरले; पण यांचा उत्साह काही कमी होत नव्हता. लग्नाच्या आधीच्या दिवसांचं प्लानिंग, जेवणाचे, सकाळ-संध्याकाळचे मेनू ठरवले. त्यानुसार आचार्‍याला हाक मारून सूचना दिल्या. मांडववाला, लाईटवाला या सर्वांना त्या जातीने सूचना देत होत्या. मेहंदीचा कार्यक्रम कशा प्रकारे करायचा याचं प्लानिंग झालं.
    लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपलं. गावावरून पाहुणे यायला सुरुवात झाली. प्रत्येक कार्यक्रम प्लानिंगप्रमाणे होतो आहे की नाही, इकडे त्या जातीनं लक्ष देत होत्या.
    सर्व कार्यक्रम उत्तम रितीने होत होत शेवटी लक्ष्मीपूजनाची वेळ आली. लक्ष्मीपूजन कार्यालयात न होता घरीच झालं पाहिजे, हा त्यांचा अट्टहास होता. सून माप ओलांडून घरात आली. लक्ष्मीपूजन झालं. हळूहळू शलाकाच्या माहेरची माणसं, रवीचे मित्र, इतर सर्व नातेवाईक निरोप घेऊन निघाले.
    शामरावांनी सरलाताईंना जबरदस्ती बेडरूममध्ये पाठवून शलाका आणि रवीच्या मदतीने हॉल आवरला. पण सरलाताईंच्या दृष्टीनं अजून एक मुख्य कार्यक्रम राहिला होता.
    त्यांनी देवासमोर पाट मांडला. शलाकाची ओटी भरली. गजर्‍यांचे अनेक सर तिच्या केसात माळून हातात दुधाचा ग्लास दिला. सरलाताईंनी नमस्काराला वाकलेल्या शलाकाच्या पाठीवर हात ठेवून तिच्या सुखी संसाराला भरभरून आशीर्वाद दिले.
    अन् सरलाताई धपकन सोफ्यावर बसल्या. त्यांच्या दृष्टीने सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या होत्या. तेवढ्यात शामराव आले, “झालं ना सारं मनासारखं? दमलीस खूप तू. जा आता कपडे बदल आणि आराम कर. आतापर्यंत मी तुला काही बोललो नाही; पण आता मात्र एकदम आराम. उद्याही फार मोठा घाट घालू नकोस. स्वतःच्या
    तब्येतीकडे लक्ष दे. आपण मोठ्या दुखण्यातून बाहेर पडलोय, याचं जरा भान ठेव.” बोलता बोलता त्यांचं लक्ष सरलाताईंकडे गेलं. त्यांना एकाएकी खूप घाम फुटला होता. छाती धपापत होती. शामराव एकदम ओरडले, “रवीऽऽऽ, अवीऽऽऽ, शलाका लवकर खाली या.” आणि त्यांनी आपल्या हातातल्या मोबाईलवरून डॉक्टरांना फोन केला.
    मुलं भराभर आपल्या खोलीतून बाहेर आली. आईभोवती जमली; पण तोपर्यंत त्यांना भोवळ आली होती. प्रत्येक जण आपापल्या परीने हाका मारत होतं. हार्ट अ‍ॅटॅकनंतरचे प्रायमरी उपचार सुरू केले होते. तेवढ्यात डॉक्टर आले. ब्लडप्रेशर तपासायला सुरुवात केली. “शामराव हार्टअ‍ॅटॅक आहे. रवी ताबडतोब अ‍ॅम्ब्युलन्सला फोन कर. मी हॉस्पिटलला फोन करून पुढची तयारी करायला सांगतो.”

  • शलाका रूममध्ये कपडे बदलायला गेली. रवी, अवी अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करत होते. डॉक्टर हॉस्पिटलमधील तयारी बघत होते. शामराव एकटेच सरलाताईंचा हात हातात घेऊन बसले होते. तेवढ्यात सरलाताई शुद्धीवर आल्या. शामराव डॉक्टरांना हाक मारणार तेवढ्यात सरलाताईंनी त्यांना थांबवलं. त्या शामरावांना हळूच म्हणाल्या, “उद्या माझं काही बरं-वाईट झालं तरी पोरीला दोष देऊ नका. तिचा पायगुण वाईट आहे, असं मनातदेखील आणू नका.” एवढंच बोलायला त्यांना इतका त्रास झाला की, त्यांनी डोळे मिटले आणि मान टाकली. शामराव ‘डॉक्टरऽऽऽऽ’ म्हणून एवढ्यांदा ओरडले की, वरून शलाकासुद्धा धावत खाली आली. डॉक्टरांनी सरलाताईंचा हात हातात घेऊन पाहिलं; पण सर्व संपलं होतं.
    हा… हा… म्हणता शेजारपाजारच्या घरातून बातमी पसरली. अजून घरीसुध्दा न पोहोचलेल्या नातेवाइकांना माहिती कळली. माणसांचा ओघ सुरू झाला. दारात चपलांचा ढीग पडला. तिथेच दारातल्या सोफ्यावर शलाका बसली होती. काही वेळापूर्वी असाच चपलांचा ढीग होता अन् आता पुन्हा… प्रत्येक जण तिच्याकडे बघत आत शिरत होता. कुणाच्या मनात तिच्याबद्दल कणव होती, कुणाच्या राग, तर कुणाच्या मनात…
    तेवढ्यात आई आली अन् तिला एकदम रडू फुटलं, “आई काय झालं ग हे?” आईने थोपटले आणि आत घेऊन गेली. सरलाताईंच्या सर्व जवळच्या नातेवाइकांमध्ये त्या परक्या ठरल्या होत्या.
    पुढची सूत्र हलत होती. कोणी तरी शलाकाला सरलाताईंच्या अंगावरचे दागिने उतरवायला सांगितले. तेव्हा शलाकाच्या अंगावर शहारा आला. किती उत्साहाने सरलाताईंनी शलाकाबरोबर नवे दागिने केले होते. ती रडत रडत म्हणाली, “नाही, नाही, हे तुम्ही मला सांगू नका.” तेव्हा तिच्या आईने सरलाताईंच्या बहिणीला सांगितलं, “ताई, हे तुम्हीच करा. ती लहान आहे हो अजून…”
    झाले. दागिने काढले गेले. अंगावर हिरवीगार पैठणी, डोक्यात गजरे असा त्या सवाष्णीने आधीच साज-शृंगार केला होता. तिला काय माहिती हा तिच्या आयुष्यातला शेवटचा शृंगार ठरणार होता. ओटी भरायची वेळ आली. पुन्हा सगळे शलाकाला हाक मारू लागले. तिच्या आईने तिच्या पाठीवर हात ठेवला. “शलाका धीराने घे.” शलाका उठली. ती सरलाताईंच्या समोर येऊन उभी राहिली. काही तासांपूर्वी याच माउलीने तिची ओटी भरून तिच्या नव्या संसाराला आशीर्वाद दिले होते आणि आता तिच्यावर हा काय प्रसंग आला होता. एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे आई सांगत होती, ते ती करत होती. ओटी भरून झाली आणि तिचं गोळा केलेलं अवसान संपलं. ती तीरासारखी धावत तिच्या खोलीकडे गेली.
    सर्व क्रियाकर्म आटोपून आल्यावर रवी खोलीत आला. तेव्हा शलाकाला रडून रडून दिवसभराच्या श्रमाने आणि आता विचाराने झोप लागली होती. त्याने हळूच तिला उठवलं. “शलाका आईला खाली थांबवलं आहे, तू चार दिवस आईकडे जातेस का?” रवीला समोर पाहताच तिचा दुःखावेग पुन्हा वाढला. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, “मी तुम्हा सर्वांना सोडून कुठेही जाणार नाही.” रवी आणि शलाका दोघं एकमेकांना मिठी मारून हमसाहमशी रडू लागले. जी गोष्ट उत्कट प्रेमाने, अति आनंदाने व्हायची ती अती दुःखावेगाने घडून गेली. दोघं एकमेकांच्या मिठीत एकमेकांना धीर देत एकमेकांचे झाले.
    दिवस का कुणासाठी थांबत असतात? चौदा दिवस झाले. क्रियाकर्म झाली. पुन्हा काही दिवसांसाठी थांबलेले नातेवाईक आपापल्या वाटेने गेले. या पंधरा दिवसाने तिला चांगलंच पोक्त बनवलं. लग्नाच्या दुसर्‍या दिवसापासून ती घरातील कर्ती सवरती बाई बनली. बाबांना, धाकटा दिर अवीला धीर देत होती. पंधरा दिवसांनी प्रत्येक जण आपापल्या कामाला लागले. बाबा ऑफिसला जाऊ लागले. अवीची परीक्षा जवळ आली होती. तो अभ्यासात अगदी बुडून गेला.
    एक दिवस शलाका कामावरून आल्यावर रवी शलाकाला म्हणाला, “शला, माझ्या मित्रांनी आपलं लग्न झाल्यावर एक गेट टू गेदर ठरवलं होतं. ते आज करूया, असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व जण आज पक्याकडे जमणार आहोत, तेव्हा लवकर आवर.”
    “अरे पण बाबा एकटे नाही का राहणार? ”
    “अवी असतो ना?”
    “नाही, तो हल्ली रोज मित्रांकडे अभ्यासाला जातो.”
    “मी त्याला सांगतो आज जाऊ नकोस म्हणून आणि आपण तरी किती दिवस असं घरात थांबणार आहोत?”
    “पण रवी त्यांचं दुःख ओलं आहे. घरात कुणी नसलं की आईची आठवण त्यांना येत राहील.” शलाका म्हणाली.
    “त्याला काही इलाज नाही, आपण असे त्यांच्याजवळ किती दिवस थांबणार आहोत? तू येणार असलीस तर चल, नाहीतर मी एकटा जातो.”
    “हा असं कसं वागू शकतो?” शलाका मनाशीच म्हणाली.
    शेवटी बाबांना कामावरून आल्यावर तिने रवीचा बेत सांगितला. त्यावर बाबा म्हणाले, “जा बेटा, मी आणि अवी जेवणाचं करू.”
    “नाही बाबा. मी सगळं करून टेबलावर मांडून जाते, अवी आला की तुम्ही दोघं जेवण करा.”
    “ठीक आहे. तुम्ही निःसंकोच मनाने जा.”
    या सगळ्या धावपळीत शलाकाला आवरायला उशीर झाला. इकडे रवीची चिडचिड चालू होती. भराभर आवरून बाहेर पडणार तेवढ्यात अवीचा फोन आला, “वहिनी, मी मित्राकडेच थांबतोय.” पुन्हा तिचा पाय घरातून निघेना. बाबांना एकटं ठेवून जावंसं वाटेना. त्यावर रवीचा आरडाओरडा सुरू झाला. शेवटी बाबांनी तिला खूण केली, “बेटा जा तू, मी माझं बघतो.”
    शेवटी धुमसत धुमसतच मित्राच्या घरी पोहोचले. एव्हाना सगळे जमले होते. टाळ्या वाजवून सर्वांनी या लेटकमर्सचं स्वागत केलं. बाहेरच्या खोलीत सर्व पुरुषांचा ग्रुप जमला होता, तर आत सर्व महिला वर्गाच्या हशा, टाळ्या चालल्या होत्या. ती या सगळ्यांच्यात नवी होती. तिच्याबरोबर त्यांच्या पाठोपाठच लग्न झालेली एक मैत्रीण होती. तिचं नावं प्रिया. घरात असं घडल्याने शलाका तिच्या लग्नाला गेली नव्हती. ती पण सर्वांना थोडं थोडंच ओळखत होती. काहीतरी मोठा गहन विषय चालला होता. तिने प्रियाकडे विचारणा करताच त्यातली सिनीयर, लग्न झालेली दिपा सांगत होती, “अगं बायांनो, हवंय कशाला वेगळं राहायला? राजा-राणीसारखं वेगळ राहता येतं म्हणून! मूर्ख आहात. वेगळं राहिल्यावर घरकाम आणि स्वयंपाक कोण करणार? पुन्हा घरभाड्यासाठी हजारो मोजावे लागतात, ते वेगळेच. घरकामासारखं बोअरिंग काम कुठलं नाही. कितीही करा संपतच नाही. मला तर नाही जमणार बाई. असं सारखं काम काम करत बसलो, तर पस्तिशीतच म्हातारपण येईल.”
    “पण, अगं घरकाम कुणाला चुकलंय? आपली आई, आजी, मावश्या हेच तर करत आल्या.”
    “एक्झॅक्टली. अग त्यांना सवय आहे. सगळ्या कामांची आणि असं रात्रंदिवस काम करण्याची आवडही आहे. आता आपण नाही असं घाण्याला जुंपून घ्यायचं.”
    “मग काय करायचं?” एकदम तीन-चार आवाज आले.
    “हे बघा. यावर एक उपाय आहे.” दीपा एखादी पोथी वाचल्यासारखी बोलायला लागली.
    “यावर उपाय म्हणजे, सासूजवळ राहावं. तिला ही सगळी कामं करू द्यावीत नि आपण आऽराऽम करावा. पण त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील.”
    “त्या कोणत्या?” पुन्हा कोरस. आता दीपाला चेव चढला. “प्रथमपासून आपल्याला स्वतंत्र राहायला मुळीच आवडत नाही, आपण सासूजवळच राहणार, असं डिक्लेअर करावं. नवर्‍याजवळ सासूबद्दल कधीही केव्हाही वेडंवाकडं बोलू नये. तिचं सतत कौतुक करावं.”
    “सासूचं कौतुक… काहीतरीच काय दीपे…”
    “अजाण बालिके मध्ये मध्ये बोलू नकोस. पुरतं ऐकून घे. तुझं या व्रतानं भलंच होईल.”
    “ए गप गं सुजे! दिपा तू बोल बाई.”
    “सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सतत हसतमुख राहावं. एखादाच शब्द बोलावा; पण तो गोड बोलावा. फारसं बोलू नये. फार किंमत देऊ नये. भांडणं होतील असं वागू नये. घरात फार कमी काळ राहावं. तोंडावर तोंड पडतील अशा गोष्टी टाळाव्यात. नवर्‍याच्या पुढे मात्र नाचावं. त्याची, त्याच्या आईची, वडिलांची आपल्याला खूप काळजी आहे, असं भासवावं. हे व्रत केल्यानं सुखानं जगता येतं. आपलं रूप, तारुण्य टिकवण्यासाठी दुसर्‍याचा बळी जात असला, तरी तिकडे चक्क काणाडोळा करावा. घरातली हक्काची ‘डॉटर इन लॉ’ची जागा सोडू नये.”
    सगळ्यांनी दीपाच्या विचारांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. ‘थ्री चिअर्स फॉर द ग्रेट डॉटर इन लॉ’ या गजराने खोली भरून गेली. एवढा कशाला आरडाओरडा चाललाय म्हणून सर्व पुरुष मंडळी आत डोकावली. इकडे शलाकाला मात्र या सार्‍या विचारांनी कसंसंच झालं. आपण लग्नाआधी सासूबरोबर कसं वागायचं, हे ठरवलं होतं. दोघींनी मैत्रिणी बनून मस्त एंजॉय करायचं ठरवलं होतं. डॉटर इन लॉच होणार होती; पण दीपा म्हणतेय त्या प्रकारची नक्कीच नाही. तिला त्या अशा प्रकारच्या विचारात बसवेना. ती हळूच रवीला म्हणाली, “रवी आपण घरी जाऊ या.”
    “का गं?” रवी म्हणाला.
    “नाही. आय अ‍ॅम नॉट फिलिंग वेल.” त्याला सांगायला तिला इंग्रजीचा आधार घ्यावा लागला. तिने दीपाला सॉरी म्हटलं, “मी पुन्हा कधी तरी येईन; पण मी आत्ता घरी जाते. बाबाही घरी एकटे आहेत.” असं म्हणून तिथून काढता पाय घेतला.
    वाटेत रवीने एवढी बडबड केली. तेव्हा शलाका म्हणाली, “रवी मला खरंच बरं वाटत नाहीये. वाटलं तर तू मला घरी सोडून परत जा.” रवीने पडत्या फळाची आज्ञा म्हणून शलाकाला बंगल्याच्या दारात सोडलं आणि अर्धवट राहिलेली पार्टी पूर्ण करायला तो पुन्हा मागे फिरला.
    शलाका घरात शिरली तर बाबा घराचं दार उघड ठेवून डायनिंग टेबलवर बसले होते. ती हळूच त्यांच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. टेबलावर जेवण तसंच पडलं होतं. त्यांच्या हातात पत्रिका होती. शलाकाने बारकाईने पाहिलं, तर तिचीच पत्रिका होती. त्यावर लाल स्केचपेनने ‘मूळ नक्षत्रावर’ मार्क केलं होतं आणि त्यापुढे ‘सासू’ असं लिहिलं होतं. शलाकाला पाहताच बाबा एकदम चपापले. त्यांनी पत्रिकेची घडी घातली. शलाकाने ती हातात घेतली आणि म्हणाली, “बाबा, म्हणजे आईंना हे सगळं माहीत होतं?”
    “हो. तिला पत्रिका कळायची ना बेटा.”
    “पण हे सगळं माहीत असूनही त्यांनी मला का सून करून घेतली? माझ्यामुळे हे सगळं घडलं. मला असं काही होणार हे माहीत असतं, तर मी लग्नच नसतं केलं,” असं म्हणून ओक्साबोक्शी रडू लागली.
    बाबांनी तिला शांत केलं, म्हणाले, “जे घडायचं होतं ते सारं घडून गेलं. तुला माहीत आहे शलाका, जाताना सरला बजावून गेलीय, या सर्व गोष्टींसाठी माझ्या शलाकाला वाईट पायगुणांची ठरवू नका. तिचा यात काय दोष? ती माझी फार गुणाची लेक आहे.” कुठे आधीच्या पिढीनं ’डॉॅटर इन लॉ’ म्हणून आपलं स्वागत केलं आणि कुठे या आपल्या हक्काची जपणूक करण्यासाठी स्वतःला ‘डॉटर इन लॉ’ म्हणणार्‍या सुना.
    शलाका पदर खोचून उभी राहिली. मायक्रोवेव्हला अन्न गरम करायला ठेवलं. बाबांचं पान घेतलं. त्यात एक-एक पदार्थ वाढू लागली. आज या डॉटर इन लॉचं कर्तव्य होतं सासर्‍यांची काळजी घेणं आणि रवीसाठी बायको म्हणून त्याची मनधरणी करून त्याला जिंकणार होतीच; पण तो डॉटर इन लॉचा शेवटचा क्लॉज ठरणार होता.

Share this article