बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने भाईजानला त्याच्याच घरात घुसून ठार मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सलमान खानला असे मेसेज याआधीही अनेकदा आले होते, पण जेव्हा पोलिसांनी चौकशी केली किंवा त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्या लोकांनी हे मेसेज मनोरंजनासाठी पाठवले असे म्हटले. आता पुन्हा एकदा वाहतूक विभागाला व्हॉट्सअॅपवर धमकी मिळाल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. आता बरोबर एक वर्षानंतर, याच तारखेला, १४ एप्रिल २०२५ रोजी, अभिनेत्यासाठी धमकीचा मेसेज आला. २०२४ मध्ये, पोलिसांनी तपास केला होता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन त्याच्या अपार्टमेंटची बाल्कनी बुलेटप्रूफ करण्यात आली होती. याशिवाय सलमानला Y+ सुरक्षा देण्यात आलेली. त्याची गाडीही बुलेटप्रूफ केली होती.

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी अभिनेत्याच्या घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. काळवीट शिकार प्रकरणात न्यायालयाने सलमान खानला निर्दोष मुक्त केले असले तरी, सलमानने आपली माफी मागावी अशी बिश्नोई टोळीची इच्छा आहे. सलमानचे वडील सलीम खान याच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्याच्या नशिबात मृत्यू लिहिला असेल तेव्हा तो येईल. कोणाच्याही धमक्यांमुळे काहीही साध्य होणार नाही.

२०२३ मध्येही सलमान खानला गँगस्टर गोल्डी ब्रारने धमकीचा ईमेल पाठवल्याचा आरोप आहे. २०२२ मध्येही, अभिनेत्याला घरी एक पत्र मिळाले, ज्यामध्ये त्याला धमकी देण्यात आली होती. २०२४ मध्ये, दोन अज्ञात लोकांनी त्यांच्या पनवेल फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्नही केला. सलमान खानने त्याच्यावर येणाऱ्या धोक्यांबद्दल असेही म्हटले होते की, 'देव, अल्लाह सर्वांपेक्षा वर आहे. ज्याच्या नशीबात जेवढे वय लिहिले आहे तेवढेच त्याला मिळेल. त्याने सांगितले होते की तो घरून शूटिंगला जातो आणि शूटिंगवरून गॅलेक्सीला येतो.