फळांचा राजा आंब्याचं आगमन लवकरच होणार आहे, याची वर्दी द्यायलाच जणू कैरी घराघरांत हजर होते. आंबा जसा सर्वांना आवडतो, तशीच कैरीही सर्वप्रिय असतेच. खरं तर ‘कैरी’ हा केवळ शब्दच तोंडाला पाणी सुटण्यासाठी पुरेसा आहे. मग कैरीपासून तयार केलेले हे पदार्थ, काय करतील…? पाहा करून…
उकडलेल्या कैरीचं पन्हं
साहित्य : 2 वाटी वाफवलेल्या कैरीचा गर, दीड वाटी गूळ किंवा साखर, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : कैरीचा गर, गूळ किंवा साखर, मीठ आणि वेलची पूड एकत्र मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्या. मिश्रण व्यवस्थित एकजीव व्हायला हवं. त्यात साधारण वाटीभर पाणी घालून पुन्हा वाटा. हे मिश्रण काचेच्या स्वच्छ हवाबंद बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. पन्हं बनवायचं असेल तेव्हा या मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार थंड पाणी एकत्र करा आणि थंडगार पन्हं सर्व्ह करा.
टीप : कैर्या (देठ न काढता) कुकरच्या भांड्यात ठेवून उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची सालं आणि कोय काढून केवळ गर बाजूला काढून घ्या.