म्हणजे वाघाचे पंजे… आपण असं सहज बोलून जातो पण एखाद्याच्या आयुष्यात या म्हणजेचा अर्थ हा केवळ वाघाचे पंजे इतकाच मर्यादित नसून तो अनेक अनुभव, अनेक बदल घडवून देतो. सध्या याच ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. हो कारण ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा नवा कोरा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाच्या टिझरने आता सर्वत्र धुमाकूळ घातलाय. उत्तम विनोदी सीन आणि त्याला आशयघन अशी कथेची जोड असलेल्या या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. लग्नाच्या बाबतीत कुटुंबाचं ऐकावं की स्वतःच्या मनाचं, कुटुंबाने निवडलेला तो मुलगा आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे का अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या त्या मुलीचा तिच्या आयुष्यातील सुखकर प्रवास नेमका कसा होणार?, तिला तिचा खरा जोडीदार भेटणार का?, ती नक्की कोणाची निवड करणार याची झलक टीझरमध्ये पाहता ही उत्सुकता वाढलेली दिसली. इतकच नव्हे तर सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांच्या विनोदी अंगानं टीझर अधिकच रंगतदार झाला आहे.

‘TRISHOOLIN CINEVISION’ प्रस्तुत आणि स्वरूप सावंत दिग्दर्शित ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री तमन्ना बांदेकर प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण आहे. समोर आलेल्या टीझरमध्ये तमन्नाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली असून तिने तिच्या कलेने नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकली. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक स्वरुप सावंत याने सांभाळली असून दिग्दर्शनाबरोबर स्वरूप सावंत याने चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारीही पेलवली आहे. तर संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे असून लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी बाजू सांभाळली आहे. आणि हा संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाच्या तगड्या स्टारकास्टने लक्ष वेधून घेतलं आहे. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या नवाकोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच म्हणजे यंदाची मे महिन्यात रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.