१४ फेब्रुवारी २०२५ ला छावा सिनेमा प्रदर्शित झाला. अन् आता एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरही सर्वत्र छावा सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाने जगभरात ७०० कोटींहून जास्त व्यवसाय केलाय. छावा चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेतले गेले. यातील कलाकारांना ट्रोल करण्यात आले तरीही सोनं चकाकणारच याप्रमाणे या चित्रपटाने प्रसिद्धीच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘छावा’ सिनेमा पाहणार असून संसदेत सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं जाणार आहे.

संसद भवनात ‘छावा’चं विशेष स्क्रीनिंग होणार आहे. पंतप्रधान मोदीजी २७ मार्चला संसद भवनातील लायब्ररी इमारतीमधील बालयोगी सभागृहात विकी कौशलच्या छावाच्या स्क्रीनिंगला उपस्थिती दर्शवणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे इतर मंत्री आणि संसदेतील इतर राजकीय व्यक्ती सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी याआधीच छावा सिनेमाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे छावा बघितल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.


या स्क्रीनिंगला छावा मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजन सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.