स्टार प्रवाहच्या उदे गं अंबे मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. साडेतीन शक्तिपीठांमधील ‘अ’कार पीठ म्हणजेच माहुरच्या रेणुका देवीचं महात्म्य आपण मालिकेच्या रुपात साक्षात अनुभवलं. उर्वरित शक्तिपीठांची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तोवर उदे गं अंबे ही मालिका अल्पविराम घेणार आहे.
या मालिकेत आदिशक्ती आणि शिवशंकरांची भूमिका साकारत असलेल्या देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांनी मालिकेला दिलेल्या भरभरुन प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘प्रेक्षकांनी दिलेल्या मायेमुळेच आणि कौतुकामुळेच आम्ही कलाकार आजवर धडाडीने काम करत आलो. जी उदंड माया तुम्ही आमच्यावर केलीत तेवढच निर्व्याज प्रेम तुमचं उदे गं अंबे वर ही होतं. आज आम्ही ही श्री रेणुका महात्म्याची पुष्पांजली देवी आईच्या चरणी ठेवत आहोत.

जी काही कलारुपी सेवा आमच्या हातून घडली ती सगळी देवी चरणी आणि तुम्हा मायबाप रसिकांचरणी सादर समर्पित. आम्ही आभारी आहोत स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजनचे ज्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची संधी आम्हाला दिली. आणि ऋणी आहोत तुम्हा रसिक प्रेक्षकांचे ज्यांनी आम्हाला आपल्या हृदयात स्थान दिलं. आता पुन्हा येऊ नव्या शक्तिपीठाची गोष्ट घेऊन तोवर तूर्तास निरोप घेतो. हा निरोप पूर्णविरामाचा नाहीये हा अल्पविराम आहे. कारण आईची गाथा आभाळा एवढी आहे; ती अशी शे पाचशे - हजार भागांमध्ये सांगून संपणारी नाहीये. तेव्हां हा स्नेहबंध आणि माया अशीच जागती ठेवा.. आपल्या मनामनात आणि घरा घरात आईचा उदोकार गर्जू दे; उदे गं अंबे!!.. क्षण निरोपाचा नाही; अल्पविरामाचा!!!..’