मनाला भिडणारे अनोखे विषय नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी मराठी सिनेसृष्टी जागतिक पातळीवर ओळखली जाते. अशाच पद्धतीचा तसेच 'आजचा संघर्ष, उद्याचे सामर्थ्य' अशी प्रेरणादायी टॅगलाईन असलेला 'नयन' येत्या शुक्रवारी म्हणजेच २१ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण विषय अतियश सहजपणे सादर करण्यात आला आहे.
गोपी एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्मात्या अरुणा मोरे यांनी 'नयन' या बहुचर्चित चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'नयन'ची कथा-संवादलेखन अंकुश मोरे यांनी केले असून, त्यांनीच या चित्रपटाचे कल्पक दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाची कथा कोकणात घडणारी आहे. नृत्याची आवड असलेल्या नयनची रोमांचक तसेच हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट जरी एका नयनची असली तरी ती जगभरातील असंख्य तरुणांचे प्रतिनिधीत्व करणारी आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने समाजातील एक जळजळीत वास्तव रुपेरी पडद्यावर सादर करण्याचे धाडस अंकुश मोरे यांनी केले आहे. अंकुश मोरे यांना कलाकारांची अचूक साथ लाभल्याने 'नयन'च्या रूपात एक सर्वांगसुंदर कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाबाबत अंकुश मोरे म्हणाले की, या चित्रपटाची कथा वेगवेगळे पैलू उलगडणारी आहे. समाजातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत अनेक प्रश्न उपस्थित करणारी असून, त्यावर अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे. आजवर क्वचितच चर्चिल्या गेलेल्या विषयाला 'नयन' वाचा फोडणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नयनसारख्या असंख्य तरुणांची व्यथा आणि कथा समाजासमोर येणार आहे. यामुळे कदाचित भविष्यातील नयनरूपी तरुणांचे आयुष्य सुखकर होण्याची शक्यता आहे. आशयघन कथानक, मुद्दूसूद पटकथा, अर्थपूर्ण संवाद, आपलीशी वाटणारी बोलीभाषा, सहजसुंदर अभिनय, उत्कंठावर्धक दिग्दर्शन, पटकथेशी एकरूप होणारी गाणी, कर्णमधूर संगीत, सुरेख सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये याद्वारे 'नयन'च्या रूपात एक परिपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल्याचेही मोरे म्हणाले.
'नयन'ची पटकथा नारायण गोंडाळ यांनी लिहिली असून, संकलन सुबोध सुधाकर नारकर यांनी केले आहे. सिद्धेश पै, मोनालिसा बागल, सुहास पळशीकर, अंशुमाला पाटील, रिना लिमन, गणेश यादव, दीपक शिर्के, विजय पाटकर, प्रणव रावराणे, श्रीनिधी शेट्टी आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सुरेश वाडकर, जावेद अली, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, राहुल सक्सेना या मराठीतील आघाडीच्या गायकांनी 'नयन'मधील गाणी गायली आहेत. संगीत विक्रांत वार्डे यांचे आहे, तर पार्श्वसंगीत पंकज पडघम यांनी दिले आहे. नृत्यदिग्दर्शन सिद्धार्थ पै यांचे असून, ध्वनी संयोजन सुनील पाटोळे यांनी केले आहे. छायालेखन डिओपी राजा फडतरे यांचे असून, महेश भारंबे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. रंगभूषा दादाभाई सेना समुद्रे, संतोष चारी यांनी, तर वेशभूषा महेश यांनी केली आहे.