बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि चॉकलेट हिरो रणबीर कपूर लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. असे आलिया भट्टने स्वतः म्हटले आहे. खरं तर, आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जो व्हिडीओ शेअर केला आहे त्या व्हिडीओमध्ये आलियाच्या हातात एक पोस्टर असल्याचे पाहायला मिळत आहे. आलिया म्हणते, “मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. माझे सर्वांत आवडते अभिनेते लवकरच एकत्र किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिसणार आहेत.” त्यानंतर ती तिच्याजवळ असलेले पोस्टर दाखवते. पोस्टरवर लिहिले आहे, 'अल्टीमेट ब्लॉकबस्टर'.
पोस्ट शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बॅटल फॉर बेस्ट’ माझे दोन आवडते कलाकार एकमेकांच्या विरुद्ध. तथापि, आलियाच्या पोस्टवरून हे स्पष्ट झालेले नाही की ते चित्रपटाचे पोस्टर आहे की जाहिरातीचे. कारण आलियाने कॅप्शनमध्ये #AD असे लिहिले आहे. त्यामुळे चाहते गोंधळलेले आहेत. याबदद्लची माहिती लवकरच शेअर केली जाईल.

आलियाच्या पोस्टनंतर, चाहते दोन्ही स्टार्सना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, मी वाट पाहू शकत नाही. तर इतर चाहत्यांनी ‘लेजेंड कोलॅबोरेटिंग’ लिहिले.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल देखील मुख्य भूमिकेत आहे. त्याच वेळी आमिर खान तारे जमीन पर चित्रपटाचा सिक्वेल ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटमधून जोरदार पुनरागमन करत आहे.