बॉलिवूडचा किंग म्हणजे शाहरुख खानचे चाहते संपूर्ण जगभरात आहे. शाहरुखचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकिट काढतात. भारतात शाहरुखची जितकी लोकप्रियता आहे तितकीच लोकप्रियता त्याच्या घराची म्हणजेच मन्नतची आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी मन्नतचे वेगळेच आकर्षण आहे. पण लवकरच काही काळासाठी शाहरुख खान मन्नत सोडणार आहे.
शाहरुख खान आणि कुटुंब लवकरच मन्नतमधून काही काळासाठी दुसरीकडे वास्तव्यासाठी जाणार आहेत. येत्या मे महिन्यात शाहरुख खानच्या प्रसिद्ध मन्नत बंगल्याचे नूतनीकरण आणि विस्ताराचे काम सुरु होणार असल्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब वांद्रे येथील पाली हिल येथे स्थलांतरित होत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता वाशू भगनानी यांनी बांधलेल्या आलिशान अपार्टमेंटचे चार मजले शाहरुखने भाड्याने घेतले आहेत. चार मजल्यांसाठी ₹24 लाख मासिक भाडे शाहरुख खान देणार आहे. तर ही संपूर्ण डील तीन वर्षांसाठी 8.67 कोटींमध्ये पक्की करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील उच्चभ्रू वस्ती पाली हिल्स आणि खार पश्चिममध्ये दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत.

एका पोर्टलवर आलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रजिस्टर करण्यात आलं आहे. शाहरुख खान याने भाड्याने घेतलेल्या पहिला ड्युप्लेक्स फ्लॅट अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी आणि त्याची बहिण दीक्षा देशमुख यांच्या मालकिची असून हा फ्लॅट ११.५४ लाख प्रति महिना या रकमेवर भाड्याने देण्यात आला आहे. तर दुसरा ड्युप्लेक्स फ्लॅट निर्माते वासू भगनानी यांचा असून त्याचे भाडे प्रति महिना १२.६१ लाख इतके आहे. दोन्ही घरांसाठी शाहरुख खानने ६८ लाखांहून अधिक डिपॉजिट जमा केले आहे.

बॉलिवूडमध्ये लग्झरी अपार्टमेंट भाड्याने घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. अनेक मोठ्या कलाकारांनीही महागडे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. रणबीर कपूरने २०२३ मध्ये पुण्यातील ट्रंप टॉवर्समध्ये ४ लाख प्रति महिना या दराने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.
अमिताभ बच्चन यांनी २०२१ मध्ये कृती सेननला १० लाख प्रति महिना भाड्याने ड्युप्लेक्स दिला होता. अलीकडेच श्रद्धा कपूर, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन या कलाकारांनी देखील मुंबईतील प्राइम लोकेशनवर घरं भाड्याने घेतली आहेत.