भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासातील काळेकुट्ट म्हणता येईल, असे जालियनवाला बाग हत्याकांड आहे. ब्रिटीश सोजिरांनी इथे मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवला होता. या सत्यघटनेवर आधारित ‘द वेकिंग ऑफ नेशन’ ही नवी मालिका येत्या ७ मार्च पासून सोनी लिव्ह चॅनलवर प्रक्षेपित होणार आहे. या मालिकेचे ट्रेलर नुकतेच सादर करण्यात आले.

राष्ट्रीय पुरस्कार व एमी ॲवॉर्ड विजेते निर्माते व दिग्दर्शक राम माधवानी यांनी ही मालिका तयार केली आहे. या मालिकेत कांतिलाल सहानीने उघडकीस आणलेल्या गोऱ्या इंग्रजांच्या कुटील कारस्थानाची कथा सादर करण्यात आली आहे. हंटर कमिशनच्या अहवालावरून या हत्याकांडाचा इतिहास त्यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कांतिलाललची भूमिका तारुक नैनाने केली आहे.
“भारतीय नागरिकांचे साहस व बलिदानाची ही कथा आहे. जालियनवाला बागेतील नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. वेगळ्या पद्धतीने ही कथा सादर करण्याचा मला अभिमान आहे,” असे राम माधवानी यांनी सांगितले. तर तारुक नैना म्हणतो, “सत्य आणि आपली नोकरी यामध्ये अडकलेल्या कांतिलाल सहानीची भूमिका मला मिळाली, हा माझा सन्मान समजतो. ही भूमिका आव्हानात्मक होती. आपला देश घडविण्यासाठी लोकांनी केलेला त्याग व बलिदान या मालिकेतून लोकांसमोर येत आहे.”
या मालिकेत तारुक सह निकिता दत्ता, साहिल मेहता व भावशील सिंह साहनी प्रमुख भूमिकेत आहेत.