त्याच्या आजोबांनी लहानपणीच ‘विक्रम चक्रम’नाव ठेवलंय त्याला,
ते काय उगीच? हा चक्रमपणा नाही तर काय? यशोदा, सवयी बदलायला हव्यात हो त्याच्या. लहानपणी ठीक होतं, आता मोठा झालाय तो. बरं, घरात ठीक आहे. परवा माझ्याबरोबर अंकितच्या मुंजीला आला होता ना, तिथे पण जेवून झाल्यावर ताटात पाणी घालून ते प्यायला हा. सगळे बघत होते आजूबाजूचे. बरं दिसतं का सांग?
“आपण दोघंही उदार, खर्चीक, बोटांच्या फटींतून सटासट पैसे निसटणारे. कोणाला काही द्यायचं असेल, तेव्हा भरभरून देणारे. मग हाच कसा काय असा निपजला गं? म्हणे मुलांचे गुण जीन्समधून आलेले असतात. आनुवंशिक असतात. मग विक्रम कसा असा झालाय कोणास ठाऊक?”
“अगदी लहान होता तेव्हाही आठवतं ना, दिलेला खाऊ कसा पुरवून-पुरवून खायचा ते? कोणाच्या बारशाचे, रीझल्टचे पेढे आले आणि प्रत्येकाला एकेक पेढा दिला, तर आपण सगळे आपापला पेढा खाऊन पार. पण विक्रमचा पेढा फ्रीजमध्ये एखाद्या वाटीत. मग त्याचा तुकडा तोडून-तोडून हा खाणार. बरं पेढ्याचं तरी ठीक. याच्या पहिल्या पगाराचे याने पेढे आणले किलोभर. मग ते तरी मनापासून खावे ना! आपल्या हातात एकेक पेढा देऊन बाकी पेढ्यांचा खोका त्याच्या टेबलावर. मुंग्या कशाला येतात म्हणून पाहिलं, तर याच्या पेढ्यांना. मग ते पुठ्ठ्याच्या खोक्यातून काढून स्टीलच्या डब्यात ठेवले. मुंग्या यायच्या थांबल्या, पण बुरशी कशी थांबणार? ती यायची चिन्हं दिसायला लागल्यावर मग नाइलाजाने गेले ते पेढे फ्रीजमध्ये. असला हा.”
“अगं, लहानपणी दगडी पेन्सिली, खडू, शिसपेन्सिली आठवतं ना? अगदी अर्ध्या इंचाचा तुकडा राहीपर्यंत वापरायचा ते. हातात पकडून लिहिताना बोटं दुखली तरी हरकत नाही. बोटांचं काय, थांबतील दुखायची नंतर. पण वस्तू फुकट जायला नको. शिसपेन्सिलीचं ही आठवतं ना? हातात पकडता येईनाशी झाल्यावर ब्लेडने कापून तिच्यातलं शिसं काढायचं. मग शिसं घालून लिहायच्या पेन्सिलीतून शिसं काढताना बोट केवढं कापलं होतं ते?”
“त्याच्या आजोबांनी लहानपणीच ‘विक्रम चक्रम’नाव ठेवलंय त्याला, ते काय उगीच? हा चक्रमपणा नाही तर काय? यशोदा, सवयी बदलायला हव्यात हो त्याच्या. इतकं तरी हे असं बरं का? लहानपणी ठीक होतं, आता मोठा झालाय तो. बरं, घरात ठीक आहे. परवा माझ्याबरोबर अंकितच्या मुंजीला आला होता ना, तिथे पण जेवून झाल्यावर ताटात पाणी घालून ते प्यायला हा. सगळे बघत होते आजूबाजूचे. बरं दिसतं का सांग?” आजींनी तक्रार केली.
“मी तरी काय करू आई? विक्रम आणि विनिता, दोघांवर मीच केलेत ना संस्कार? विनिता आहे का अशी? मग आता याच्या कंजूषपणाला मी कशी काय जबाबदार, ते सांगा. मला वाटतं, माझं यशोदा नावच बदलून घ्यायला हवं. आईचं नाव यशोदा असलं की मुलाच्या तक्रारी ऐकायची वेळ येणारच ना तिच्यावर.”
“नशीब की आपलं तेच जपतोय. दुसर्याचं उचलत नाहीये, त्या यशोदेच्या कान्ह्यासारखं,” आजींनी शक्यता वर्तवलीच.
“अगं, त्याचं नाव कान्हा नाहीये ना? कंजूषपणाचे सगळे ‘विक्रम’ मात्र मोडीत काढलेत या ‘विक्रम-चक्रम’ने.” आजोबांनी आपला मुद्दा मांडला.
“लहानपणी आठवतं का, एकदा नवीन रेनकोट घेतला होता आणि दुसर्याच दिवशी हा धोधो पावसात भिजत आला शाळेतून? तरी नशीब की, शाळेपासून शाळेच्या बसपर्यंत आणि इथे बसमधून उतरल्यापासून जिन्यापर्यंतच यायचं होतं. पण तिथे शाळेत एकेक मूल रांगेतून बसमध्ये चढवतात ना? चिप्प भिजून आला. पण बॅगमधली रेनकोटची घडी म्हणून उघडली नाही पठ्ठ्याने. का? तर म्हणे नवीन आहे ना? फाटेल! हिशोबाचा कच्चाच पहिल्यापासून? तुझ्यासारखाच यशोदा.”
“हे कसले हिशोब करतोस तू यशोधन. दोन-दोन खांद्यावरून सामान आणायचं. टॅक्सी करायची नाही आणि मग खांदे दुखतात, म्हणून डॉक्टरची बिलं भरायची. त्यातलाच हा प्रकार झाला विक्रमचा. पावसात भिजून आजारी पडला आणि डॉक्टरचं बिल झालं तीन रेनकोटांच्या किमतीइतकं.”
“पण मी विक्रमसारखा रुमाल तरी शिवून वापरत नाही. तो तर बनियनला भोकं पडली, तरी शिवून मागतो तुझ्याकडे आणि तूही देतेस शिवून.”
“मग काय करू? तो कपाटातून नवीन बनियन काढणार नाही. तसाच फाटका घालून जाणार, म्हणून देते शिवून. नाहीतर भर उकाड्यात जाडजूड कापडाचा शर्ट घालून जाईल, बनियनची भोकं शर्टातून दिसू
नयेत म्हणून. परवा तर सॉक्स पण घेतला शिवून माझ्याकडून.”
“आता सुईदोरा घेऊन तयार असतेस,
तर देतो बिचारा एकेक काम आणून तुझ्या हातात. एवढी छान फुलं भरलीस त्याच्या उशीच्या अभ्य्रावर, तर ती खराब होतील म्हणून जुना फाटका अभ्रा त्याने त्या भरलेल्या अभ्य्रावर चढवलाय. ती भरलेली फुलं दिसतात तरी का कोणाला? आणि चांगल्या चादरीवर जुनी चादर पसरून ठेवतो. नवीन पांघरूण दिलंय कपाटातून, तर म्हणतोय जुनंच दे शिवून, थोडेसेच फाटलंय म्हणे.”
“त्याला काय हसतोस यशोधन? तू नाही का परवा पॅन्टचा खिसा शिवून घेतलास? एवढे जड मोबाईल ठेवायचे खिशात. मग खिसे फाटतात. शिवाय ही एवढी नाणी! खिसा म्हणजे जणू काही टाकसाळच.”
“हो, पण विक्रमसारख्या शर्टांच्या कॉलरी उलट्या करून तर नाही घेतल्या? घडीवर झिजल्या म्हणून? आता एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी आहे, असले दरिद्री चाळे कशाला करायचे? मी तर म्हणतो की, चांगले सुस्थितीत असतानाच द्यावे कपडे एखाद्या गरिबाला.”
“अरे, वह्यांसारख्या वह्या ज्याने इतक्या काटकसरीने वापरल्या, त्याही शाळेच्या वयात. तो आता मोठा झाल्यावर काय उधळमाधळ करणार? विनिताला जिथे दोन वह्या लागायच्या, तिथे याची एक वहीदेखील संपायची नाही. आठवतंय ना? तेव्हा तर तू खूप कौतुक करायचास त्याच्या काटकसरीचं, मग आता काय झालं?”
“काटकसर आणि कंजूषपणा या दोघांमध्ये एका बारीकशा रेषेचं अंतर असतं फक्त. ते अंतर पारच करून टाकलंय त्या चक्रमादित्याने. आजोबांनी ठेवलेलं नाव अगदी खरं करून दाखवतोय तो.”
“आता बघ, विनिताही डाएट कंट्रोल करते, फिगर चांगली राहावी म्हणून. पण विक्रम मोजून-मापून का खातो माहितीये?
शर्ट-पॅन्ट वाया जातील म्हणून. नशीब की फार लहानपणीच केलं नाही हे त्याने. नाहीतर झबल्यांमध्ये पण मावला असता अजूनपर्यंत तो. अशाने ही दोघंही आजारी पडणार बघ एके दिवशी. आणि मग त्यांच्या खस्ता काढता काढता माझी फिगर आपोआप मेनटेन राहील.”
“हो. आणि मी एकटाच जाड होत गेलो, तर शोभायचो नाही मी तुमच्यात. म्हणून मग मलाही कमी खावं लागेल सडपातळ होण्यासाठी. नाहीतर जग म्हणेल, हा यशोधन सगळं धन स्वतःच्याच जिवासाठी वापरतोय असं दिसतं. एकंदरीत, फार कमी खर्चात घर चालणारसं दिसतंय. आईबाबा तर असेही कमीच आहार घेतात हल्ली. ”
“तू आणखी नस्ती खुळं डोक्यात घालून घेऊ नकोस यशोधन. नाहीतर तुझ्या पण सेवेत मला रुजू व्हावं लागेल. मग तर मला आजारी पडण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.”
“तू आजारी पडलीस ना यशोदा, तर मग कोणालाच डाएट कंट्रोल करायची गरज नाही. बनायचंच नाही काही चांगलंचुंगलं. म्हणजे, आपोआप डाएट कंट्रोल.”
“तरी हल्ली पाहिलंस, जरा महागाच्या वस्तू घ्यायला लागलाय विकी. परवा ते जॉगिंगसाठी बूट घेतले, ते पाहिलेस ना किती हजारांचे?”
“हो. बूट घेतलेत, पण तेव्हापासून चालणं किती कमी केलंय. म्हणजे जॉगिंगसाठी बूट घेतलेत आणि बुटांसाठी जॉगिंग बंद केलंय. घेतलेत पण, मारे आकाशी रंगाचे. मग मळणारच ना ते? आणि मळलेले दिसले, तर आई धुऊन काढणार हे पण माहितीय त्याला. म्हणून तर तुला खास सांगून ठेवलंय त्याने की, धुवायचे नाहीत म्हणून. कारण धुऊन धुऊन बुटांचं चिकटवलेलं सोल निघाले तर? म्हणून मग मळकेच वापरायचे. जास्तीत जास्त काय, तर ओल्या कपड्याने पुसून काढायचे. ओल्या पण नाही, ओलसर.”
“तरी नशीब की टूथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम यांच्या वापरात कंजूषपणा करत नाहीये.”
“हो. टूथपेस्ट तर जरा जास्तच वापरतो. दिवसांतून जितक्या वेळा काही खाणार, तितक्या वेळा दात घासणार. का, तर म्हणे डेंटिस्टची ट्रीटमेंट खूप महाग असते ना, त्यामुळे दात सांभाळूनच वापरले पाहिजेत.”
“हो. याच्याउलट त्या विनिताला रात्री झोपताना पण दात घासायची आठवण करावी लागते. तिच्या अंगात आळसच खूप.”
“काय गं आई? मी काय आळशी आहे? रात्री झोप आलेली असते, म्हणून मग कंटाळा येतो.”
ही विनिता नेमकी हिच्याविषयी मनात बोलायला लागलं की कुठून टपकते, कुणास ठाऊक? यशोदेच्या मनात आलंच. मग विषयांतर करत ती म्हणाली, “विकीची गाडी येतेय ना विनिता. मग आता तुला नेऊन सोडेल बघ कुठे-कुठे.”
“तो कसला सोडतोय मला! कंजूसला पेट्रोल लागेल ना तेवढं. बिचार्या कंजूसच्या कंजूषपणावर भाष्य करताना कोणीही कंजूषपणा करत नाही घरात.” त्याच्याविषयी बोलायला आणि तो घरात यायला एकच गाठ पडली.
“आई, गाडी आली बघ माझी. बाबा, आजीआजोबा, विनी सगळे या बघायला. आणि घरापर्यंत चालवत आणली हं का विनी. ट्रॉलीवर टाकून नाही आणली.”
“मग आता लाँग ड्राइव्हवर नेशील ना सर्वांना?” विनिताने विचारलंच.
‘लाँग ड्राइव्ह’ म्हटल्यावर विक्रमचा चेहरा जरा पडलाच. मनातल्या मनात पेट्रोलला किती पैसे पडतील हाच हिशोब करत असणार. सर्वांना असाच अंदाज होता. पण खरं कारण काही वेगळंच होतं.
“स्पेशल ऑफर होती. सगळ्या अॅक्सेसरीज दिल्या त्याने. सीट्सना कव्हर, पायाशी टाकायला मॅटस्, स्टिअरिंग व्हीलचं कव्हर, गाडीवर घालायला कव्हर अगदी सगळं सगळं दिलं त्याने. आता फक्त चार टायर्सना घालायला चार कव्हरं तेवढी शिवायला दिलीत. रस्ते खूप खराब झालेत ना. आत्ता येताना किती सांभाळून आणली गाडी. तरीपण एकदा दगड आलाच टायरखाली. खड्डे पण लागले एक-दोनदा. पटापट झिजतील ना अशाने टायर्स? ती टायर्सची कव्हरं शिवून आली की मग जाऊ या लाँग ड्राइव्हला.”
- डॉ. सुमन नवलकर