Close

आधी नाही का सांगायचं (Short Story: Adhi Nahi Ka Sangaychya)


  • मिथिलाने खरंच मनावर घेतलं होतं. ऑफिसमधल्या मैत्रिणींकडून बरीच माहिती गोळा केली होती. शिवाय वरती स्वतःच्या मेंदू चालवणं होतंच. कृत्रिम उपाय म्हणजे क्रीमं-ब्रिमं चेहर्‍याला लावण्यापेक्षा आधी नैसर्गिक फेशियल करायचं ठरवलं तिने. ऑफिसमधून आली की सौंदर्य-चिकीत्सा चालू व्हायची.
    चला! चाळीशी झाली ना मिथिला? आता हळूहळू म्हातारी दिसायला लागशील तू.”
    “मिस्टर मिहीर, माझी चाळीशी म्हणजे आपली बेचाळीशी हे विसरताय आपण!”
    “नाही. मी काहीही विसरलेलो नाही. पण तुम्हा बायकांना सौंदर्यचिकीत्सा जरा जास्तच असते ना? आमचं काही तसं नसतं.”
    “नसतं कसलं? माझ्यापेक्षा जास्त वेळ तुलाच लागतो आरशासमोर. केस नीट बसले नाहीत. दाढीचे खुंट मधे-मधे राहून गेले. शर्टाची इस्त्री बरोबर झाली नाही. बुटांना पॉलिश करायचं राहिलं. एक ना दोन.”
    “हो. पण चाळीशी पुरी होताहोता डोळ्यांना लागलेली ही चाळीशी मात्र व्यवस्थित डोळ्यांवर चढवूनच जातो ऑफिसला.”
    “अरे, तो नाईलाजच झाला. कारण डोळ्यांना चष्मा न लावता कॉम्प्यूटरवर दिसतच नसणार काही.”
    “मग तेच तर सांगतोय. आता तुलाही चाळीशी लागणार आणि ती सतत मिरवूनच जावं लागेल. ऑफिसला, आणखी कुठे.”
    “शी, म्हणजे लग्नकार्याला, कुठल्या समारंभाला नटूनथटून जायचं आणि डोळ्यांवर चष्मा?”
    “हो ना! तेच तर सांगतोय . आत्ताच परवा सांगत होतीस ना की बसचा नंबर दिसला नाही आणि भलत्याच बसमध्ये शिरलीस. चाळीशी झाली बाई. आता हे असंच चालणार!”
    “ठीक आहे, पण मी काही तुझ्यासारखा बायफोकल काचांचा चष्मा नाही बाई घेणार. प्रोग्रेसिव्ह घेईन सिसिलियासारखा. म्हणजे निदान चष्म्याकडे पाहून तरी वय नाही कळणार कोणाला.”
    “अहो बाई, खूप महाग असतो तो चष्मा. तुम्ही कंजूसबाई कसला घेणार प्रोग्रेसिव्ह काचांचा चष्मा?”
    “घेईन घेईन. खूप काटकसर
    केली मी इतकी वर्ष. तुझ्यासारखी टॅक्सीने नाही फिरले. बसने, नाहीतर ट्रेनने फिरले.”
    “हो, आणि दर महिन्याला चपला सँडल्स झिजवले आणि नवे घेतले.”
    “वर्षानुवर्षं सगळ्यांच्या कपड्यांना स्वतः इस्त्री केली.”
    “हो आणि विजेची लठ्ठ लठ्ठ
    बिलं भरली.”
    “वॉशिंग मशीन पण, ‘सेव्हर’वर लावलं. साबणाचं पाणी वाया जाऊ दिलं नाही. तेच पाणी दुसर्‍या कपड्यांसाठी वापरलं.”
    “तरीच ते चांगले चांगले
    कपडे लादी पुसायच्या फडक्यासारखे दिसतात.”
    “भांडी घासणं, जमीन पुसणं पण मीच करते.”
    “आणि आजारी पडून डॉक्टरांची बिलं भरतेस. शिवाय हातापायांना क्रिम फासतेस.”
    “ही सगळी कामं मी नोकरी सांभाळून करते.”
    “हो, आणि संध्याकाळी घरी येतेस तेव्हा चहा करून पिण्याचं
    त्राण पण अंगात नसतं.”
    “मग काय झालं, चहा तू केलास तर? समानतेचं युग आहे मिस्टर, आहात कुठे?”
    “शिवाय मुलांनाही क्लास-ट्यूशन्सना पाठवावं लागतंय. तू
    घरात असतीस तर तो खर्च वाचला असता ना?”
    “जेवणात पण खूप पैसे वाचवते मी. तेल-तूप कमी घालते. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेहासारखी आजारपणं नाही होत. फिगर पण चांगली राहते.”
    “हो, मग कातडी सुकी पडते. मग मॉईश्‍चरायजर, कोल्ड क्रिम असलं काय-काय महागडं आणून फासत बसतेस हातापायांना. अंगाला.”
    “तू काहीही म्हण. आता मी काय काय करणार आहे स्वतःसाठी. फेशियल, हेअरडाय, मॅनिक्युअर, पेडिक्युअर. ऐकून बरंच काय काय माहितीय मला. आता करायला लागणाराय एकेक.’ चाळीशीनंतर लागतं म्हणे हे सर्व करावं, तारुण्य टिकवण्यासाठी. पाहिजे तर तुलाही करीन सगळं माझ्याबरोबर, जिममध्ये पण जायचा विचार आहे, फिगर
    मेन्टेन करायसाठी. अंग सुटतं म्हणतात चाळीशीनंतर.”
    “वा! वा! प्रोग्रॅम तर चांगला आखलायस. आता प्रत्यक्षात काय काय करतेयस ते पाहू या.”
    मिथिलाने खरंच मनावर घेतलं होतं. ऑफिसमधल्या मैत्रिणींकडून बरीच माहिती गोळा केली होती. शिवाय वरती स्वतःच्या मेंदू चालवणं होतंच. कृत्रिम उपाय म्हणजे क्रिमं-ब्रिमं चेहर्‍याला लावण्यापेक्षा आधी नैसर्गिक फेशियल करायचं ठरवलं तिने. ऑफिसमधून आली की सौंदर्य चिकीत्सा चालू व्हायची.
  • “काय आई, हल्ली रोज-रोज कोशिंबीर असते जेवणात?” चार दिवस रोज काकडीची कोशिंबीर खाल्ल्यावर मानसने विचारलं.
    “अरे, हल्ली रोज ऑफिसमधून आल्यावर काकडीचं फेशियल करते. चेहरा स्वच्छ धुवायचा, पुसायचा. मग संपूर्ण चेहर्‍यावर काकडीच्या चकत्या लावून स्वस्थ पडून राहायचं अर्धा तास. डोळ्यांच्या पापण्यांवर पण
    दोन चकत्या असतात. त्यामुळे डोळ्ेही बंद असतात. कधी-कधी झोप पण लागून जाते. पण खरंच बघ, त्वचा किती टवटवीत वाटतेय! मला तर रंगही उजळल्यासारखा वाटतोय. मी तर मयूरीला पण सांगणार आहे, सुट्टीच्या दिवशी करायला. शिवाय काकडीचं फेशियल केलं की पैशाची पण बचत होते. काकडीच्या चकत्या चेहर्‍यावरून काढल्या की त्याच धुवून बारीक चिरते. आत मिरच्या-कोथिंबीर-शेंगदाण्याचा कूट घालते. लिंबू पिळते. झाली कोशिंबीर.”
    “म्हणजे त्या फेशियलसाठी वापरलेल्या काकडीचीच कोशिंबीर खायला घालतेस आम्हाला? खरंच ग्रेट आहेस हं ग तू आई.”
    “अरे, मग काय ती काकडी फेकून देऊ?”
    “अग, फेकायचीच असते ती. आता उद्यापासून तू त्या चकत्या धुवूच नकोस. म्हणजे मग
    मीठसुद्धा घालायला नको तुला कोशिंबिरीत. आपल्या घामात असतो ना खारटपणा?”
    “अरे, उद्यापासून मी कलिंगडाचं फेशियल करणार आहे, उद्यापासून रोज ज्यूस प्या कलिंगडाचा.”
    “म्हणजे? चेहर्‍यावर लावलेल्या कलिंगडाच्या चकत्यांचाच ज्यूस?”
    “हो, धुऊन घेईन ना? मगच करीन ज्यूस.”
  • एक आठवडाभर काकडीची कोशिंबीर झाली. मग एक आठवडा कलिंगडाचा ज्यूस झाला. त्याच्या पुढच्या आठवड्यात गाजराचा हलवा. नंतरच्या आठवड्यात नाही, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिथिलाने बिटाच्या चकत्यांचं फेशियल केलं. सगळा चेहरा गुलाबी रंगाचा झाला. साबण लावून धुता धुता साबणाची वडी अर्धी झाली. त्यामुळे बिटाची कोशिंबीर एकच दिवस खावी लागली.
    दुसर्‍या दिवशी भज्यांचा बेत होता. मुलं, मिहीर सगळेच खूश झाले. कोशिंबिरीपासून सुटका. शिवाय काहीतरी चविष्ट खायला मिळालं. आणि आईने चेहर्‍याला लावलेल्या चकत्यांचीच कोशिंबीर, हलवा, ज्यूस म्हटल्यावर नाही म्हटलं तरी थोडीफार घाण वाटत होतीच.
    “वा मिथिला, आज भजी? मजा आहे बुवा! चाळीशी उलटल्यावर ताकद वाढलेली दिसतेय तुझी. ऑफिसमधून थकून आल्यावर गरमागरम भजी म्हणजे-”
    “अरे, आज चण्याच्या पिठाचं पॅक लावलं ना चेहर्‍याला! मग एवढं पीठ काय फुकट घालवायचं?”
    “म्हणजे? त्याच पिठाची भजी की काय ही?”
    “हो. आणि पीठ काय धुऊनही घेता येत नाही ना?”
    “म्हणजे मग त्यात मीठही घालावं लागलं नसणार!”
    यावर मिथिला गप्पच बसली. ‘मौनं सर्वार्थसाधनम्’ म्हणा किंवा ‘सायलेन्स इज गोल्डन’ म्हणा. काहीही म्हणा, पण मनातल्या मनात म्हणा.”
    बाकीच्यांची पोटं तशी भक्कम होती. पण मानसचं पोट पहिल्यापासून जरा नाजूकच. त्याच्या पोटाला हा रोजरोजचा ताण सोसेना. सारखं पोटात दुखायला लागलं. शेवटी डॉक्टरकडे न्यावं लागलं.
    “काहीतरी वेगळं गेलंय बुवा आहारात. कुठे हॉटेलात वगैरे गेला होतात का जेवायला? किंवा पाणी-बिणी?” दोन दिवस डॉक्टरांची
    बिलं भरली, तेव्हा कुठे मानसची पोटदुखी थांबली.
    “आई, उद्यापासून तुझे ते फेशियलचे पदार्थ खाणार नाही हं ग मी.” मानसने घोषणा केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मग धीटपणे मिहीर आणि मयूरीनेही फेशियलचे पदार्थ खाणं सोडलं. आता एवढं काय एकटीने खायचं? म्हटल्यावर ‘नॅचरल फेशियल थेरपी’ नाईलाजाने बंदच करावी लागली मिथिलाला. विकतचं फेसपॅक आणावंच लागलं नाईलाजाने. अर्थात तो फेसपॅक पण धूऊन टाकणं जिवावर यायचं तिला. पण फेसपॅकचं पिठलं किंवा फेसपॅकची आमटी आपणही खाऊ शकणार नाही, याविषयी खात्री होती तिची.
    शेवटी ‘कधीतरी जमेल तेव्हा फेसपॅक लावायचा’, अशा निर्णयापर्यंत गाडी येऊन थांबली. रोज रोज चेहर्‍याकडे निरखून पाहताना मधून-मधून केसांकडेही लक्ष जायचं. मधे मधे रुपेरी तारा डोकवायला लागल्या होत्या. हेअर डाय? नको- त्याने केस जातात म्हणे! मग हेअर कलर? फार महाग असतात म्हणे ते. शिवाय लावायलाही बराच त्रास होतो म्हणतात. मग मेंदी? हं, तेच बरं.
    मग मिथिलाने छानशी राजस्थानी मेंदी आणली. शनिवारी संध्याकाळी मस्त तीन-चार तास लावून ठेवली केसांना. तेवढ्यात मिहीर आला.
    “हे काय डोक्यावर
    कडक मडक्यासारखं?”
    “काय हे! मेंदी लावलीय मी. थोडी शिल्लक आहे. तुला पण लावू का?”
    “नको बाबा, तूच कर काय
    ती थेरं.”
    मग मिथिलाने स्वच्छ केस धुतले. दुसर्‍या दिवशी पुन्हा शांपू केले. केस सुळसुळीत, तकतकीत झाले खरे, पण इथे शिंका येऊन मिथिला बेजार झाली. डोकं जाम दुखायला लागलं. बाम लावला, व्हिक्स लावलं. शेवटी गोळी घेतली. सोमवारपर्यंत सर्दीचं रुपांतर तापात झालं होतं!
    “आपल्याला झेपेल तीच गोष्ट करावी मिसेस देसाई. सायनसायटीस झालाय तुम्हाला. ही औषधं घ्याच. शिवाय वाफही घ्यावी लागेल काही दिवस.” तापाने तोंड कडू झालं. जेवण जाईना. गाल आत गेले. गालांवरची कातडी आणखी सुरकुतल्यासारखी दिसायला लागली. ‘नको बुवा ती मेंदी. एवढे काही जास्त पिकले नाहीयेत केस,’ मिथिलाने विचार केला. ‘आता राहिलेल्या मेंदीचे कोन बनवून मयूरीलाच देऊ. सणावाराची काढेल नक्षी हातांवर. आणि आपली अजून थोडी सर्दी शिल्लक आहे. सोना बाथ? सोना बाथच घ्यावा झालं. त्याने तर म्हणे त्वचाही चांगली होते. सर्दीही जाते. चला, उद्या सकाळी सोनाबाथच घ्यायचा!
    मग मिथिला सकाळी जरा लवकरच उठली. बाथरूमच्या काचा बंद केल्या. गिझरचं अगदी गरम पाणी बादलीत लावलं. बाथरूमचा दरवाजा बंद केला. आणि बसली बाथरूममधे.
    वाफेने बाथरूम भरून गेली. पंधरा-वीस मिनिटे वाफ घ्यायची म्हणून गिझरचं पाणी जरा जास्तच गरम होतं. वाफ घेऊन झाल्यावर त्याच पाण्याने आंघोळ करायची म्हटली तर चटका. शेवटी मिथिलाच्या सोनाबाथ साठीच्या बादलीभर पाण्यात भर घालून तिघांच्या आंघोळी झाल्या. खरं तर मिहीरला त्या दिवशी केस कापायला जायचं होतं, पण पाणी थंड होऊन जाईल म्हटल्यावर केस कापायचा बेत पुढल्या रविवारवर ढकलत, त्यानेही घेतली आंघोळ करून.
    ‘मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर मात्र करायचंच आपण. ते काम कसं सोपं आहे आणि आपल्या जरुरीचं पण.’ मग पुढल्या रविवारी ऑफिसमधून येताना मिथिला प्युमिक स्टोन घेऊन आली. खुर्चीच्या पुढ्यात साबणपाण्याची बालदी घेऊन बसली. आधी थोडा वेळ हात बुडवून ठेवले पाण्यात. नंतर मग पाय बुडवून ठेवले अर्धा तास. आणि मग घेतले घासायला. छान टी. व्ही. वरच्या बायकांसारखे सुरेख व्हायला हवेत पाय. घासतेय आपली घासतेय. खरंच गुळगुळीत झाले पाय. मग हात-पाय स्वच्छ धुवायसाठी मिथिला बाथरूममधे गेली. जाताना साबणपाण्याची बालदी घेऊनच गेली. साबणाचं पाणी फुकट जायला नको. त्यात प्लॅस्टिकची फुलं-वेली बुडवून ठेवू. तेवढ्यात मिहीर ऑफिसमधून आला आणि कशालासा गेला खुर्चीजवळ.
    सर्रर्र-धप्प. मिथिला बाथरूममधून धावत आली बाहेर. मिहीर सांडलेल्या साबण पाण्यात आडवा. उठला, तर पाय मुरगळलेला. मग पुन्हा डॉक्टर. तोही घरी म्हणजे व्हिजिट फी सकट.
    आणि हे काय? मिथिलाचे पाय का असे भगभगताहेत? जास्त घासले गेले की काय? मग दोन दिवस सुट्टी घेऊन, सॉक्स घालून घरात बसावं लागलं. नशीब मॅनिक्युअर केलं नव्हतं. नाहीतर स्वैपाकीण आणि मोलकरीण पण ठेवावी लागली असती. व्हिजिट करून डॉक्टर गेल्यावर मग मिथिलाने हातांची नखं जरा साफसूफ करून त्याना आकार वगैरे दिला आणि नेलपॉलिश लावलं. मिहीरने काय आणलंय ते पाहण्यासाठी मग तिने पिशवी उघडली. अळू? श्श्या! आत्ता एवढे सुंदर केले हात. आता होतील पुन्हा काळे कुळकुळीत.
    मिथिला जाम वैतागली. नको नको ती ब्युटी ट्रीटमेंट. आहे ते ठीक आहे. पण चष्मा मात्र छानच घ्यायचा. सोनेरी फ्रेमचा, प्रोग्रेसिव्ह काचांचा. थोडे पैसे जास्त गेले तरी हरकत नाही. पण चेहर्‍याला जरा तरी शोभा आली पाहिजे. अगदी लग्ना कार्यात पण लावणार आपण तो. म्हणजे एक प्रकारचा दागिनाच म्हणा ना! करू
    थोडे जास्त पैसे खर्च. पण चष्मा चांगलाच घ्यायचा.
    बर्‍याच वर्षांनी मिथिलाने एवढी महागडी खरेदी करायचं ठरवलं. डोळे नीट तपासून व्यवस्थित नंबर काढून घेतला. किती फ्रेम्स लावून पाहिल्या, तेव्हा कुठे छानशी फ्रेम निवडली. प्रोग्रेसिव्ह काचा बनवायला सांगितल्या. बायफोकल काचा नको बाई. काचा पाहूनच वय समजतं दुसर्‍याला. चांगले चार दिवस लागले चष्मा मिळायला.
    चष्मा लावून पाहिला. “शी! त्या दिवशी किती छान दिसत होती ही फ्रेम. मग आता अशी का दिसतेय? त्या दिवशी चेहरा अगदी खुलून दिसत होता या फ्रेममध्ये. आज का असा खडबडीत दिसतोय? बदलली की काय याने फ्रेम?’ मिथिला पुटपुटली.
    “अग मिथिला, त्या दिवशी फ्रेमच्या आत काचा नव्हत्या. त्यामुळे नीट दिसलं नसेल तुला. आता तुझ्या डोळ्यांच्या नंबराच्या काचा आल्या ना फ्रेमच्या आत? मग चेहरा छान दिसत असणार?
    “छान नाही रे, अगदीच घाण दिसतोय. सुरकुत्या जास्तच वाटतायच जरा. केस पण जरा जास्तच पिकलेले वाटतायत.” एवढ्या महागड्या चष्म्यातही मिथिलाचा चेहरा खुलेना. घरी आली तरी मिथिला हिरमुसलेलीच होती.
    मग मिहीरने हळूच मयूरीला डोळा मारला.
    “वाः आई, आला काय तुझा चष्मा? छान दिसतोय हं का अगदी. अगदी चष्म्याच्या जाहिरातीतल्या बाईसारखी दिसतेस तू.”
    “उगीच खोटं बोलू नकोस. तू सांग रे मानस.”
    मानसला हायकिंगला जायचंय, आता खरं बोललं तर आई पाठवायचीच नाही हायकिंगला. मग खोटं सांगावं का? “आपली मयूरी कधी खोटं बोलते का आई?” मानसने ‘नरो वा कुंजरो वा’ केलं. पण मिथिलाच्या चेहर्‍यावर समाधान दिसेना.
    ‘खरंच चिकनी दिसतेयस तू आई. आणि वयापेक्षा लहानही. त्या दिवशी तू आणि मी कुठे बरं गेलो होतो?
    तर तो हा नाही का भेटला होता? आपला तो हा ग- हं हर्षद. तो विचारत होता, मोठी बहीण का रे तुझी म्हणून.”
    “काय म्हणतोस? मी तुझी बहीण वाटले त्याला? ग्रेट. मग आधी नाही का सांगायचं? उगीच इतकी मागे लागले मी ब्युटी ट्रीटमेंटच्या.”
    आनंदाने मिथिलाचा चेहरा उजळला. गालांवर हसू फुललं. सुरकुत्या त्यानेच दिसेनाशा झाल्या. तेवढ्यात माळी आला. देवाचे हार रात्री आठला? मिथिला भडकली, “काय हे माळी? ही काय वेळ झाली का हार द्यायची? आता सांगशील काहीतरी निमित्त, संध्याकाळी सहापर्यंत तरी नकोत का हार आणून द्यायला? आणि फुलं तरी ताजी आहेत का? आता काय झोपताना हार घालायचे का देवाला? आणि हारांत फुलं तरी आहेत का व्यवस्थित? का आहेत आपली जानवी?”
    माळी गेल्यावर मिहीर समजुतीच्या स्वरात म्हणाला, “राग अगदी वाईट मिथिला. त्याने चेहर्‍यावरच्या रेषा वाढतात.”
    “हो का रे? मग आधी नाही का सांगायचं?”
  • डॉ. सुमन नवलकर

Share this article