Close

हॅलो, कुठे आहेस ? (Short Story: Hello, Kuthe Ahese?)

‘काय हे, सासूबाई! किती हो साध्या भोळ्या.’ म्हणजे ‘बावळट’ बरं का पमे, तर म्हणे ‘काकी नाही काकडी टाइप करायचं होतं, तर घाईघाईत ‘डी’ टाईप करायचा राहिला.’ अगं तिला काकडी हवी होती चिम्पूसाठी.

  • पमीच्या पर्समधला मोबाईल वाजला तशी पमीची नेहमीप्रमाणेच नुसती धांदल उडाली. मोबाईल हा सगळ्यांप्रमाणेच तिचाही प्राण होता. एक नाही तर दोन मोबाईल्स ती जवळ बाळगायची. एक बोलण्यासाठी नि दुसरा एसएमएसेस बघायला आणि पाठवायला, एवढ्याच कामासाठी! आताही पमीने पर्सची चेन खेचत, झटापटा करत, हा कप्पा तो कप्पा शोधत एकदाचा तो वाजणारा मोबाईल बाहेर काढला, “हॅलो, सुमे बोल! कुठे आहेस?”
    “अगं पमे, मी इथेच आहे, अगं…”
    “अय्या, मी पण इथेच… ए सुमे थांब हं, एसएमएसची घंटा वाजलीय, बघते. त्यासाठी मुद्दाम दुसरा मोबाईल ठेवलाय.”
    “अय्या पमे, मीही दुसरा मोबाईल ठेवलाय एसएमएससाठी…”
    “ए सुमे, अगं फालतू होता एसएमएस! नवर्‍याचा गं! हं, बोल कशी आहेस?”
    “अय्या पमे, मला माझ्या सूनबाईचा एसएमएस आलाय. ऐक हं, ूशींरपर श्रिशरीश हळीर्रींूर ाळीरलहूर ररपर! छान! बघ तरी पमे, कशी हुकूम सोडते!”
    “हो की गं! कम्मालाय्! सासूने हिरव्या मिरच्या आणायच्या का?” पमीने सासू-सून या पारंपरिक हाडवैर असलेल्या नात्यावर उगाचच एक ताशेरा झोडला.
    “पण मी कमी नाही बरं का पमे, आता चांगला गनिमी कावा खेळते!” म्हणत सुमीने टाइप केलं, अगं मी मिटींगमध्ये आहे. सॉरी, हिरव्या मिरच्या आणू शकत नाही.
    “ए सुमे, छान खरमरीत एसएमएस केलास ना? वाच तरी.” पमीने सुमीला तो एसएमएस वाचून दाखवला. तशी पमी म्हणाली, “आहेस खरी चतुर! सुमे, अस्सा गोड शब्दात डाव उलटवावा!”
    “आता कसं बोललीस पमे? अगं थांब, सुनेचाच जवाब आहे, ऐक हं,”
    “अगं वाच वाच सुमे! मला किनई असले कौटुंबिक एसएमएसेस वाचायला फाऽऽर आवडतं! अगं माझा मुलगा माझ्या सुनेला कसले वात्रट एसएमएसेस पाठवतो, इश्श्य्”
    “ए ए पमे, अगं माझी सून तर चोरावर मोर निघाली. अगं तिने सरळ सरळ हल्ला केलाय. तिने एसएमएस केलाय, तो ऐक. तिनं लिहिलंय, ओके, नो प्रॉब्लेम. हिरव्या मिरच्यांऐवजी मी तुमच्या उपासाच्या भाजीत खांदा…”
    “अगं खांदा? देवा देवा! कुणाला खांदा द्यायला…” पमीला अडवत सुमी म्हणाली, “ऐक गं, खांदा नाही कांदा! अगं ती लिहितेय, तुमच्या उपासाच्या भाजीत कांदा, लसूण, फिश, यांचे हात लागलेलं लाल तिखट टाकते, बाय डिअर सासू मां! अरे देवा, ए थांब गं, तिला एसएमएस करते!” म्हणत सुमीने टाइप केलं, अगं, मीटिंग संपली. हिरव्या मिरच्या आणते. आणि मग ती पमीला म्हणाली, “केलं एकदाचं सेन्ड! चला, डिलीव्हर्ड टू मिनू! हं, बोल पमे.”
    “काय बोलू? या एसएमएसने भारी गोंधळ होतात. अगं त्या दिवशी, माझ्या सुनेने मला एसएमएस केला, येताना काकी घेऊन या. तर मला कळेचना. बाईसाहेबांना फोन करून विचारायला गेले, तर महाराणीने फोन स्विच्ड ऑफ केलेला! मग मी डोकं चालवलं, मनाशी म्हटलं, काक्की म्हणजे काकवी तर नाही.? पण म्हटलं, हा शब्द आमच्या सुनेला नक्की ठाऊक नसणार!”
    पमीने जरा श्‍वास घ्यायला पॉज घेताच सुमी म्हणाली, “हो, ना पमे, या हल्लीच्या मुलींना भात माहीत नाही गं, राइस, राइस असं ओरडतात.. कोकोनटने ओटी भरतात आणि व्हॉट इज नारळ असं लाडिकपणे विचारतात. बरं ते जाऊ दे! तुझ्या सुनेला काय हवं होतं नेमकं?”
    पमीने म्हटलं, “सांगते ना! मी म्हटलं, हिला तिच्या, माझ्या किंवा तिच्या नवर्‍याच्या काकीला- म्हणजे माझ्या जाऊबाईंना भेटायचं असणार! पण माझी काकी केव्हाच ‘वर’ गेली आहे. आमच्या जाऊबाई तर भटक्या जमातीतल्या, कध्धी घरी सापडणार नाही, उरल्या सुनेच्या काकी! मग मी सरळ तिच्या काकीच्या घरी गेले, म्हटलं, ‘चला, तुमच्या लाडक्या पुतणीने तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलावलंय!’ तर म्हणतात कशा, येते ना, पण एका अटीवर! मिनिटाला शंभर रुपये रेट आहे माझा!”
    “रेट?” सुमीने आश्‍चर्याने विचारले. “म्हणजे सेलिब्रिटी आहे का गं तिची काकी?”
    त्यावर पमी उद्गारली, “ते मला माहीत नाही. पण ती काकी तरी स्वतःला सेलिब्रिटी समजते. आता कुणी स्वतःला करिना कपूर समजावं किंवा बिपाशा बासू समजावं हे मी कोण ठरवणार?”
    “अगं, पण करते तरी काय तुझ्या
    सुनेची काकी?” सुमीने आश्‍चर्याने विचारलं.
    “आर्टिस्ट आहे म्हणे ती! कुठल्याशा मराठी सिरीअलमध्ये असते बाई ती!” पमी उपहासाने म्हणाली. “अय्या! खरंच?” सुमीचा प्रश्‍न!
    त्यावर अगदी निर्विकार स्वरात पमी म्हणाली, “ते मी कसं सांगू. अगं आम्ही सिरीअल बघतो तेव्हा त्या एपिसोडमध्ये म्हणे त्यांची एन्ट्रीच नसते, असं आमच्या सूनबाईचं म्हणणं! तर ते जाऊ दे! मी तिच्या काकीला म्हटलं, जरा कमी करा ना रेट, दोन तासांसाठी नेतेय मी तुम्हाला! शिवाय लंचही देणार, नंतर डेझर्ट..”
    “अय्या! डेझर्ट? काय होतं गं डेझर्टमध्ये?” सुमीने परकर्‍या पोरीच्या उतावळेपणाने विचारलं.
    “होतं ग काहीतरी, आपलं शिक्रण होतं ग केळ्याचं.. तर काय सांगत होते, रेटबद्दल! काकी म्हणतात कश्या, ‘अहो पुतणी म्हणून कमीच रेट सांगितलाय!’ मग काय नेलं तिला घरी. तर अग आमची दिव्य सून विचारते, ‘अय्या! काकी कुठे मध्येच आली आपल्या घरी?’ मग मी शहाणीला काकीचा एसएमएस दाखवला, तर खो खो हसत सून मलाच विचारते, ‘काय हे, सासूबाई! किती हो साध्या भोळ्या.’ म्हणजे ‘बावळट’ बरं का पमे, तर म्हणे ‘काकी नाही काकडी टाइप करायचं होतं, तर घाईघाईत ‘डी’ टाईप करायचा राहिला.’ अगं तिला काकडी हवी होती चिम्पूसाठी.”
    पमी बोलून दमली म्हणून थांबली. तशी संधी साधत सुमीने विचारलं. “चिम्पू म्हणजे तुझा नातू ना? त्याला काकडी आवडते वाटतं?”
    “अगं नातू कसला काकड्या, टोमॅटो खातो. त्याला हवी, मॅगी, पेपी, कुरकुरे, च्युईंगम… अगं चिम्पू म्हणजे सुनेचं पेट! पांढरा उंदीर पाळलाय तिने! त्याला काकडी लागते, टोमॅटो लागतात, काजू, बदाम लागतात! चोवीस तास चिम्पू चिम्पू करते गं माझी सून!”
    पमीचं बोलणं ऐकून सुमीने आश्‍चर्याने विचारलं, “चोवीस तास?”
    “हो अगं.” पमीने खुलासा केला, “चिम्पूला अंघोळ काय घालते, पावडर काय, काजळ म्हणू नकोस.. अगं हिने त्याची सेवा केली, तर म्हणे तिला ब्रेक मिळणार! मोठी कलाकार व्हायचंय ना आमच्या सुनेला!”
    “कुणी सांगितलंय पण हे तुझ्या सुनेला?”
    “अगं सुमे! टी.व्ही. वरच्या ‘तारे बोले नसीब डोले’ या प्रोगॅ्रममधल्या ज्योतिषाने सांगितलं. अगं हजारो रुपये खर्चून मोबाईलवरून तासन्तास चर्चा करून हिच्या पत्रिकेचा त्या ज्योतिषाने कीस पाडला आणि शेवटी कन्या राशीच्या बाईने गणपतीचं वाहन पाळावं, असं सांगून हा उंदीर बाहेर काढला. सुनेला अजून ब्रेक तर नाहीच मिळाला, पण तिच्या काकीला बारा हजार रुपयांचा धनलाभ झाला चिम्पूमुळे.”
    “मज्जाच आहे! ए थांब, मला दुसरा फोन येतोय.”
    “हो, हो, कळलं! ठेवते.”
    “अगं पमे! मिस्टरांचा फोन. म्हणे किती बोलता मोबाईलवरून! महिन्याला दहा-दहा हजारांची बिलं येतात. पण मी म्हणते. प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा मोबाईलवर बोलणं स्वस्त आहे! हो की नाही गं? अगं आता मला सांग, माझी ताई राहाते दिल्लीला! आता विमानाने ताईकडे जाण्यापेक्षा तिच्याशी दोन-चार तास बोलणं स्वस्त पडतं की नाही? पण आमच्या नवरोजींना कळतच नाही! बरं ते जाऊ दे! अगं नव्या साड्या घेतल्यास की नाही?” सुमीचा प्रश्‍न ऐकून पमीला तर कित्ती बोलू असं झालं.
    “अगं सुमे, हल्ली किनई मी टी.व्ही.च्या हजार चॅनेल्सपैकी दहा-बारा तरी चॅनेल्सवर रेसिपीचे प्रोग्रॅम करते, ‘खादाडराणी’, ‘आम्ही फक्त खादाड’, ‘खा खा खात राहा’, असे मस्त चॅनल्स आहेत. प्रत्येक शोवर मला कांजिवरम, उपाडा सिल्क, कच्छी सिल्क असल्या साड्या मिळतात बक्षिसाच्या! अगं आणि रेसिपीला काय डोकं लागतं? बिनधास्त ह्याच्यात ते त्याच्यात हे, ह्याच्यात त्याच्यात हे ते घालून वर कोथिंबीर, खोबरंटोबरं पेरलं की मस्त सुगरणीची करामत प्लेटमध्ये रेड्डी!” पमी हसतच सुटली.
    सुमी म्हणाली, “अगंबाई रेसिपीवरून आठवलं! मला प्रचंड भूक लागलीय… दुपारचा एक वाजून गेलाय… भुकेने चक्कर येऊन पडेन मी सोफ्यावर.”
    यावर घाबरून पमी म्हणाली., “अगं थांब थांब, पडू नकोस बाई! …. अगं, पण तू कुठे आहेस?”
    “अगं मी ‘चार्मिंग लेडी’ ब्युटी पार्लरमध्ये आहे, शिवाजी पार्कच्या!”
    “काऽऽय, सुमे, चार्मिंग लेडी? अगं मीही तिथेच आहे, या भल्यामोठ्या लांबलचक सोफ्यावर बसलेय! केसांना मेंदी लावलीय, तोंडाला पांढरा सफेद फेसपॅक चोपडलाय… अंगावर मळकट गाऊन आहे…” पमी ओरडली.
    तशी सुमी किंचाळली. “काऽऽय? अगं मी पण याच अवतारात आहे की!”
    “काय, सांगतेस काय सुमे? म्हणजे आपण एकाच सोफ्याच्या दोन टोकांवर बसलोय! अगं बघ तरी वळून!” म्हणत पमीने मोबाईल बंद केला.
    सुमीही मोबाईल स्विच ऑफ करीत पमीजवळ आली. म्हणाली, “ओ हो! पमे! या भुतांच्या अवतारात आपण ओळखलंच नाही. थांब हं. रुमालाने माझं तोंड पुसते,” असं म्हणत सुमीने रुमालाने तोंड पुसलं.
    “आता, बघ कशी दिसते?” सुमीने विचारलं.
    पमीनेही रुमालाने तोंड पुसलं. ती म्हणाली, “जशी आहेस तशीच दिसतेस तू! अगं वेडे, 65व्या वर्षी पार्लरमध्ये फेशियल करून आपल्या चेहर्‍यावर काय फरक पडणार? एक समाजकार्य म्हणून ठीक आहे.”
    “समाजकार्य?” सुमीच्या प्रश्‍नावर पमी उत्तरली.
    “अगं या हजारो पार्लर्सना आपल्यासारख्यांकडून भरपूर पैसे मिळतात. हे समाजकार्यच.”
    “हो हो” म्हणत सुमीने तिला टाळी दिली.
  • प्रियंवदा करंडे

Share this article