छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलरची घोषणा ‘मॅडॉक फिम्स’कडून करण्यात आली होती. आता नुकताच ‘छावा’मधील रश्मिका मंदानाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. तर, महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. रश्मिकाचा ‘छावा’ चित्रपटातील पहिला लूक ट्रेलर प्रदर्शनाच्या एक दिवसआधी प्रेक्षकांसमोर रिव्हिल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, श्री सखी राज्ञी जयति महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारण्यासाठी रश्मिकाने प्रचंड मेहनत घेतली आहे. यासाठी मराठी भाषेचं प्रशिक्षण घेतल्याचंही तिने मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. चेहऱ्यावर प्रसन्न करुन टाकणार स्मितहास्य, कपाळी कुंकू, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक ऐतिहासिक दागिने, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असा रश्मिकाचा चित्रपटातील पहिला लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.
रश्मिकाचा मराठमोळा लूक तिच्या लाखो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. “श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई सरकार!”, “आमच्या महाराणी येसूबाई…खूपच सुंदर रश्मिका”, “महाराणी येसूबाई सरकार यांची भूमिका साकारणं ही रश्मिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे”, “जय जिजाऊ जय शिवराय…” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.
दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल.