बिहारमधील गयामध्ये हिंदू, बुद्ध आणि जैन या तीनही धर्मांचा जणू त्रिवेणी संगमच आहे. आयुष्यात एकदा तरी आवर्जून भेट द्यावं असंच हे ठिकाण आहे.
हिंदुस्थानातील बिहारमधील गया या स्थळास एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या ठिकाणी हिंदू, बुद्ध आणि
जैन या तीनही धर्मांचा त्रिवेणी संगमच आहे जणू.
फार पूर्वी गया हे एक मोठं शिक्षणाचं क्षेत्र होतं. अनेक देशातून विद्यार्थी गया येथे उच्च शिक्षणास येत असत. त्यातील एक अतिशय मोठं नाव आहे, ते ह्यु येन त्सिंग याचं. हा चिनी प्रवासी भारतात उच्च शिक्षण आणि मुख्यत्वे करून बौद्ध धर्माचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आला होता. भारतात काशी, अयोध्या, कौसंबी अशी अनेक स्थळं पालथी घातल्यानंतर तो पाटलीपुत्र (आत्ताचं पाटणा) आणि गया इथे स्थिरावला. इथे दोनहून अधिक वर्षं तो संस्कृत, व्याकरण, तर्कशास्त्र या विषयांचं अध्ययन करत होता. त्याने भारताबद्दल आणि येथील उच्च शिक्षणाबद्दल अतिशय सुंदर लिहून ठेवलं आहे. ते आपण सर्वांनी शाळेत असताना वाचलंच आहे.
राजपुत्र सिद्धार्थ गौतम याने गया इथे एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसून तप केलं. तीन दिवस आणि तीन रात्र राजपुत्र सिद्धार्थ त्या जागेवरून उठला नाही. त्यानंतर त्यास ज्ञान प्राप्त झालं. हाच तो बोधिवृक्ष. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्ध सात पावलं चालले आणि जवळच्या एका टेकडीवर पुन्हा ध्यान लावून बसले. तिथे त्यांना बोधितत्त्व प्राप्त झालं, असं म्हणतात, ज्यातून बुद्ध धर्म साकारला.
समाजातील कलासक्तीचं दर्शन
या झाडाच्या आवारात एक मंदिर होतं. हे मंदिर इ.स. पूर्वी बांधलं गेलं आहे, असं म्हणतात. पुढे सम्राट अशोकने त्याच ठिकाणी एक अतिशय सुंदर मंदिर बांधलं. पुढे अनेक लढाया आणि इतर कारणांमुळे मंदिराची पडझड झाली. पण त्याचा अनेक वेळा
जीर्णोद्धारही झाला आहे. त्यातील अनेक जुने दगडी खांब शेजारील संग्रहालयात पाहायला मिळतात. मधलं उंच शिखर आणि शेजारी लहान लहान दोन शिखरं, सर्व काही दगडी आहे. त्यावरील कोरीव काम पाहण्यासारखं आहे. त्यावरून
त्या वेळची समाजामधील कलासक्ती लक्षात येते.
मंदिर परिसरातील या बोधि वृक्षाखाली अनेक बुद्ध संन्यासी ध्यान लावून बसलेले दिसतात. इतरही लोक शांतपणे बसून आत्मशांती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. बोधि वृक्षाची खाली पडलेली पानं लोक प्रसाद म्हणून उचलून घेतात. या बोधि वृक्षाच्या आसपासचा परिसर अतिशय शांत,
रम्य आणि मानसिक समाधान देणारा आहे. गौतम बुद्ध चालले ती सात पावलं आणि जवळ असणारी ती टेकडी, सर्व अतिशय पवित्र आणि निर्मळ वाटतं.
गयाचं आणखीन एक महत्त्व म्हणजे, इथे देशातील सर्व भागातून लोक पिंडदान करण्यासाठी येतात. जेवढं काशीस केलेल्या पिंडदानाचं महत्त्व आहे; तेवढंच महत्त्व गया येथील पिंडदानासही आहे. याविषयी एक मजेदार कथा इथे प्रचलित आहे. ती अशी…
काशीएवढंच पिंडदानाचं महत्त्व
गया गावात एक नदी आहे, फालगू. ही नदी म्हणजे एक वाळूचं मोठं पात्र आहे, जिथे कधी काळी नदी वाहत असावी, असं वाटतं. त्या फालगू नदीचीदेखील एक मजेदार दंतकथा इथे सांगितली जाते. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासास निघाले, तेव्हा राजा दशरथाचं पिंडदान करण्यास ते फालगू नदीच्या तीरावर आले. त्या वेळी फालगू नदीत भरपूर पाणी होतं.
पिंडदानाचं साहित्य आणण्यास आणि स्नानास राम-लक्ष्मण गेले. सीता वाट पाहत तिथेच नदीकिनारी थांबली. तेवढ्यात राजा दशरथ तिथे अचानक अवतरले आणि त्यांनी सीतेसच, राम व लक्ष्मणाची वाट न पाहता, वाळूचं पिंड बनवून त्याचं दान करण्यास सांगितलं. सीतेने त्याप्रमाणे वाळूचं पिंड बनविलं आणि तुळस, नदी, गाय आणि अक्षय वृक्ष यांच्या साक्षीने ब्राह्मणास दान दिलं. पिंडदान झाल्यानंतर दशरथ राजे अंतर्धान पावले.
सीतेने दिले शाप
थोड्या वेळाने राम आणि लक्ष्मण परत आले. तेव्हा सीतेने घडलेली हकिकत सांगितली. रामाचा विश्वास बसेना. तेव्हा सीतेने ते दान ज्या ब्राह्मणाने स्वीकारलं होतं, त्या ब्राह्मणास झाली हकिकत सांगण्याची विनंती केली. ब्राह्मण घाबरला आणि त्याने खरं काहीच सांगितलं नाही. तेव्हा सीतेने दानास साक्षी असलेल्या नदीस, तुळशीस, गायीस आणि अक्षय वृक्षास खरी हकिकत सांगण्याची विनंती केली. नदी, गाय आणि तुळस मूक राहिले. अक्षय वृक्षाने मात्र खरं सांगितलं.
तेव्हा सीतेने ब्राह्मण, नदी, गाय आणि तुळशीस शाप दिला. ब्राह्मणास शाप दिला की, तो जन्मभर भिक्षा मागून जगेल आणि कधीच समाधानी राहणार नाही. फालगू नदीस ती मूक राहिली म्हणून शाप दिला की, ती पूर्ण सुकेल आणि केवळ पावसाळ्यातच तिला पाणी राहील. गायीस शाप दिला की, तिच्या मुखाचं नाही, तर शेपटीचं सर्व दर्शन घेतील आणि तुळशीस शाप दिला की, दर तीन-चार महिन्यांनी ती सुकून जाईल आणि लोकांना नवी तुळस लावावी लागेल. अक्षय वृक्षास मात्र वर दिला की, गयेत येणारे सर्व लोक त्याच्यापाशी पिंडदान करतील.
म्हणूनच फालगू नदी सुकलेली असते, तिथले ब्राह्मण नेहमी केवळ भिक्षा मागतात, गायीला आपण शेपटीकडूनच नमस्कार करतो आणि तुळसदेखील वर्षानुवर्षं टिकत नाही. दर काही महिन्यांनी नवं रोप लावावं लागतं. अक्षय वृक्षापाशी मात्र रोज पिंडदान होतं.
रोज होतं पिंडदान
इथे होणार्या पिंडदानाचीही एक दंतकथा आहे. असं म्हणतात की, गयासूर नावाचा राक्षस खूप माजला होता. त्याचा अत्याचार सहन न होऊन लोक विष्णूकडे धावले. विष्णूने युक्तीने आपलं पाऊल गयासूराच्या डोक्यावर ठेवलं आणि त्यास नरकात पाठवलं. गयासुर खूप गयावया करू लागला की, नरकात त्यास काही खायला मिळणार नाही. तेव्हा विष्णूने त्यास उःशाप दिला की, गयेत लोक रोज अक्षय वृक्षाच्या छायेत पिंडदान करतील आणि ते सर्व गयासुरास खायला मिळेल. मंदिराच्या परिसरातच अक्षयवट आहे, जिथे लोक पिंडदान करतात. एक जरी दिवस असं झालं नाही, तर गयासूर पुन्हा पृथ्वीवर येईल, अशी तेथील लोकांची मान्यता आहे.
फालगू नदीच्या काठावर ‘विष्णूपद मंदिर’ आहे. हे हिंदू मंदिर आहे. या मंदिरात विष्णूची मूर्ती नव्हे, तर पाऊल आहे, जे विष्णूने गयासुराच्या डोक्यावर ठेवलं होतं. विष्णूचं हे पाऊल दगडी आहे. त्याभोवती चांदीची नक्षी केलेली आहे. फालगू नदीच्या काठावर बांधलेलं हे मंदिर अष्टकोनी आहे. या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता वनवासास निघाल्यावर आले होते, असं म्हणतात. पण पुढे 1787मध्ये देवी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या कळसावर सुवर्णध्वज फडकतो आहे.
गया शहराच्या आजूबाजूस सुंदर डोंगर आहेत. असं म्हणतात की, गयासूर राक्षस शांतपणे इथे पहुडला आहे. त्याच्या शरीराने हे डोंगराचं रूप धारण केलं आहे. त्याच्या नावावरूनच या गावाचं नाव ‘गया’ ठेवलं गेलं.
मंदिर परिसरात एक सुरेख बाग आहे. त्यास ‘मेडिटेशन पार्क’ म्हणतात. इथे एक खूप विशाल घंटा आहे. विशेष अतिथींच्या आगमनाच्या वेळी त्यांच्या हस्ते ही घंटा वाजवली जाते. या धर्माच्या त्रिवेणी संगमाच्या गावी एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.
- अंजली ठाकूर