आशिया खंडातील सर्वात मोठी मानली जाणारी टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ ही स्पर्धा रविवारी मुंबईत संपन्न झाली. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत या खेपेस विदेशी नवविजेत्यांनी बाजी मारली.
मॅरेथॉनच्या या २० व्या पर्वात आफ्रिका खंडातील इरिट्रिया या देशातील बेरहेन टेसफे याने अजिंक्यपद पटकावले. ४२ किलोमीटर्सचे अंतर त्याने २ तास ११ मिनिटे ४४ सेकंदात पूर्ण करून पुरुष एलिट गटात विजेतेपद मिळविले. त्याला ५० हजार डॉलर्सचे प्रथम पारितोषिक देण्यात आले.
याच देशातील मेरहावी केसेटे हा दुसऱ्या तर इथिओपियाचा टेसफाए देमेके याने तिसरा क्रमांक पटकावला. या दोघांना अनुक्रमे २५ व १५ हजार डॉलर्सचे पारितोषिक देण्यात आले.
एलिट पुरुष गटात भारतीय धावपटुंची कामगिरी लक्षवेधी ठरली. अनिश थापाने २ तास १७ मिनिटे २३ सेकंदात अंतर गाठले. तर मानसिंग व गोपी थोनाकल दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आले.
महिलांमध्ये केनिया देशाची जॉइस चेपकेमोई विजेती ठरली. तिने मॅरेथॉनचे अंतर २ तास २४ मिनिटे ५६ सेकंदात गाठले. भारतीय एलिट महिलांमध्ये निरमाबेन ठाकोरने विजेतेपद राखले. तिने २ तास ५० मिनिटे आणि ६ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. विशेष म्हणजे हे तिचे स्पर्धा जिंकण्याचे सलग दुसरे वर्ष आहे. सोनिका परमार आणि सोनम या तरुण महिलांनी यामध्ये दुसरे व तिसरे स्थान मिळवले.
अर्ध-मॅरेथॉनमध्ये देखील भारतीय धावपटुंनी आपली चमक दाखवली.