भारतीय सण ऋतुमानानुसार येतात आणि त्या ठराविक ऋतुप्रमाणेच काही पदार्थ बनवले जातात. हिवाळ्याला सुरुवात झाली किंवा जानेवारी महिन्यातला मकरसंक्रांतीचा सण आला की खास करून तिळाची आठवण येते. कुठल्या ना कुठल्या अन्नस्वरुपात नेहमीच तिळाचे सेवन केले जाते.
खरं तर भारताला तीळ वैदिक काळापासूनच ज्ञात होते. पण आजच्यासारखं जनसंपर्काचं माध्यम त्यावेळी अस्तित्त्वात नसल्याने त्याचा प्रवास सिमित राहिला. वैदिक काळात आर्य तेलबिया म्हणून तिळाचा उपयोग करत. हडप्पा संस्कृतीतही तिळाचे तेल दिव्यात वापरत असल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात.
तिळाचे झाड
तीळ हे बहुवार्षिक झाड आहे. ते खूप उंच वाढतं. त्याला घंटेच्या आकाराची इंचभर लांबीची फुले येतात. ही फुले पांढरी, पिवळसर किंवा निळ्या जांभळ्या रंगाचीही आढळतात. या झाडाला शेंगा धरतात. या शेंगातच हजारोच्या संख्यने तिळाचे दाणे असतात. याच दाण्यांना आपण तेलबिया असे म्हणतो. त्यातलं तेल काढून झाल्यावर वापरात न येणारा भाग म्हणजे पेंड. ही पेंड दुभत्या जनावरांसाठी पौष्टिक अन्न म्हणून वापरले जाते. तसेच केळी, ऊस, इत्यादी पिकांसाठी खत म्हणूनही त्याचा वापर करतात.
तीळ दोन प्रकारचे असतात. काळे व पांढरे तीळ. इंग्रजीत याला सेसॅमम इंडिकम किंवा सेसमी असे म्हणतात. भारत व चीन या देशात मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते. पाकिस्तान, ब्रह्मदेश, मेक्सिको, तुर्कस्थान,सुदान, नायजेरिया इत्यादी देशात तिळाचे उत्पादन घेतले जाते.
पाकक्रियेमधला तिळाचा समावेश गरजेचा दिसतो. भारताप्रमाणेच जगभरात तिळाचा पाकक्रियेमध्ये समावेश केला जातो. कच्चे तीळ किंवा भाजून तसेच त्याची पूड करूनही त्याचा वापर करतात. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्याही करतात. आपल्यामध्ये तिळाचा वापर गुळासोबत करून चविष्ट रेवड्या, लाडू, वड्या करतात. अगदी नाजूक असा पदार्थ म्हणजे काटेरी हलवा. विशेष म्हणजे महाराष्ट्रात संक्रांतीच्या काळात निरनिराळ्या प्रकारचे हलव्याचे दागिने बनविले जातात. लहान मुलं, सुवासिनी स्त्रिया, संक्रांतीच्या काही विशेष प्रसंगी ते धारण करतात.
गुजरातेत उंधियो या भाजीला तिळाशिवाय पर्याय नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी ठिकाणी तीळ व साखरेपासून गजक हा चविष्ट पदार्थ बनवतात. दक्षिणेतही बर्याच ठिकाणी चुरमुरे खोबर्याच्या प्रसादात तीळ वापरतात. काही ठिकाणी दैनंदिन स्वयंपाक बनविण्यासाठी व लोणची मुरवण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करतात. बेकरी पदार्थातही याचा वापर केला जातो. कित्येकदा बन, बिस्कीटे, केक यावर तीळ लावलेले असतात. प्राचीन ग्रीक लोक लग्न प्रसंगी तिळाच्या मिठाया पाहुण्यांना वाटत असत. तिळाची खीर युरोपमध्ये आवडीने बनवली जाते.
तीळ आणि निसर्ग
निसर्ग आपल्या ऋतुनुसार भाज्या, फळफुले देत असतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचा आजार मूळ धरण्याची शक्यता जास्त असते त्याला लगाम घालण्यासाठी निसर्गानेच निर्माण केलेली भाज्या, फळे, वनस्पती यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करायला हवा. हिवाळ्यात थंडीमुळे शरीराचे काही अवयव आखडतात. तसेच हात, पाय, त्वचा, केस यांना कोरडेपणा येतो. अशा वेळी त्याला स्निग्धतेची गरज असते. आणि हीच स्निग्धता तिळात ओतप्रोत भरलेली असते. तिळाच्या सेवनाने आखडलेले सांधे मोकळे व्हायला मदत होते. तसेच केस, अंगकांती मऊसूत होते. तिळासोबत गूळ वापरल्याने तिळातील तेल व गुळातील लोहतत्त्व शरीराला अनुक्रमे स्निग्धांश व उष्णता मिळवून देते.
तिळाचे औषधी गुणधर्म
मोनोअनसॅच्यरेटेड मेदाम्ल जास्त प्रमाणात तिळात असल्यामुळे ते रक्तातील कोलेस्ट्ररॉल वाढू देत नाही. लोह, मॅग्नेशियम, मँगेनीज, कॅल्शियम इत्यादी त्यात भरपूर प्रमाणात असतात. शरीराच्या कुठल्याही भागावर सूज आली असता तीळ तेलाचा मसाज केल्याने ती कमी व्हायला मदत होते. तिळाच्या सेवनाने शरीराच्या पेशींच्या नवनिर्मितीच्या कामाला वेग मिळतो. म्हणूनच त्याला अमर बीज किंवा सीडस् ऑफ इम्मॉर्टलिटी असेही संबोधले जाते. पूर्वी रोमन योद्धे बल व उर्जेसाठी नियमित तिळाचं सेवन करीत.
तिळाने सौंदर्यवृद्धी
आयुर्वेदात तिळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तीळ तेलाचे मर्दन करून अभ्यंग स्नान केल्याने कांती सतेज होते. हिवाळ्यात टाचेला पडलेल्या भेगांना नियमित तिळाचे तेल लावल्याने त्या भरून येतात. केसाच्या वाढीसाठी बाजारात मिळणार्या तेलात प्रामुख्याने तिळतेलाचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जुन्या काळातील रोमन स्त्रिया तारुण्य व सौंदर्य टिकवण्यासाठी तिळापासून केलेला हलवा(शिर्यासारखा) खात असत.
हिंदू मान्यतेनुसार तिळाचे स्थान मोठे आहे. धार्मिक विधींमध्ये तिळाला अग्रक्रम दिलेला आढळतो. बारसे, मुंज, जावळ काढणे इत्यादी शुभप्रसंगी पांढरे तीळ वापरण्याची प्रथा आहे. काळ्या तिळाचा वापर तर्पण, श्राद्ध या वेळी करतात. शनीदेवाला तीळ तेल वाहण्याची प्रथा आहे. असा हा तिळाचा प्रवास अगदी आपल्या जन्मापासून सुरू होऊन शेवटपर्यंत साथ करतो.
-अनुपमा