“आपण लोकांकडे पैसे मागतो, पण कुणी आपल्याला मागितले की, योग्य वाटत नाही. लोकांचे, जास्त करून मित्रांचे हे वर्तन मी जवळून पाहत राहिलो. त्यातून मला या चित्रपटाची कथा सुचली,” असे ‘संगी’चे लेखक विजयसिंह थोपटे यांनी सांगितले. या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.
तीन शाळकरी मित्र, तरुणपणी एकत्र येतात. त्यांच्यात पैसे व उधारी यावरून गमतीजमती होतात. ‘दोस्ती की मस्ती’ असे थोडक्यात ‘संगी’चे वर्णन करता येईल. या हलक्याफुलक्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत कुलकर्णी यांनी केले असून राहूल चोप्रा या हिंदी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. रोहन भोसले, अरुण-मोनिका प्रभुदेसाई, राजेंद्र शिंदे यांचाही या चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग आहे. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
शाहरिक हाश्मी, विद्या माळवदे, संजय बिश्नोई, शामराज, मीरा जगन्नाथ आणि ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. “या चित्रपटाची कथा माझ्या जीवनाशी निगडीत आहे. मला संघर्ष काळात दोस्तांनी मदत केली, त्यांनी उधार दिलेल्या पैशांमुळे मी आज उभा आहे,” अशी कृतज्ञता शाहरिक हाश्मीने या प्रसंगी व्यक्त केली. तर “यातील मोहिनी पात्र मला फारच आवडलं, जे मी साकार केलं आहे. सेटवर आम्ही खूप धमाल केली,” असं विद्या माळवदे म्हणाली.
“हा चित्रपट पाहून लोक आनंदित होतील,” असा आशावाद निर्माता रोहन भोसले यांनी व्यक्त केला. तर “पैसा वसुल करणारा आमचा हा चित्रपट आहे,” अशी प्रतिक्रिया निर्माता राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली.