थंड हवेत त्वचा कोरडी पडते. आर्द्र नसलेली त्वचा निस्तेज दिसते. तिला सतेज करण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात तिची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
त्वचेची काळजी घेण्याचा उत्तम पर्याय म्हणजे फेशियल. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. रक्तसंचार सुधारतो अन् त्वचा मोकळा श्वास घेते. ह्याचा परिणाम म्हणजे त्वचेचा पोत सुधारतो नि चेहरा टवटवीत, तेजस्वी दिसतो. जाणून घेऊया फेशियलचे प्रकार.
हायड्रेटिंग फेशियल
नाजूक, संवेदनशील, कोरड्या व रूक्ष त्वचेसाठी हे फेशियल अतिशय उपयुक्त आहे. ह्या फेशियलमध्ये त्वचेला हायड्रेटिंग सिरमने मसाज करतात. त्यामुळे त्वचेचे पोषण होते व रूक्ष त्वचा तेजस्वी दिसू लागते.
ज्वेल बेस्ड फेशियल
ह्या प्रकारात गोल्ड, डायमंड, पर्ल फेशियलचा समावेश होतो. यामध्ये चांगल्या प्रतीचे स्क्रब वापरतात. त्यामुळे मृत त्वचा निघून जाते. मसाज केल्याने रक्तसंचार सुधारतो व चेहरा टवटवीत दिसतो.
गोल्ड अन्य धातूंच्या तुलनेत मऊ असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम त्वचेवर होत नाही.
डायमंड फेशियलने त्वचेला नवीन झळाळी मिळते. पर्ल फेशियलमुळे त्वचेवरील काळे डाग तसेच काळवंडलेली त्वचा दूर होते. अन् त्वचा सुंदर दिसते.
शाइन अॅण्ड ग्लॉसी फेशियल
ह्यामध्ये ताज्या फळांचा अर्क आणि रस वापरला जातो. कोरड्या त्वचेसाठी त्यात ग्लिसरीन मिसळले जाते. ह्या फेशियलमुळे त्वचेला आर्द्रता प्राप्त होते.
सीवीड फेशियल
हे फेशियल करताना विविध विटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त क्रिमचा वापर करतात. त्यामुळे त्वचेतील विषद्रव्ये निघून जातात अन् त्वचा मऊ मुलायम होते. रूक्ष व निस्तेज त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असे हे फेशियल आहे.
मिनरल फेशियल
मिनरल फेशियलमध्ये स्क्रबिंग करून त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. त्यानंतर अद्यावत यंत्रांच्या साह्याने मिनरल्स त्वचेच्या आत पोहचवले जातात. त्यामुळे त्वचेचे पोषण होते नि त्वचेला उजाळा मिळतो.
ऑक्सिजन फेशियल
सध्याचे वाढते प्रदूषण नि वाढत्या वयोमानानुसार त्वचातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन चेहर्यावर सुरकुत्या पडू लागतात. ह्या फेशियलमध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन सिरमने त्वचेला मसाज केला जातो. आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा त्वचेला होतो. रक्तसंचार सुधारतो व त्वचा टवटवीत नि तेजस्वी दिसते.
क्यू 10 फेशियल
10 क्यू फेशियलमध्ये त्वचेला आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळतात. त्वचेचे आतून पोषण झाल्याने त्वचा निरोगी व तेजस्वी होते. चेहर्यावरील त्वचा पेशी अधिक चपळ होतात. त्वचेतील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलोजन प्रोटीन बनण्याची क्रिया अधिक चांगल्या प्रकारे होते. तसेच धूळ, धूप, प्रदूषणपासून त्वचेचे संरक्षण होते.
एच.ए. फेशियल
ह्यात अननस, लिंबू, द्राक्ष, सफरचंद, पपई यांसारख्या फळांचा वापर केला जातो. ह्या फळांमध्ये हाइड्रॉक्सी अॅसिड असल्याने कोलोजन बनण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सुरकुत्या येत नाहीत. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते. नव पेशींची निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा उजळतो. टवटवीत, फे्रश दिसतो.
कोलोजन फेशियल
वाढत्या वयानुसार त्वचा खेचली जाते. कोलोजन फेशियलमध्ये कोलोजन क्रिमने त्वचेला मसाज केला जातो नंतर पील मास्क लावतात. कोलोजनमुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्यामुळे सुरकुत्या येण्याची संभावना कमी होते. अन् निस्तेज त्वचा तेजस्वी होते.