‘फसक्लास दाभाडे’ या नवीन मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा दोन वैशिष्ट्यांनी रंगला. एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ व क्षिती जोग या सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या आयांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या ज्येष्ठ गृहिणींनी आपल्या लाडक्या मुलांचे बालपण, त्यांची स्वप्ने यांच्या मजेदार कहाण्या ऐकवल्या. या प्रसंगी या तीन आया व क्षिती, राजसी भावे, मिताली मयेकर, निवेदिता सराफ या अभिनेत्रींनी जरीकाठाच्या लालजर्द साड्या नेसल्या होत्या. तर दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेते सिद्धार्थ व अमेय यांनी लाल फेटे डोक्याला बांधले होते.
खुळ्या भावांची इरसाल स्टोरी, असे या चित्रपटाचे वर्णन करण्यात आले असून त्यांच्या आईच्या भूमिकेत निवेदिता आहे. “मी अतरंगी मुलांची आई झाले आहे. सर्व कुटुंबाला एकत्र धरून ठेवणं तिचं काम आहे,” असं निवेदिताने सांगितले.
या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य असे होते की, या सर्व कलाकारांनी चित्रा सिनेमाच्या प्रांगणात ट्रॅक्टर वरून एन्ट्री घेतली. ढोल-ताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
टी-सिरीज या बॉलिवूडच्या आघाडीच्या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूषण कुमार व कृष्ण कुमार यांच्यासह आनंद राय व क्षिती जोग हेही निर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजने वितरण केले आहे. लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे आहेत. हा चित्रपट शिरुर तालुक्यातील पिंपरखेड या आमच्या गावी तसेच मंचर, जुन्नर परिसरात चित्रित करण्याची माहिती हेमंतने दिली. संगीत अमितराज यांनी दिले आहे.