Close

‘बिग बॉस’चा अठरावा सिझन लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले (Bigg Boss 18 Finale Date: Where And How To Watch the Grand Finale?)

'बिग बॉस'चा अठरावा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सिझनच्या ग्रँड फिनालेची तारीख नुकतीच सलमान खानने जाहीर केली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात नऊ स्पर्धक असून त्याच्याच विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा अठरावा सिझन गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरपासून सुरू झाला. आता लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सूत्रसंचालक सलमान खानने नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली. येत्या १९ जानेवारी रोजी ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आता पुढच्या दोन आठवड्यांत प्रेक्षकांना या शोचा विजेता मिळणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात नऊ स्पर्धक आहेत. या नऊ स्पर्धकांमध्ये ट्रॉफी आणि बक्षीसाची मोठी रक्कम जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे.

‘बिग बॉस 18’च्या घरात सध्या करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, ईशा सिंग, रजत दलाल, चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग आणि श्रुतिका अर्जुन हे स्पर्धक राहिले आहेत. या नऊ स्पर्धकांपैकी करणवीर आणि विवियन यांची शो जिंकण्याची अधिक शक्यता आहे. अगदी पहिल्या एपिसोडपासूनच करणवीर त्याच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकतोय. तर त्याला विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्याकडून तगडी टक्कर मिळतेय.

कलर्स टीव्हीवर ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना हा ग्रँड फिनाले पाहता येणार आहे. ग्रँड फिनाले एपिसोडचा नेमकी वेळ अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र मागच्या काही सिझन्सनुसार, यंदाचाही ग्रँड फिनाले रात्री ९ वाजताच्या सुमारास सुरू होऊन पुढील तीन तासांपर्यंत चालण्याची शक्यता आहे. रात्री १२ च्या ठोक्याला सूत्रसंचालक सलमान खान अंतिम दोन स्पर्धकांना मंचावर बोलावतो आणि विजेत्याच्या नावाची घोषणा करतो. यंदाच्या सिझनच्या विजेत्याला तब्बल ५० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.

‘बिग बॉस 18’मध्ये एकूण चौदा स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये कशिश कपूर, सारा अरफीन खान, अरफीन खान, दिग्विजय सिंह राठी, एडिन रोझ, यामिनी मल्होत्रा, अदिती मिस्त्री, एलिस कौशिक, मुस्कान बामणे, ताजिंदर बग्गा, शहजादा धामी, नायरा बॅनर्जी, हेमा शर्मा आणि गुणरत्न सदावर्ते यांचा समावेश होता.

Share this article